सरकारचे कामगार विरोधी धोरण : कॉ. डिमरी

0

महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे चौथे त्रैवार्षिक राज्य अधिवेशन

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – गेल्या पंचवीस वर्षांपासून कामगार विरोधी व भांडवलदारधार्जिणे आर्थिक धोरण राबवले जात आहे. त्यामुळे हळुहळु कायम कर्मचारी संख्या कमी होत असून कंत्राटी कर्मचारी संख्या वाढत आहे. या पद्धतीने नोकरीची शाश्वती गेली असून त्यामुळे कामगारांचे शोषण करणे भांडवलशाहीसाठी सोपे झाले आहे. या धोरणाचे चक्र उलटे फिरवण्यासाठी भांडवलधार्जिणे सरकार उलथून टाकण्यास कामगार वर्गाने सज्ज व्हावे, असे आवाहन ऑल इंडिया सेंट्रल कौन्सिल ऑफ ट्रेड यूनियन्सचे महासचिव कॉ. राजीव डिमरी यांनी केले.
लाल निशाण (लेनिनवादी) पक्ष प्रणित महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे चौथे त्रैवार्षिक राज्य अधिवेशन येथील प्रियदर्शिनी मंगल कार्यालयात संपन्न झाले. त्याचे उद्घाटक म्हणून कॉ. डिमरी बोलत होते. अध्यक्षस्थानी साखर कामगारांचे कॉ. सुभाष काकुस्ते होते. यावेळी लाल निशाण पक्षाचे सरचिटणीस भीमराव बनसोड, महासंघाचे सरचिटणीस उदय भट, कॉ.बाळासाहेब सुरुडे, कॉ.राजेंद्र बावके, विजय कुलकर्णी, अतुल दिघे, कॉ.मदिना शेख, कॉ शरद संसारे, कॉ.जीवन सुरुडे आदी उपस्थित होते.
कॉ.डिमरी पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला वैतागून लोकांनी विकासाच्या नावाखाली भाजपला संधी दिली. मात्र यांनी ज्या विकासाचे स्वप्न दाखवले होते तो प्रत्यक्षात आलाच नाही. मोदी केवळ भाषण करणारे प्रधानमंत्री बनले आहेत. भाषणातून ते मोठमोठे दावे करतात मात्र जमिनीवर काहीच काम दिसत नाही. नोटबंदी काळ्या पैशाच्या बंदोबस्तासाठी आहे असे सांगितले मात्र त्यातून बड्या धेंडांचा काळा पैसा पांढरा करण्यात आला.
नोटबंदीने अर्धमेली झालेली अर्थव्यवस्था जीएसटी च्या वाराने पुरती घायाळ झाली आहे. असे ते म्हणाले.
कॉ. उदय भट म्हणाले की, निव्वळ राजकीय स्वातंत्र्य मिळून उपयोग नाही. कामगार कष्टकर्‍यांच्या स्थितीत सकारात्मक बदल होत नाही तोपर्यंत या स्वातंत्र्याला काही अर्थ नाही. आपण केवळ कामगारांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत नाही आहोत. कामगारांव्यतिरिक्त इतर घटकांचे प्रश्नही आम्ही उपस्थित करतो. हे सरकार कामगारांसोबत चर्चा करत नाहीत.
घरकामगारांचे मंडळ बरखास्त केले. अंगणवाडीच्या महिलांच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या नाही. गेल्या तीन वर्षांत महासंघाने गेल्या तीन वर्षांत 127 आंदोलने केली आहेत. कामगार विरोधी, शेतकरी विरोधी सरकार आहे. असे ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी कॉ. भीमराव बनसोड, कॉ. सुभाष काकुस्ते, देवराव पाटील, अतुल दिघे यांचीही भाषणे झाली. स्वागताध्यक्ष कॉ. बाळासाहेब सुरुडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कॉ. शरद संसारे यांनी सूत्रसंचालन केले. सुवर्णा तळेकर यांनी महिलांच्या कामगारांच्या विशेष मागण्यांचा ठराव मांडला.
आभार कॉ. राजेंद्र बावके यांनी मानले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कॉ.जीवन सुरुडे, कॉ.मदिना शेख, कॉ.शरद संसारे, कॉ.श्रीकृष्ण बडाख, अनिल मुंगसे, उत्तम माळी, सुयोग ससकर, बाळासाहेब वाणी, रामा काकडे, लक्ष्मण डांगे, दीपक धनसिंग, विजय शेळके, रंगनाथ दुशिंग, अजय बत्तीशे, बाबूलाल पठाण, प्रकाश भांड, हसन शेख, भीमराज पठारे, अरुण बर्डे, दत्तू माली, संतोष केदारे आदींनी प्रयत्न केले.

 

LEAVE A REPLY

*