व्होडाफोन, एअरटेलचे रिचार्ज ५० टक्क्यांनी महागणार; मोबाईल कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी ग्राहकांना भुर्दंड

व्होडाफोन, एअरटेलचे रिचार्ज ५० टक्क्यांनी महागणार; मोबाईल कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी ग्राहकांना भुर्दंड

नाशिक । प्रतिनिधी

तोट्यात असणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांनी देशातील प्रीपेड ग्राहकांना दरवाढीचा मोठा धक्का दिला आहे. आघाडीच्या एअरटेल, जिओ, व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड टेरिफ प्लॅन मध्ये ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून व्होडाफोन,  एअरटेल च्या रिचार्जच्या किमती उद्या (दि.३) तर जिओचे सुधारित दर दि.६ डिसेंबर पासून अमलात येणार आहेत.

तीन वर्षांपूर्वी रिलायन्सने जिओच्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केल्यावर मोबाईल सेवा पुरवण्याचे पूर्वीचे असणारे व्हाईस मार्केट हे डाटा मार्केट मध्ये रूपांतरित झालं होते. कारण रिलायन्सचे डाटा दर सर्वाधिक कमी असल्याने स्पर्धेत टिकण्यासाठी इतर कंपन्यांना देखील डाटा चे कमी करावे लागले होते.

परिणामी या कंपन्याचा नफा घसरत जाऊन त्या तोट्यात गेल्या. देशात व्यवसाय करणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्याकडे जमा होणाऱ्या महसुलातून काही भाग ऍडजस्ट ग्रास रेव्हेन्यू (एजीआर )सरकारला द्यावा लागतो. मात्र, एजीआर च्या व्याख्येवरून सन २००५ पासून मोबाईल कंपन्या आणि सरकारमध्ये वाद सुरु होते.

यासंदर्भात सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना दणका दिला आहे. या कंपन्यांनी त्यांच्या व्यवसायातून मिळालेल्या महसुलातून सरकारला तब्बल ९०० अब्ज रुपये देण्यास सांगितले आहे. यात एकट्या व्होडाफोनला ३९० अब्ज रुपये चुकते करावे लागणार असून इतर कंपन्यांना देखील जवळपास एवढयाच रकमांचा भरणा सरकारकडे करावा लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर धाबे दणाणलेल्या दूरसंचार कंपन्यांनी महसुली तूट दाखवत गेल्या तिमाहीत हजारो कोटी रुपये तोटा झाल्याचे सांगत एजीआर परताव्यासाठी  सध्याच्या दरात वाढ करून थेट ग्राहकांकडून ही रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसारच उद्या दि. ३ पासून दरवाढीचे नवे पत्रक लागू करण्यात येणार आहे.

जवळपास पाच वर्षांतील हि पहिलीच दरवाढ असून ग्राहकांना त्यांचे सध्याचे टेरिफ प्लँन सुरु ठेवण्यासाठी रिचार्ज करताना वाढीव ५० टक्के पर्यंत भुर्दंड सोसावा लागणार आहे.  एकमेकांशी स्पर्धा करतांना चाललेल्या दरयुद्धामुळे दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यानी स्वतःहून  आर्थिक संकट ओढवून घेतले आहे.

यामुळे सध्या व्हॉईस कॉल जवळपास मोफत झाला असून  डाटा दरात ९५ टक्क्यांनी कपात होऊन  २०१४ मध्ये प्रति जीबी २६९ रुपये असणारा दर ११ रुपये ७८ पैसे इतका खाली आला आहे. मोबाईल डाटा स्वस्त झाल्याने व स्मार्टफोनचे युग अवतरल्याने जवळपास सर्वांचा अधिक वेळ मोबाईलमध्ये डोके घालण्यातच जात होता. त्यामुळे मोबाईल वापराच्या चांगल्या-वाईट परिणामांवर देखील चर्चा व्हायच्या. आता मोबाईल वापरायचा म्हटले तर रिचार्ज करताना अधिकच भुर्दड बसणार असल्याने ग्राहकांमध्ये देखील दूरसंचार कंपन्यांबद्दल नाराजीचा सूर आहे.

मात्र, मोबाईलची सवय अंगवळणी पडल्याने नवीन दरवाढीला सामोरे जाण्याशिवाय ग्राहकांकडे अन्य पर्याय नसणार आहे. वोडाफोन आयडियाने सर्वात पहिल्यांदा प्री-पेड प्लॅन आणि सेवेसाठी नवीन दर घोषित केले. त्यानंतर भारती एअरटेलनेही आपल्या सर्व मोबाईल प्री-पेड प्लॅनचे दर वाढविण्याची घोषणा केली आहे. वोडाफोन आयडियाने दूसऱ्या नेटवर्क केल्या जाणाऱ्या कॉलसाठी ठराविक मर्यादेनंतर प्रति मिनिट ६ पैसे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

एअरटेलने  वार्षिक प्लॅनमध्ये ४१.१४ टक्के वाढ केली असून  यासाठी २,३९८ रुपये मोजावे लागतील. मर्यादित डाटा प्लॅनसाठी आता ९८८ रुपयांऐवजी  १,४९८ रुपये द्यावे  लागतील. या प्लॅनमधील ही दरवाढ ५० टक्के आहे. तसेच ८४ दिवसांचा सध्याचा  अमर्यादित डाटा प्लॅन आता ६९८ रुपये करुन  तो मर्यादित डाटा प्लॅन मध्ये रूपांतरित करण्यात आला आहे. यात दररोज २ जीबी डाटा व अमर्यादित कॉलिंग असणार आहे.  २८ दिवसांच्या रोज दीड जीबी  डाटा प्लॅनसाठी आता १९९ ऐवजी २४८ रुपये मोजावे लागणार आहेत.

वोडाफोन आयडियाच्या निवदेनानुसार वार्षिक प्लॅनमध्ये ४१.२ टक्के वाढ केली आहे. कंपनीच्या या प्लॅनचा दर १,६९९ रुपयांवरुन २,३९९ रुपये असेल. तसेच रोज दीड जीबी डाटासह ८४ दिवसांच्या प्लॅनचा दर ३१ टक्क्यांनी वाढवून ४५८ रुपयांवरुन ५९९ रुपये केला आहे. १९९ रुपयांचा प्लॅनसाठी आता २४९ आकारले जातील. याशिवाय वोडाफोन आयडियाने दूसऱ्या नेटवर्क केल्या जाणाऱ्या कॉलसाठी प्रति मिनिट ६ पैसे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

जिओनेदखील आपल्या दरात ४० टक्क्यांपर्यँत वाढ केली आहे. रेट्स ऑल इन वन प्लान्स मध्ये ही वाढ होणार असल्याचे जीओकडून सांगण्यात येते. मात्र या दरवाढीनंतर ग्राहकांना ३०० टक्क्यांपर्यंत फायदा मिळणार आहे. जिओ यूजर्सने केलेला रिचार्ज प्लॅन संपल्यावर त्यांना दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी चार्जेस द्यावे लागणार असून त्यासाठी १० ते १०० रुपयांदरम्यानचे टॉप अप व्हाउचर जीओकडून सादर कऱण्यात येणार आहेत. फ्री कॉलिंग सुविधा असणाऱ्या ग्राहकांना त्यांचा सध्याचा प्लॅन संपेपर्यंत इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र त्यासाठी या ग्राहकांना त्यांची व्हॅलिडिटी तपासून घ्यावी लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com