अकोले : राष्ट्रवादीचा वीजवितरण कार्यालयावर कंदील मोर्चा

0
अकोले (प्रतिनिधी) – महावितरण कंपनीने आपल्या अनागोंदी कारभारात सुधारणा न केल्यास अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल तसेच व्यापक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार वैभवराव पिचड यांनी दिला आहे. विजेचे भारनियमन तातडीने बंद करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने काल रविवारी सायंकाळी आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली कंदील मोर्चा काढण्यात आला. यावेळी कंपनीच्या अधिकार्‍यांना कंदील व मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आ. पिचड बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सायंकाळी सातच्या सुमारास हातात कंदील व उजेडासाठी टेंभे घेऊन येथील वीज वितरणच्या कार्यालयावर धडकले. यावेळी कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनी व शासनाचा धिक्कार करणार्‍या घोषणा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस यशवंतराव आभाळे, नगराध्यक्ष के. डी. धुमाळ, उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी,
नगरसेवक बाळासाहेब वडजे, सचिन शेटे, परशुराम शेळके, नामदेव पिचड, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम नवले, तालुकाध्यक्ष शंभू नेहे, राष्ट्रवादी महिलाध्यक्षा चंद्रकला धुमाळ, माजी अध्यक्षा नंदा धुमाळ, अमृतसागर दूध संघाचे संचालक बाळा नवले, गोरक्ष मालुंजकर, प्रवीण धुमाळ, माजी उपसभापती संतोष देशमुख, राष्ट्रवादी युवकचे राहुल देशमुख, तुषार सुरपुरीया,
महेश तिकांडे, विजय पवार, राकेश नवले, बबन देशमुख, साईनाथ नवले, अन्सार पठाण, नाजीम शेख, गणेश पापळ, मुन्ना चासकर, अप्पासाहेब पापळ, रमेश नाईकवाडी, प्रमोद नवले, सागर झोळेकर, नितीन नाईकवाडी, भागवत शेटे, सचिन देशमुख, सी. ए. असिफ शेख, श्रीकांत नाईकवाडी, दयानंद वैद्य, बाळासाहेब वैद्य, लक्ष्मण वैद्य, चंद्रकांत पवार, तुकाराम वैद्य, पंढरीनाथ वैद्य, महेश माळवे, राहुल शहा, राजू लोखंडे आदी कार्यकर्ते कंदील मोर्चात सहभागी झाले होते.
आ. पिचड म्हणाले, तालुक्यात विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, महिला, युवक, युवती यांना महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या एक महिन्यापासून अतिरिक्त भारनियमन सुरू केल्याने वीज कधी येईल व कधी जाईल याचा नेम राहिला नाही.
ऐन दिवाळीच्या तोंडावर नागरिकांना दिवाळी अंधारात करावी लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरू आहेत. परंतु अभ्यासाच्या वेळेस भारनियमन केले जात आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करणे कठीण झाले आहे.
ऑक्टोबर महिन्यातील तीव्र उन्हामुळे शेतातील पिके पाणी असूनही वीज नसल्यामुळे पिकांना देता येत नाही. सध्या कांदे लागवडीचा हंगाम असल्याने लावलेल्या रोपांना पाणीही भरता येत नाही. अकोले शहरासह ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना वीज नसल्याने पाणी पुरवठा करता येत नाही. अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली असल्याचे आ. पिचड यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मिनानाथ पांडे व शहराध्यक्ष संपतराव नाईकवाडी यांची शासन व महावितरणच्या कारभाराचे वाभाडे काढले. यावेळी ज्युनियर इंजि.मुळे यांना कंदील भेट देऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक विकास काळे, नितीन बेंद्रे व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

  तालुक्यातील भाजपवाले व्हाट्सअप व फेसबुक वर तुटून पडले आहेत. यापूर्वीच्या आघाडी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र राबविले जात आहे .राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी याच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना प्रतिउत्तर करण्याची गरज असल्याचा सल्ला यावेळी आ. पिचड यांनी दिला.

LEAVE A REPLY

*