पर्यटनस्थळांवर मिळणार निवासाची दर्जेदार सुविधा

एअर बीएनबी -पर्यटन विभागात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

0
मुंबई : आदरातिथ्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील एअर बीएनबी ही कंपनी आणि राज्य शासनाचा पर्यटन विभाग यांच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
एअर बीएनबी ही पर्यटकांना वाजवी दरात निवास व्यवस्था आणि स्थानिक अनुभव मिळवून देणाऱ्या सेवा-सुविधा पुरविणारी कंपनी असून तिचे जगभरातील १९१ देशांमध्ये जाळे विस्तारले आहे.
आज झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून या देशातील पर्यटकांना महाराष्ट्रात येण्यासाठी एक खात्रीचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सामंजस्य करारानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सामंजस्य करारामुळे पर्यटनाला चालना – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पर्यटनाचा व्यवसाय हा आता बहुतांश ऑनलाईन शिफ्ट झाला आहे. बरेच पर्यटक पर्यटनाला जाण्यापूर्वी सर्व सोयी-सुविधांची ऑनलाईन बुकींग करतात. या पार्श्वभूमीवर एअर बीएनबी समवेत झालेला सामंजस्य करार महत्वपूर्ण आहे.
महाराष्ट्रात ऐतिहासिक पर्यटनस्थळे, सांस्कृतिक वैविध्य मोठ्या प्रमाणात आहे. या पर्यटनस्थळांवर आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय मानके असलेली निवासव्यवस्था उपलब्ध होण्यास आजच्या सामंजस्य करारामुळे चालना मिळेल.

आदरातिथ्य क्षेत्रात ५० हजार लघुउद्योजक तयार करणार- जयकुमार रावल
कार्यक्रमानंतर गरवारे क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत या सामंजस्य कराराबाबत पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, एअर बीएनबी ही कंपनी पर्यटकांना निवासाचा आगळा-वेगळा अनुभव उपलब्ध करुन देते.
स्थानिकांशी समन्वय साधून पर्यटकांना निवासाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच त्यांना स्थानिक संस्कृती, खाद्यपदार्थ, कला-संस्कृती आदींचे दर्शन घडविते. महाराष्ट्रातील घरगुती निवास व्यवस्थांना एअर बीएनबीच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठ मिळणार आहे. या भागिदारीच्या माध्यमातून राज्यभरात आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्रात किमान 50 हजार लघुउद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

श्री. रावल म्हणाले की, राज्यातील दुर्लक्षित असलेल्या पर्यटनस्थळांवर साधन-सुविधांची निर्मिती करुन पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. अशा पर्यटनस्थळांवर निवास व्यवस्थांच्या उपलब्धतेसाठी एअर बीएनबी आणि पर्यटन विभाग एकत्रित काम करेल.

अमरावती येथे विकसीत होत असलेला डिअर पार्क, चिपळूण येथील क्रोकोडाईल पार्क, भंडारदरा, चिखलदरा, सिंधुदूर्ग, सह्याद्रीच्या रांगा, दुर्लक्षित किल्ले, समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे अशा विविध ठिकाणी स्थानिकांसमवेत भागिदारी करुन निवास व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाईल. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळण्याबरोबरच पर्यटकांनाही दर्जेदार आणि खात्रीची निवास व्यवस्था मिळू शकेल.

मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सामंजस्य करारावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, एअर बीएनबी कंपनीचे देशपातळीवरील व्यवस्थापक अमनप्रीत बजाज, संचालक माईक ऑरगिल, प्रादेशिक प्रमुख ब्रेन्ट थॉमस, एमटीडीसीच्या प्रभारी व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, सरव्यवस्थापक स्वाती काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*