अक्राळेत मंगळसूत्र ओरबडण्याचे सत्र सुरूच

0

जानोरी । दि. 3 वार्ताहर
दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे सलग दोन दिवस मंगळसूत्र ओरबडून नेण्याच्या घटना घडल्या असुन विशेषतः महिला वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुधवारी दुपारच्या सुमारास भागाबाई खंडू जाधव यांचे एका मोटारसायकलस्वाराने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसुत्र ओरबडून नेले. ती घटना ताजी असतानाच काल सकाळी छकुबाई नाना जाधव या रस्त्यालगतच्या आपल्या मालकीच्या शेतात निंदणी खुरपण्याचे काम करीत होते.

एक युवक रस्त्यावर आपली मोटारसायकल काळ्या रंगाची होंडा शाईन रस्त्यालगत उभी करून महिलेकडे आला. काही पत्ता वगैरे विचारण्याच्या हेतुने कोणी वाटसरू आला असेल असे महिलेला वाटले.

परंतु त्याने जवळ येताच मंगळसूत्रावर झडप टाकून मंगळसूत्र ओरबडून पळाला. महिलेने मदतीसाठी ओरडाओरड केला. रस्त्याने दिपक चौधरी हा युवक जात असतांना त्याला हा प्रकार निर्देशास आला व त्याने चोराचा पाठलाग केला. पुढे दोघांमध्ये झकडपकडही झाली.

त्यात दिपक चौधरी या युवकाच्या गळ्यातील सोन्याचे ओम पान हिसकावून पळून जाण्यात चोरटा यशस्वी झाला. या घटनेची माहिती मिळताच दिंडोरीचे पोलीस निरीक्षक मधुकर गावित हे घटनास्थळी दाखल झाले व घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. अज्ञात इसमाविरूद्ध भा.द.वि.कलम 192 अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बोरसे, नंदु वाघ, युवराज खांडवी, जाधव आदी करीत आहेत.

LEAVE A REPLY

*