शेवगावच्या राजकारणात जिल्हा परिषद वेठीस

0

एका आरोग्य केंद्राच्या मान्यतेसाठी सोमवारी विशेष सर्वसाधारण

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची मोडकळीस आलेली इमारत व निवासस्थाने निर्लेखन करून नव्याने बांधकाम करण्याचा विषय गेल्या पंधरा दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. हा विषय राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे केवळ या एका केंद्राच्या मान्यतेसाठी येत्या 13 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली आहे. उपाध्यक्षा राजश्रीताई घुले आणि सदस्या हर्षदा काकडे यांच्या शेवगावमधील राजकारणात संपूर्ण जिल्हा वेठीस धरला जात आहे.
दहा दिवसांपूर्वीच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ढोरजळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने उभारण्यावरून उपाध्यक्ष घुले व सदस्या काकडे यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. ढोरजळगाव येथील जुनी इमारत पाडून तेथे नव्याने इमारत उभारण्याची भूमिका घुले यांनी घेतली तर ढोरजळगाव येथे इमारत न करता शेवगाव शहरात ती उभारावी असा आग्रह काकडे यांचा आहे. त्यातून 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेत दीड तास वादळी चर्चा झाली. परंतु त्या सभेत काहीच निर्णय होऊ शकला नाही. विशेष म्हणजे अध्यक्षांनी केवळ या विषयावरच सभागृहात मतदानाची प्रक्रिया राबविली. घुले व काकडे यांच्यातील संघर्ष पाहून अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतला. त्यात काकडे यांच्या बाजूने केवळ चार ते पाच सदस्यांनी हात वर केला होता.
अर्थात काकडे या अपक्ष सदस्य असून जिल्हा परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत काकडे यांनी अध्यक्षांना मतदान केले आहे. त्यामुळे त्या विखे गटाच्या मानल्या जातात. परंतु घुले यांनी ढोरजळगाव येथील आरोग्य केंद्राचा विषय चांगलाच प्रतिष्ठेचा केल्याने अध्यक्षा विखे यांना अखेर घुलेंच्या बाजूने कौल द्यावा लागला आहे. या आरोग्य केंद्र उभारणीसाठी चार कोटी निधी मंजूर झाला असून त्यात तीन केंद्रांचे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. त्यात शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव, कोपरगाव तालुक्यातील चासनळी व राहुरी तालुक्यातील बारागावनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या विस्तारीकरणासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे.
शेवगाव हे आता नगरपालिका हद्दीत आल्याने याठिकाणी जिल्हा परिषदेला खर्च करता येणार नाही. नियोजन समितीकडून यापूर्वी शेवगावसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले होते. परंतु नगरपालिका झाल्याने तसेच शेवगावमध्ये ग्रामीण रुग्णालय उभारण्यात येणार असल्याने मंजूर करण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र तालुक्यातील घोटण येथे नेण्याचा ठराव करण्यात आला असून त्याला मंजुरी देखील मिळाली आहे. त्यामुळे शेवगावमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभे करणे योग्य नसतानाही काकडे यांनी तेथे केंद्र उभारण्याचा आग्रह धरला. अर्थात ढोरजळगाव येथे हे केंद्र उभारण्यात येऊ नये म्हणून काकडे यांचा विरोध होता. परंतु तोही आता घुलेंनी हाणून पाडला आहे.
13 नोव्हेंबरला बोलविण्यात आलेली सभा केवळ ढोरजळगाव येथील केंद्राची इमारत पाडणे व नव्याने बांधकामास मान्यता देणे यासाठी आहे. यावेळी घुले काकडे यांच्या आणखी कोणते राजकीय नाट्य रंगणार याकडे जिल्हा परिषदेचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*