Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

महापालिकेत पोटनिवडणुकीसाठी रचले जात आहेत मनसुबे

Share
कर वसुलीत पदाधिकारी, नगरसेवकांचा हस्तक्षेप, Latest News Tax Recovery Officers Corporators Interference Amc Ahmednagar

महापौरपदाच्या आरक्षणानंतरच्या हालचाली : डॉ. बोरूडे, कांबळे राजीनामा देण्याची चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी) – अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी आगामी अडीच वर्षाच्या महापौरपदाचे आरक्षण पडल्याने अनेकांचा भ्रमनिरस झाला आहे. तर या प्रवर्गातील पुरूष नगरसेवक राजीनामा देऊन आपल्या घरातील महिलांना पोटनिवडणुकीत निवडून आणण्याचे मनसुबे रचत आहेत. विशेष म्हणजे सध्या सत्तेत असलेल्या भाजपकडे या प्रवर्गासाठी एकही नगरसेवक नसल्याने ते जवळपास सत्तेच्या बाहेर फेकले जाण्याचीच शक्यता अधिक आहे.

अनुसूचित जाती (महिला) या प्रवर्गात सध्या महापालिकेत रोहिणी शेंडगे, रीता भाकरे, शांताबाई शिंदे (शिवसेना), शीला चव्हाण (काँग्रेस) आणि रूपाली पारगे (राष्ट्रवादी) या नगरसेविका आहेत. शिवसेनेला पाण्यात पाहणार्‍या भाजपकडे एकही नगरसेविका नाही. तर राष्ट्रवादीकडे एकमेव नगरसेविका आहे. काँग्रेसच्या चव्हाण यांचे पती दीप चव्हाण यांचे आणि राष्ट्रवादीचे सूत कधीच जुळलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी त्यांना बळ देण्याची शक्यता जवळपास नाही. राष्ट्रवादीकडे असलेल्या पारगे यांचे वडील व बंधू पूर्वीपासून काँग्रेसजन आहेत. महापालिका निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीला जवळ केलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी त्यांना महापौरपदासाठी संधी देईल का, याबाबत आतापासूनच शंका घेण्यास सुरूवात झाली आहे. महापौरपदासाठी लागणारी ‘रसद’ असलेले सध्यातरी शेंडगे या एकमेव आहेत. त्यांनी आरक्षण पडल्यापासूनच तयारी सुरू केल्याचे बोलले जाते.

कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत शिवसेनेचा महापौर होऊ द्यायचा नाही, असा चंग राष्ट्रवादी आणि भाजपच्या एका मोठ्या गटाने बांधलेला आहे. भाजपच्या नगरसेवकांची संख्याही या गटाचीच जास्त आहे. मागील दोन महापौरपदाच्या निवडणुकीत हे प्रकर्षाने पुढे आले आहे. सध्या जरी शेंडगे सक्षम वाटत असल्या तरी त्यांचा रस्ता पाहिजे तेवढा सोपा नाही. शेंडगे यांना सक्षम पर्याय उभा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी ‘रसद’ उपलब्ध करणारा तेवढा सक्षम उमेदवाराच्या शोधात भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक डॉ. सागर बोरूडे प्रभाग क्रमांक एकमधून निवडून आलेले आहेत.

मागीलवेळी शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले डॉ. बोरूडे यावेळी राष्ट्रवादीकडून निवडून आले आहेत. त्यांनी राजीनामा देऊन घरातील एका महिलेला तेथे पुन्हा निवडून आणायचे आणि महापौरपदाची संधी साधायची, असे मनसुबे रचले जात आहेत. त्यासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर लगेच चाचपणीही सुरू झाली. भाजपकडे राहुल कांबळे केडगाव परिसरातून निवडून आलेले आहेत. मात्र त्यावेळची आणि आताच्या परिस्थितीत फरक असल्याने ते राजीनामा देण्यास तयार होतील का, असा प्रश्न आहे. तसे झाले तरी महापौरपद मिळवायचे असल्याने विरोधही तेवढाच तीव्र होण्याची शक्यता आहे. सध्यातरी सर्वांच्या नजरा डॉ. बोरूडे यांच्याकडे आहेत.

महापालिकेत सध्या भाजपचा महापौर, उपमहापौर आणि महिला व बालकल्याण समिती सभापती असला, तरी ही सर्व पदे भाजपला केवळ राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे मिळाली आहेत. आगामी काळात याची परतफेड भाजप करू शकतो. राष्ट्रवादीने तशी गळ टाकल्यास भाजपच्या एका प्रमुख गटाला शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी जास्त जवळ असल्याने त्यास हिरवा कंदील मिळू शकतो. राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी जवळ येत असले तरी स्थानिक स्तरावर त्याचीच पुनरावृत्ती होईल का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

राठोड प्रयत्न करणार का?
शेंडगे शिवसेनेच्या गटनेत्या आहेत. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे कट्टर समर्थक असलेले संजय शेंडगे यांच्यासाठी राठोड मैदानात उतरणार का, हा प्रश्न आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राठोड सुमारे वर्षभर राजकारणापासून दूर राहिले. यावेळीही त्यांना पराभव स्वीकाराला लागल्याने ते आता किती ‘रस’ घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शिवाय शिवसेनेच्या नगरसेवकांत एकमेकांमध्ये निर्माण झालेला दुरावा दूर करण्याचे मोठे आव्हान शेंडगे यांच्यासमोर राहणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!