Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

जिल्हा परिषद अध्यक्ष निवड : अखेर भाजपा रिंगणात

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले आणि काँग्रेसचे प्रताप शेळके यांची नावे निश्चित झाली. त्यानंतर भाजपानेही पदाधिकारी निवडीसाठी उमेदवार मैदानात उतरविण्याचे ठरविल्याने निवडी बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. भाजपाकडून अध्यक्षपदासाठी सुनिता खेडकर आणि उपाध्यक्ष पदासाठी संध्या आठरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता दुपारी 3 वाजता पदाधिकारी निवडीसाठी मतदान होईल.

तत्पूर्वी महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले, उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे प्रताप शेळके यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय झाला. हॉटेल राज पॅलेस येथे महाविकास आघाडीच्या बैठकीला नेत्यांसह जिल्हा परिषद सदस्य हजर होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक अंकुश काकडे, काँग्रेसचे प्रकाश मुगदीया, शिवसेना निरीक्षक भाऊ कोरेगावकर, आ.रोहित पवार, आ. आशुतोष काळे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, शशिकांत गाडे, क्रांतिकारी पक्षाचे सुनील गडाख, बाळासाहेब सांळुके, प्रताप ढाकणे आदी उपस्थित आहे.

यावेळी नेत्यांनी राजश्री घुले व प्रताप शेळके यांचे नाव जाहीर केल्यानंतर त्यांचा सत्कार केला.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी अर्ज घेतले. भाजपच्या या भूमिकेमुळे जिल्हा परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे सध्यातरी स्पष्ट झाले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे सदस्य दुपारी तीन वाजता हॉटेल राज पॅलेस येथून एका बसमधून मतदानासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहाकडे रवाना होणार आहे.

 

विखे अलिप्त
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या राजकारणावर वर्चस्व राखणार्‍या विखे गटाने सध्या अलिप्त धोरण आखल्याचे दिसून येत आहे. विद्यमान अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी आधीच आपण पुन्हा पदासाठी इच्छुक नसल्याचे जाहीर केल्याने विखे गटाच्या धोरणावर शिक्कामोर्तब झाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!