अकोले : ‘नवलेवाडी’ला ‘स्मार्ट व्हिलेज’ पुरस्कार

0

5 डिसेंबर रोजी नवलेवाडी येथे गौरव सोहळा

अकोले (प्रतिनिधी) – तालुक्यातील नवलेवाडीच्या आदर्श ग्रामपंचायतीस सन 2016-17 चा राज्य शासनाचा जिल्हास्तरीय ‘स्मार्ट व्हिलेज’ हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा गौरव मंगळवार 5 डिसेंबर रोजी सकाळी माजी मंत्री मधुकरराव पिचड, आमदार वैभवराव पिचड यांच्या हस्ते व अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले यांच्या अध्यक्षतेखाली नवलेवाडी येथील बहुउद्देशीय सभागृहात होणार असल्याची माहिती माजी उपसरपंच विक्रमराव नवले यांनी दिली.

यावेळी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, जिल्हा परिषद कृषी व पशुसंर्वधन सभापती अजय फटांगरे, सभापती रंजनाताई मेंगाळ, दूधगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव चासकर, गटविकास अधिकारी सचिन कोष्टी आदी उपस्थित राहणार आहेत.

नवलेवाडीची ग्रामपंचायत आदर्श असून गावामध्ये अनेक उपक्रम राबविले आहेत. सन 2000-01 संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक, सन 2002-03 संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, तालुकास्तरीय प्रथम क्रमांक, सन 2003-04 संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक, सन 2005-06 निर्मल ग्रामपुरस्कार हस्ते दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम,

सन 2006-07 यशवंत पंचायतराज नाशिक विभाग अंतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार द्वितीय क्रमांक, सन 2010-11 पर्यावरण ग्रामसमृध्दी योजनेअंतर्गत विकास रत्न पुरस्कार हस्ते राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सन 2015-16 जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत अस्मिता ग्राम पुरस्कार, आदर्श जिल्हा परिषद प्रा. शाळा असे अनेक पुरस्कार नवलेवाडी या गावास मिळालेले आहेत.

त्यात या पुरस्काराची भर पडली असून नवलेवाडीचे नाव राज्यपटलावर झळकत आहे. तालुक्यामध्ये क्रांतिकारी गाव म्हणून नवलेवाडीची ओळख आहे. या गौरव सोहळयास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रामस्थ, ग्रामपंचायत कमिटी, ग्रामरक्षक दल व शालेय व्यवस्थापन समिती आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

*