खा. गांधींना बोलू दिले नाही, हीच भाजपची संस्कृती का?

0

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा सवाल

पुणे – अहमदनगर येथे झालेल्या पंतप्रधानाच्या सभेत खासदार दिलीप गांधी यांना बोलू दिले नाही, हे भाजपच्या कोणत्या संस्कृतीत मोडते असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. पुणे येथे आयोजित विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते. दोन मंत्र्यांच्या समोर तीन वेळेस आमदार असलेल्या आमदाराला जळगावच्या जिल्हा अध्यक्षांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दोघेही रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही भाजपची संस्कृती. अहमदनगर येथे खासदार दिलीप गांधी यांना भाषणदरम्यान बोलू दिले नाही, ते रडले. एकेकाळी मंत्री आणि 15 वर्षे खासदार असणारे गांधी रडले की मला बोलू देत नाहीत. ही काय लोकशाही? त्यांना त्यांचे विचार मांडू द्या असेही ते म्हणाले.

शुक्रवारी (12 एप्रिल) नगरला झालेल्या पंतप्रधान मोदी यांच्या प्रचारसभेत भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. खा. दिलीप गांधी यांचे भाषण थांबविण्याचा प्रयत्न झाल्याने ते संतप्त झाले. थांबविण्याचा प्रयत्न झाल्याने त्यांचे डोळे पाणावले होते. तसेच भाजपाच्या जळगाव लोकसभा उमेदवाराच्या प्रचारसभेत व्यासपीठावरच विद्यमान जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार तथा माजी जिल्हाध्यक्ष डॉ. बी. एस. पाटील यांच्यात झालेल्या हाणामारीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना देखील धक्काबुक्की झाल्याची घटना 10 एप्रिलला अमळनेर शहरात घडली. या वादानंतर पक्षाचा मेळावा गुंडाळण्यात आला. या दोन घटनांच्या अनुषंगाने काल अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.

पुढार्‍यांना नमस्कार करू नका
पुढार्‍यांना वाकून नमस्कार करू नका पुढारी आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. स्वतःच्या आईवडिलांना किंवा लग्न झालं असेल तर सासू सासर्‍यांना नमस्कार करा असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थी मेळाव्यात तरूणांना दिला. पुढार्‍यांची कुंडली पाहिली तर तुम्हाला वाटेल कुठून अवदसा आठवली आणि यांच्या पाया पडलो असेही अजित पवारांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*