पारनेर राष्ट्रवादीच्या नाराजांनी घेतली अजित पवारांची भेट

0

दीपक पवार यांच्या बडतर्फीच्या कारवाईनंतर कार्यकर्त्यांमध्ये खळबळ

पारनेर (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत वाद विकोपाला गेला असून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दादासाहेब पठारे यांनी पंचायत समितीचे उपसभापती असलेले बंडखोर दीपक पवार यांना पक्षातून बडतर्फीची नोटीस पाठविली आहे.
या कारवाईने धास्तावलेल्या 15 जणांनी तातडीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पक्षांतील दूषित वातावरणाची माहिती दिली. यावर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्याबरोबर चर्चेअंती दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
चार दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या आदेशाने उपसभापती पवार यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून दीपक पवार यांना खुलासा करण्यास सांगितले होते, परंतु पवार यांनी नोटीस स्वीकारली नाही व खुलासाही केला नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे पठारे यांनी सांगितले.
पठारे म्हणाले की, अशोक सावंत व विक्रम कळमकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नसून त्यांनी जि. प. व पं. स. निवडणुकीमध्येच बंडखोरी केल्याने व ते पक्षात नसल्याने त्यांना नोटीस पाठवणे व बडतर्फ करण्याचा कोणताही प्रश्नच येत नाही.
निघोज येथे झालेली बैठक ही राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांची नसून ती पक्ष विरोधी कायमच गरळ ओकणार्‍यांची होती, तसेच विरोधकांनी फूस लावून पाठवलेले ते कटकारस्थानी होते. कोण पक्षामध्ये दुकानदारी करत आहे व कोण निष्ठावान आहे हे सावंत यांनी स्वत:ला आरशासमोर उभे करून विचारावे, प्रत्येक वेळेस निवडणुकांमध्ये पक्षाला बदनाम करायचे व आपण पक्षाचे निष्ठावान असल्याचा कांगावा करण्याचा सावंत यांचा धंदा असल्याचा आरोप पठारे यांनी सावंत यांच्यावर केला.
तसेच दीपक पवार यांनी चर्चेविनाच व अनेक वेळा सांगूनही सावंत यांचीच बाजू ओढण्याचा प्रकार केला आहे व त्यामुळे नाइलाजास्तव त्यांना बडतर्फ करण्यात आले. उपसभापती पवार यांनी ग्रामपंचायत निवडणुकांना किती काम करून दिवे लावले असा प्रश्न केला आहे, उलट सुपा ग्रामपंचायत स्वतःहून विरोधकांना देणार्‍यांनी आम्हाला पक्ष निष्ठा शिकवू नये, असा टोला मारला आहे.
कोअर कमिटी स्थापन करण्यास आपला कोणताही विरोध नसून आपण स्वतः त्यासाठी आग्रही आहोत व अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य असल्याचे पठारे यांनी आवर्जून सांगितले आहे.

दोन दिवसांत निर्णय घेऊ – अजित पवार
रविवारी (दि. 9) राष्ट्रवादीच्या 15 जणांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यात सर्वांचे म्हणणे ऐकल्यानंतर दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले. त्यात कोअर कमिटी स्थापनेसह तालुकाध्यक्ष बदलण्यावर चर्चा झाली. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार, अशोक सावंत, विक्रमसिंह कळमकर, बाळासाहेब लामखडे, सोमनाथ वरखडे, उमेश सोनवणे, इंद्रभान गाडेकर, बाबाजी भंडारी, अशोक घनवट यांच्यासह 15 जणांचा सहभाग होता. तालुका राष्ट्रवादीला नवसंजीवनी मिळणार असल्याचा विश्‍वास अशोक सावंत यांनी व्यक्त केला.

पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील : पवार
राष्ट्रवादीतून बडतर्फीची नोटीस आली नसून अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे ज्यावेळी आपल्याला पक्षामधून अधिकृतपणे काढतील त्याच वेळेस आपण पक्षाचे काम करणे बंद करू, असे पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार म्हणाले. 

योग्य वेळी उत्तरे देऊ : झावरे
आपण पक्षासाठी 24 तास काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता असून पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदार्‍या आपण प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत, तसेच माझ्यावर झालेले आरोप बिनबुडाचे असून त्या आरोपांमुळे आपण अजिबात घाबरत नसून योग्य वेळी सर्व आरोपांना उत्तर देऊ, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे म्हणाले. 

 

LEAVE A REPLY

*