अजित पवार, तटकरे 7 जुलैला नगरला

0

जिल्हाध्यध्यक्ष घुले ठिकठिकाणी बैठका घेणार 

अहमदनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या 7 जुलै रोजी नगरला येत आहेत.  त्यांच्या जिल्हा दौर्‍याचे नियोजन जिल्हा राष्ट्रवादीने सुरू केले आहे. पवार व तटकरे यांच्या उपस्थितीत नगरला जोरदार मेळावा करण्याच्यादृष्टीने जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले हे येत्या 26 ते 29 जून दरम्यान जिल्हाभर दौरे करून तालुकानिहाय पदाधिकारी बैठका घेणार आहेत.
शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ जास्तीतजास्त शेतकर्‍यांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यासह सत्तेतील भाजप व सेनेकडून मध्यावधीची भाषा सुरू असल्याने राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे यांनी मागील आठवड्यात जिल्ह्याचा दौरा केला आहे. त्याचवेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष तटकरे व माजी उपमुख्यमंत्री पवार हे जिल्हा दौर्‍यावर येणार असल्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार त्यांचा येत्या 7 जुलैचा दौरा निश्चित झाला आहे. या दोघांच्या उपस्थितीत या दिवशी दिवसभर पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका तसेच महिला व युवती आणि युवक व विद्यार्थ्यांचे स्वतंत्र मेळावे घेतले जाणार आहेत.
सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्याक विभाग व विविध सेलच्या पदाधिकार्‍यांचीही बैठक होणार आहे.
तटकरे व पवारांच्या या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष घुले यांनी आज राष्ट्रवादी भवनात नियोजन बैठक घेतली. शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, बांधकाम समिती सभापती कैलास वाकचौरे तसेच राजेंद्र फाळके, सोमनाथ धूत, निर्मला मालपाणी, कपिल पवार, अभिषेक कळमकर व अन्य यावेळी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष घुले हे जिल्हाभर फिरून तालुकानिहाय बैठका व संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत संघटनात्मक बदल होणार असल्याची चर्चा आहे. त्यात महिला जिल्हाध्यक्षपदही पाच महिन्यांपासून रिक्त आहे. या ठिकाणी त्यांच्या नावाची घोषणा या निमित्ताने होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पक्षात असणारी गटबाजी थांबविण्याचे आव्हान प्रदेशाध्यक्ष तटकरे व माजी उपमुख्यमंत्री पवार यांच्या समोर राहणार आहे.

LEAVE A REPLY

*