अजित पवारांच्या भुमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष

0

पवार, तटकरेंच्या उपस्थिती राष्ट्रवादीच्या विविध आघाड्याचे मेळावे

अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळख असणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे गुरूवारी रात्री उशीरा अथवा शुक्रवारी सकाळी नगरमध्ये दाखल होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून पवार जिल्ह्यातील विविध आघाड्याचे मेळावे घेणार असून पवार यांच्या नगर दौर्‍यात ते काय भूमिका मांडणार याकडे राष्ट्रवादीसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी पक्षाची नव्याने बांधणी करण्याची भूमिका घेत पवार आणि तटकरे यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. या दौर्‍यात त्यात्या जिल्ह्यातील पक्ष संघटना बांधणीसोबतच आगामी निवडणुकीची तयारी त्यांनी सुरू केली आहे. मात्र, हे करत असतांना पक्षात असणारी गटबाजी संपण्याचे आव्हान पवार आणि तटकरे यांच्या समोर आहे. पवार यांच्या दौर्‍यापूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी जिल्ह्याचा तीन दिवसी दौरापूर्ण केला असून यात सरकारच्या फसव्या कर्जमाफी बदल कार्यकर्त्यांसह शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्याचे काम केले आहे.

शुक्रवारी सकाळी 10 वाजता सहकार सभागृहात पवार आधी राष्ट्रवादी युवक आणि युवती, त्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यकर्ते, त्यानंतर महिला आघाडी आणि सर्वात शेवटी अल्प संख्या आघाड्यासह अन्य आघाड्यांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात ते कार्यकर्त्यांना काय मंत्र देणार याची उत्सूकता कार्यकर्त्यांना आणि जिल्हा राष्ट्रवादीकडून पवार आणि तटकरे यांच्या दौर्‍याची जारदार तयारी केली आहे. जिल्हाध्यक्ष घुले यांनी राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार आहे, याची आकडेवारी तयार केली असून ती पवार यांना आज सादर करण्यात येणार आहे.

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पवार यांच्या नगर दौर्‍याला महत्व आहे. विशेष करून लोकसभेच्या दक्षिण मतदार संघातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता असून राज्य आणि केंद्र सरकारच्या फसव्या घोषणा, कर्जमाफी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परदेशातील दौरे याबाबत पवार काय भाष्य करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

राष्ट्रवादीच्या गड असणार्‍या नगर जिल्ह्यात विधान सभेला पक्षाला अवघ्या तीन आमदार निवडून आणता आले. यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला अपेक्षीत यश मिळालेले नाही. आगामी काळात राष्ट्रवादीला पुन्हा नंबर वन करण्यासाठी पवार जिल्ह्यात काय रणनिती आखणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. 

LEAVE A REPLY

*