‘नियोजन’च्या 36 जागा रिक्त असतानाही सभेचा घाट

0

पालकमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडीत गाठण्याची शक्यता?

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका क्षेत्रातील 36 सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. या जागांवर सदस्य निवडण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने राज्य सरकारकडे निवडणुकीचा प्रस्ताव पाठविलेला आहे. अशा परिस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचा घाट सोमवार दि. 19 रोजी घालण्यात आला आहे. यावेळी निधी कपात करण्याच्या मुद्द्यावरून पालकमंत्री राम शिंदे व काँग्रेस राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा नियोजन समितीमध्ये 50 सदस्य आहेत. यात जिल्हा परिषदेच्या 71 सदस्यांमधून 33 सदस्यांचा या ठिकाणी समावेश आहे. 7 सदस्य हे नगरपालिका, महापालिका क्षेत्रातून या ठिकाणी निवडून देण्यात येतात. मार्च महिन्यात जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या आहेत. या निवडणुकीत 73 जिल्हा परिषद जागांपैकी एक जागेवर निवडणूक झालेली नसून पांगरमल दारूकांडात आरोपी असणारी एक महिला सदस्य फरार आहे. यामुळे 71 जिल्हा परिषद सदस्यांमधून जिल्हा नियोजन समितीत 33 सदस्य निवडून देण्यात येणार आहेत. तर नव्याने स्थापन होऊन निवडणुका झालेल्या नगरपालिका हद्दीतून 3 सदस्य असे 36 सदस्य जिल्हा नियोजन समितीत निवडून देणे बाकी आहेत. यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या सध्या 36 जागा रिक्त आहेत.
पालकमंत्र्यांना नियोजन समितीत सहा जणांना नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्याचे अधिकार आहेत. समितीच्या उर्वरित चार सदस्यांमध्ये स्वत: पालकमंत्री अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्षा पदसिद्ध सदस्या, जिल्हाधिकारी सचिव आणि वैधानिक विकास मंडळाचा प्रतिनिधी असे 50 सदस्य जिल्हा नियोजन समितीत आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त जागा निवडणुकीद्वारे भरण्यासाठी समितीने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविलेला आहेत. मात्र, अद्याप त्यावर कोणताच निर्णय झाला नसल्याचे नियोजन समितीच्या कार्यालयातून सांगण्यात आले. याच दरम्यान, समितीची सोमवारी बैठक बोलाविण्यात आली असून या बैठकीला गणपूर्तीची (कोरम) आवश्यकता नसल्याचे सहयक नियोजन अधिकारी एस. बी. वर्‍हताळे यांनी सांगितले.
या बैठकीत मागील बैठकीप्रमाणे पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या निधीला कात्री लावल्यास या ठिकाणी त्यांना विरोध कोण करणार असा प्रश्‍न या निमित्ताने राहणार आहे. यामुळे पुन्हा पालकमंत्री शिंदे विरोधात जिल्हा परिषदेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
गोंधळाची शक्यता
दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या कार्याकर्त्यांच्या बैठकीत आ. दिलीप वळसे यांनी भाजपकडून जाणीवपूर्वक जिल्हा नियोजन समितीची निवडणूक लांबविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता. जिल्हा नियोजन समितीत आमदार हे निमंत्रित सदस्य असून या ठिकाणी ठराव पास करण्याचे अधिकारी जिल्हा परिषद आणि सदस्यांना असल्याची माहिती दिली होती. यामुळे भविष्यात जिल्हा नियोजन समितीत गोंधळ होण्याची शक्यता वाढली आहे.

LEAVE A REPLY

*