तुम्ही चांगले काम केले असते तर शाईफेक व कडकनाथ कोंबड्या फेकल्याच नसत्या
Share

अजित पवार यांचा घणाघात
अकोले | प्रतिनिधी
उद्याच्या काळात आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
तुम्ही जर चांगले काम केले असते तर ,तुमच्या अंगावर कुणी शाई फेकली नसती..कडकनाथ कोंबड्या फेकल्या नसत्या…काळे झेंडे दाखवले नसते अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता केली.
अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात जि. प.सदस्य किरण लहामटे, सुनीता भांगरे,माजी जि. प.सदस्य यमाजी लहामटे,माजी गटशिक्षण अधिकारी मारुती लांघी,युवक क्रांती संघटनेचे संस्थापक विनोद हांडे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाद्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेध सरचिटणीस अविनाश आदिक ,बाळासाहेब जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, कपिल पवार आदी उपस्थित होते.
यावेळी अजित पवारांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांचे नाव न घेता टीकास्र सोडले. पाच वर्षात लुबाडलेले पैसे बाहेर काढले जातील असे सांगतानाच एकास एक उमेदवारी संदर्भात कुणी गैरसमज पसरवतील.
त्यांच्यापासून सावध रहा, असे त्यांनी इच्छुक उमेदवार व नेत्यांना ठणकावून सांगितले.निवडणुकी नंतर आपले सरकार आले तर अकोले तालुक्यातील सर्व प्रश्न सुटेल याची ग्वाही मी देतो असे पवार यांनी सांगतांना बाहेरील लोक येऊन काहीही सांगतील त्यांच्या वर विश्वास ठेवू नका, निळवंडेच्या पाण्यावर काहींचे लक्ष आहे, ते तुमच्याकडे येतील पण अगोदर हक्क तुमचा व नंतर त्यांचा अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता पवार यांनी टीका केली.
निवडणूक काळात माझे वय झाले म्हणून कुणी विनवणी करतील पण आता त्यांच्या विनवणीला भीक घालू नका असे माजी मंत्री पिचड यांचे नाव न घेता अजित पवार यांनी केली.आमचं नाणं खणखणीत आहे, आम्ही ऐरे गहिरे नाही त्यामुळे लपून सभा ऐकण्यापेक्षा हिम्मत असेल तर समोर येऊन सभा ऐका असे त्यांनी विरोधकांना सुनावले.