खोट्या, निराधार आरोपांमुळे माझी उचलबांगडी – आलोक वर्मा

0
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरिय समितीने आलोक वर्मा यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदावरून उचलबांगडी केल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी आपली बाजू मांडली. केवळ एका व्यक्तीने केलेल्या खोट्या, निराधार आरोपांमुळे मला माझ्या पदावरून हटविण्यात आले. सीबीआय या देशातील सर्वोच्च तपास संस्थेचा आब राखण्याचा मी प्रयत्न केला. पण कोणीतरी या संस्थेचा दर्जा खालावण्यासाठी काम करतो आहे. यासर्व प्रकाराबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

भ्रष्टाचारांच्या मोठ्या प्रकरणांची चौकशी करणारी महत्वाची संस्था असल्यामुळे सीबीआयची स्वतंत्रता सुरक्षित आणि संरक्षित ठेवली पाहिजे. कोणत्याही बाहेरच्या दबावाशिवाय सीबीआयचे काम चालले पाहिजे. ज्यावेळी मी सीबीआयचा प्रामाणिकपणा कायम जपण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रामाणिकपणा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे आलोक वर्मा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या निवड समितीच्या बैठकीत सीबीआयच्या संचालक पदावरुन आलोक वर्मा यांना हटविण्यात आले. या निवड समितीमध्ये असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आलोक वर्मा यांना पदावरुन हटविण्यास विरोध दर्शविला. मात्र, तीन सदस्य असलेल्या या निवड समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश ए. के. सीकरी यांनी आलोक वर्मांच्या उचलबांगडीवर शिक्कामोर्तब केले.

आलोक वर्मा यांची आता केंद्रीय गृह मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण सेवा आणि होमगार्ड या सेवांच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मला या पदावरून हटवून दुसऱ्या ठिकाणी पाठविण्यात येते आहे, याबद्दल मला वाईट वाटते. भविष्यात गरज पडली तर सीबीआयसाठी पुन्हा एकदा कायद्याच्या आधाराने काम करायला आपण तयार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*