Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अकोले, राहुरी, कर्जतला राष्ट्रवादी जोर लावणार

Share

पवार, मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे मेळावे; युतीच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहरात गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो झाला. आता राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित शनिवारी (दि. 21) हे शक्तिप्रदर्शन होईन. अकोले, राहुरी आणि कर्जत तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सोमवारी (दि. 23) मेळावे घेेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेेंद्र फाळके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होईल. सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतून भारतीय जनता पक्ष शक्तिप्रदर्शन करत आहे. भाजपने राष्ट्रवादीला टारगेट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर शरद पवार यांनी सोलापूर येथून महाराष्ट्र दौर्‍याला सुरुवात केली. पवार शनिवारी नगर शहरात येत आहेत. यानंतर लगेचच सोमवारी (दि. 23) अकोले, राहुरी आणि कर्जत या तालुक्यांमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थित मेळावे आणि पक्ष प्रवेश होणार आहेत.

फाळके म्हणाले, शरद पवार यांचे शनिवारी (दि. 21) रोजी सकाळी अकरा वाजता माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आगमन होणार आहे. येथून ते माळीवाडा वेशीतील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, टिळक रोड मार्गे नंदनवन लॉन येथे मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील. पवार यांच्या दौर्‍यानंतर सोमवारी (ता. 23) अकोले, राहुरी आणि कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष मेळावे होणार आहेत. या मेळाव्यांची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी कार्याध्यक्ष संदीप वर्पे, उपाध्यक्ष अजित कदम, अशोक बाबर आदी उपस्थित होते.

अकोलेतील मेळावा होणार रंगतदार
शरद पवार यांच्याबरोबर राजकीय प्रवासात 40 वर्षे राहिलेले माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्‍वभूमीवर अकोले येथे सोमवारी अजित पवार, धनंजय मुंडे आणि खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत होणारा मेळावा रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मेळाव्यात भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे व अशोक भांगरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही प्रवेश करणार असल्याचे फाळके यांनी सांगितले. राहुरी येथील मेळाव्यातही पक्षप्रवेशासाठी युतीचे कार्यकर्ते संपर्कात असून, त्यांची नावे गुलदस्त्यातच राहू द्या, असे फाळके म्हणाले.

जिल्ह्यात नऊ जागांची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसने नगर जिल्ह्यात नऊ जागांची मागणी केली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले, कोपरगाव आणि नेवासा, तर नगर लोकसभा मतदारसंघातील पारनेर, श्रीगोंदा, नगर शहर कर्जत-जामखेड, शेवगाव-पाथर्डी आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या जागांचा यात समावेश आहे. पक्षाचे नेते शरद पवार यांनी बीड दौर्‍यात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्याप्रमाणे नगर दौर्‍यातही उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे फाळके म्हणाले.

बारा-शून्य नव्हे, शून्य बारा
भाजपमध्ये प्रवेश केल्यानतंर गृहनिर्माणमंत्री आणि नगरचे खासदार यांनी जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केले. 12 विरुद्ध शून्य असा दावा केला. त्यावर फाळके म्हणाले, विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात 0-12 असाही निकाल होऊ शकतो. राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ आहे. ते कधीही बंद पडत नसते, हे त्या पितापुत्रांना चांगले माहीत आहे, अशीही टिपणी फाळके यांनी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!