Type to search

नंदुरबार फिचर्स

हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पेटली काठीची रजवाडी होळी

Share

नंदुरबार

अक्कलकुवा तालुक्यातील काठी संस्थानची मानाची रजवाडी होळी पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी हजेरी लावली. रात्रभर पारंपारिक पद्धतीने आदिवासी नृत्य करुन आदिवासी बांधवांनी आपल्या विविधतेने नटलेल्या अनोख्या संस्कृतीचे दर्शन घडवले.

अक्कलकुवा तालुक्यात असलेल्या काठी संस्थानच्या रजवाडी होळीला सातपुड्यात विशेष महत्व आहे. सदर होळी पहाटे पेटविली जाते. काठी येथील होळी पेटविण्याचा मान काठी संस्थानिकांचे वारस असलेल्या महेंद्रसिंग पाडवी यांना आहे. ही होळी पाहण्यासाठी जिल्हयातूनच नव्हे तर इतर जिल्हे, परराज्यातील हजारो नागरिक उपस्थित होते. रात्रभर पारंपारिक आदिवासी नृत्य करण्यात आले. समुहनृत्याचे आगळेवेगळे दर्शन यावेळी घडले. काठीला जाणार्‍या रस्त्यावर दुपारपासूनच गर्दी झाली होती. यावेळी समृहनृत्य करतांना आदिवासी दिसत होते. काली, बाबा आणि बुध्या ही तीन पात्रे यात पहायला मिळाली. होळीच्या काळात आदिवासी समाजात नवस फेडण्याची प्रथा आहे. या काळात नवस फेडणारी आणि व्रत करणारी व्यक्ती घरचे अन्न ग्रहण करीत नाही. आसपासच्या घरांमधून वा गावातून मागून आणलेले अन्न खाते, खाटेवर किंवा पलंगावर झोपत नाही. पाण्याचा स्पर्श होवू देत नाही. होळी पेटेपर्यंत त्यांचे नाचणे व गाणे ही दिनचर्या सुरू असते. यावेळी नवस फेडणार्‍या भाविकही मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

काठी येथील होळीचा खड्डा सामुहीकपणे खोदण्याची प्रथा आहे. यासाठी प्रत्येकाने होळीच्या ठिकाणी जावून मुठभर माती काढली. त्यातूनच होळीचा दांडा उभारण्यासाठी खड्डा तयार करण्यात आला. पहाटे 5 वाजेपर्यंत सुमारे 90 फुट उंचीचा बांबूचा दांडा त्या खड्डयात उभारण्यात आला. होळी पेटविण्यापुर्वी विधीवत पुजा करण्यात आली. पानाफुलांनी सजवलेला बांबू खड्डयात उभा करण्यात आला. आजुबाजूने लाकडाच्या ओंडक्यांचा आधार देण्यात आला. त्यानंतर आदिवासी बांधवांनी होळीभोवती फेर धरून पारंपारीक नृत्य केले.

नृत्य करणार्‍या आदिवासी बांधवांच्या हातात धार्‍या, तिरकामटे, कुर्‍हाड, बर्ची तसेच विविध प्राण्यांचे मुखवटे लावण्यात आले होते. हातामध्ये ढोल, पिपरी, पावरी,बासरी आदी वाद्यांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पुढारी, नेते, अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, छायाचित्रकारांनी मोठया संख्येने हजेरी लावून काठी येथील होळीचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी आदिवासी विकास मंत्री ना.अ‍ॅड.के.सी.पाडवी, आ.डॉ.विजयकुमार गावित, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, जि.प.अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी, यांच्यासह अधिकारी, राजकीय कार्यकर्ते, पुढारी, आदिवासी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!