नेहरू मार्केटच्या जागेचा वाद पेटला

0

जागा घशात घालण्यासाठी खा. गांधी यांचा प्रयत्न : दत्ता कावरे यांचा आरोप  

अहमदनगर (प्रतिनिधी) – भाजपांतर्गत सुरू असलेली गटबाजी अजूनही थांबायला तयार नाही. खासदार दिलीप गांधी गटाने स्थायी समितीत नियुक्त केलेल्या आगरकर गटाच्या दोघा सदस्यांचे निलंबन करण्याचा प्रकार हा नेहरू मार्केट जागेच्या मोहापायी असून नेहरू मार्केटचा कोट्यवधी रुपयांचा भूखंड कोणाच्या घशात घालणार, हे गांधी यांनी नगरच्या जनतेला जाहीरपणे सांगावे असे आव्हान भाजपचे आगरकर समर्थक नगरसेवक दत्ता कावरे यांनी दिले आहे.

महापालिकेतील राजकारणावरून खासदार गांधी व आगरकर गटात सुरू असलेली पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. खासदार गांधी यांच्याच सांगण्यावरून मनेष साठे हे आगरकर यांच्यावर टीका करत आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीवेळीही खासदार गांधी यांनी राष्ट्रवादीसोबत घरोबा केला होता, हे जनता अजूनही विसरलेली नाही. प्रदेश भाजपने किंवा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून खासदार गांधी यांनी स्थायी समिती सदस्य नियुक्तीबाबत कोणतीही सूचना गटनेता या नात्याने मला केली नाही. त्यामुळे मला जे वाटले त्यांची नावे मी सुचविली असल्याचे कावरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

नेहरू मार्केटच्या जागेची किंमत आताचे बाजारमूल्य पाहता 9 कोटी इतकी आहे. मात्र ही जागा सव्वादोन कोटी रुपयांत कोणाच्या घशात घातली जाणार होती. त्याला विरोध केला म्हणूनच तो ठरावच विखंडित झाला. ही जागा पुन्हा कवडीमोल भावाने मिळावी यासाठी गांधी यांना त्यांचे समर्थक नगरसेवक स्थायी समितीत पाठवयाचे असल्याचा उद्देश असल्याचे कावरे यांचे म्हणणे आहे.

नेहरू मार्केटचा भूखंड कवडीमोल किमतीने कोणाच्या घशात जाणार होता, हे खासदार गांधी यांनी जाहीर करावेच. त्यातून महापालिकेचे सात कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे, याकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. आता स्थायी समितीत समर्थक पाठवून त्यांना पुन्हा तो भूखंड कोणाच्या घशात घालयचा हेही त्यांनी सांगावे असे आवाहन कावरे यांनी केले आहे. 

LEAVE A REPLY

*