Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

Sarvmat live : नगर लोकसभा : राष्ट्रवादीचा लोकसभा उमेदवार दोन दिवसांत जनतेसमोर

Share

‘सार्वमत लाईव्ह’मध्ये फाळकेंचा दावा : पदाधिकार्‍यांकडून एकामेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल, याची उत्कंठा लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. पक्षाचा उमेदवार दोन दिवसात जाहीर होईल, असा ठाम दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला. फेसबुकवरील ‘सार्वमत लाईव्ह’च्या सत्रात राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी एकमेकांना चिमटे काढत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. जिल्ह्यात राजकीय संभ्रम वाढला आहे. नगरची जागा काँग्रेसला गेली, राष्ट्रवादीलाच राहणार अशा एकीकडे चर्चा सुरू असतानाच दुसरीकड़े शिवसेना-भाजपची युती झाली तरी ते मनाने खरंच एकत्र येतील का, अशी शंका उपस्थित होत आहे. ‘सार्वमत फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून पक्ष पदाधिकार्‍यांनी आपली भुमिका मांडली. यामध्ये फाळके यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेनेचे उपप्रमुख जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष निखील वारे सहभागी झाले होते. त्यांना ‘सार्वमत’चे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी बोलते केले.

निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार असणे आवश्यक आहे. त्यामुळे तो पक्षातला आहे का बाहेरचा, याला महत्त्व नाही, असे फाळके यांनी सुरूवातीलाच स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या सभापती अनुराधा नागवडे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल सुरू असलेल्या चर्चेचा संदर्भ त्यांच्या या वक्तव्याला होता. राष्ट्रवादी हा कार्यकर्त्यांच्या जीवावर चालणारा पक्ष असून, येथे सर्व निर्णय श्रेष्ठी घेत असले तरी स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून, त्यांना विश्‍वासात घेऊनच निर्णय होत असतात.
लोकसभेसाठी अद्याप कोणाचीही उमेदवारी निश्‍चित नाही, असे स्पष्ट करत भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड म्हणाले, उमेदवारी निश्‍चित करण्यासाठी पक्षात पार्लमेंटरी बोर्ड असते. त्या प्रक्रियेतूनच उमेदवारी निश्‍चित होते. त्यामुळे आजच्या क्षणी कोणाचीही उमेदवारी निश्‍चित नाही. गेल्या साडेचार वर्षात सरकारचे काम पाहता भाजपला वाढता पाठिंबा आहे. बुथस्तरापर्यंत कार्यकर्ते असल्याने यावेळीही विजय निश्‍चितच असेल. त्यात शिवसेनेशी युती झाल्यामुळे तो आणखी फायद्याचा ठरेल.

शिवसेनेचे उपप्रमुख कार्ले म्हणाले, आमच्याकडे आदेश महत्त्वाचा असतो. पक्षनेतृत्त्वाने युती करण्यात आल्याचे जाहीर केले. तसे आदेश सर्व कार्यकर्त्यांना मिळाले असल्याने या निवडणुकीत युतीनेच सामोरे जाऊ. युतीची घोषणा होण्यापूर्वी आम्ही निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र युती झाल्यामुळे आदेशाप्रमाणेच कार्यकर्ते काम करतील. शिर्डीमध्ये कोण उमेदवार असेल, याबाबत पक्ष ठरवेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खा. सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे एका सभेत सांगितले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष निखील वारे म्हणाले, प्रत्येकजण उमेदवार कोण, कोणता पक्ष याचाच विचार करतो. मतदारांना काय पाहिजे, याचा विचारच कोणी करत नाही. याबाबतही आता पक्षांनी विचार केला पाहिजे. जनतेला काय पाहिजे, हे आपण पाहणार आहोत की नाही? या मुद्याचा विचार केला तर डॉ. विखे हेच उमेदवार आहेत. त्यांचा पक्ष कोणता असेल, चिन्ह कोणते असेल हे आम्हाला कोणालाच माहीत नाही. मात्र ते निवडणूक लढविणार हे मात्र नक्की आहे. त्यांची उमेदवारी ही लोकांसाठी आहे.

भाजपा नव्हे, राष्ट्रवादीचे वर्चस्व!
2014 मधील लोकसभा निवडणूक वगळता त्यापूर्वी दोन्ही निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपचे नव्हे, तर राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. भाजपचा सत्तेत असतानाचा कारभार जनतेने पाहिला असल्यामुळे यावेळी उमेदवार कोणीही असो, विजय राष्ट्रवादीचाच होणार आहे.
– राजेंद्र फाळके

युती एकमेकांसाठी झटणार!
तीनवेळा नगर मतदारसंघावर विजय मिळविल्यामुळे यावेळी त्यात काही फरक पडणार नाही. शिवसेनेशी मने जुळलेली असल्याने नगरमध्ये ते भाजपचे आणि शिर्डीमध्ये भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेचे काम करतील. उमेदवार कोण, यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्ते निश्‍चित झटतील.
-प्रा.भानुदास बेरड

नाराजीत गैर काय?
खासदारांबाबत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये नाराजी असेल, तर ती स्पष्टपणे बोलून दाखविलीच पाहिजे. निवडणुकीत काम करणार्‍या कार्यकर्त्यांना उमेदवार निवडून आल्यानंतर भेटणार नसेल, तर त्याबाबत विचारणा करण्यात काही गैर नाही. आमच्याकडे आदेश महत्त्वाचा असतो. सेनाप्रमुखांचे आदेश कार्यकर्त्यांना मिळाले असल्याने या निवडणुकीत युतीनेच सामोरे जाऊ.
– संदेश कार्ले

होय, मी विखेंचा प्रवक्ता
चर्चेत राष्ट्रवादीचे फाळके आणि काँग्रेसचे वारे यांच्यात शाब्दीक जुगलबंधी रंगली. युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष निखील वारे हे काँग्रेसची भुमिका मांडणार की विखेंची असा सवाल फाळकेंनी उपस्थित केला. त्यावर वारे यांनी ‘मी डॉ. सुजय विखे पाटील यांचा प्रवक्ता आहे. त्यांची बाजू मी मांडणारच’ असे ठासून सांगीतले. बराच वेळ फाळकेंनी हा मुद्दा लावून धरला आणि वारेही आपल्या भुमिकेवर ठाम राहीले.

छावणीवरून नोंकझोंक

दुष्काळाच्या परिस्थितीत चारा छावण्यांना वेळीच परवानगीसाठी भाजपा सरकारने चालढकल केली. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले, अशी नाराजी शिवसेनेचे संदेश कार्ले व्यक्त केली. भाजपाने जनता आणि शेतकर्‍यांसाठी काम केल्यास त्यांच्याबाबत असलेली नाराजी कमी होईल, असा टोमणा त्यांनी मारला. त्यावर फाळके यांनी ‘भाजपा आणि सेनेची भूमिका तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’ अशी असल्याचा चिमटा काढला. छावण्या ऑक्टोबरपासूनच सुरू होणे अपेक्षित असताना शिवसेना मात्र आता जागी झाली आहे, असेही फाळके म्हणाले.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=653992961670860&id=100011804856850

लाईक आणि शेअर करायला विसरु नका.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!