अभ्यासक्रमांच्या सर्व परीक्षा वेळापत्रकानुसारच; विद्यापीठाची माहिती

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होणार असून, त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली आहे.

‘करोना’च्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येणार असून, त्यादृष्टीने विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांना सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा 11 मार्चपासून सुरू झाल्या असून जून मध्यापर्यंत त्या सुरू राहाणार आहेत.

विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यातील संलग्न कॉलेजांमध्ये लेखी परीक्षांना 11 मार्चपासून सुरुवात झाली असून, जून महिन्यापर्यंत या परीक्षा सुरू राहणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग आणि संलग्न कॉलेजांमधील अध्यापनाला 31 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.

त्यामुळे विद्यापीठांच्या सत्र परीक्षा पुढे ढकलण्यात येतील, अशी चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होती. तर, काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणीदेखील केली होती. मात्र, राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार परीक्षा होणार आहेत. राज्य सरकार आणि उच्चशिक्षण संचालनालयाने दिलेल्या सूचनांप्रमाणे परीक्षा घेण्यात येत आहे.

या परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अशा अभ्यासक्रमांच्या परीक्षा जून महिन्याच्या मध्यावधीपर्यंत सुरू राहणार आहे. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांची सुरक्षेची परिपूर्ण काळजी घेण्याच्या सूचना कॉलेज प्रशासनाला दिल्याचे डॉ. काकडे यांनी स्पष्ट केले.

परीक्षा घेण्याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना

  • परीक्षा केद्रांवरील कक्षामध्ये वातावरण हवेशीर ठेवावे.
  • परीक्षा केंद्राच्या परिसरात स्वच्छता राखावी.
  • हात धुण्यासाठी सॅनिटायझर, साबणाची व्यवस्था करावी.
  • दोन बाकांमध्ये पुरेसे अंतर ठेवावे किंवा एक बाकाआड बसण्याची सुविधा करावी.
  • नियंत्रण कक्षामध्ये तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करावी.
  • चर्चासत्र, कार्यशाळा, परिषदांना बंदी
  • विद्यापीठाच्या प्रशासनाने शैक्षणिक विभाग आणि संलग्न कॉलेजांना 31 मार्चपर्यंत चर्चासत्र, कार्यशाळा, परिषद घेण्यासाठी बंदी घातली आहे.

तातडीने रद्द करा

अनेक व्यक्ती एकत्र येतील अशा कोणत्याच कार्यक्रम किंवा उपक्रमांचे आयोजन करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच पूर्वनियोजित कार्यक्रम असतील, तर ते तातडीने रद्द करावेत असे आदेश विद्यापीठाने दिले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *