जिल्हा हागणदारीमुक्त, मुंबईत जिल्हा परिषदेचा गौरव

0

बबनराव लोणीकर : सरकारी यंत्रणाच्या समन्वयातून प्रयत्नांना यश

अहमदनगर (प्रतिनिधी) – स्वच्छतेच्या कामात महात्मा गांधी, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांनी महान कार्य केले आहे. त्याचा आदर्श ठेऊन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छतेसाठी लोकसहभागातून चळवळ राबविण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण देश 2 ऑक्टोबर 2019 पर्यत हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुदतीच्या दीड वर्षे आधीच आपले राज्य हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार केला. त्यानुसार संपूर्ण राज्यभरात शौचालय निर्मितीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केले. राज्यातील ग्रामीण 34 पैकी 32 जिल्हे हागणदारीमुक्त झाले असून राहिलेले दोन जिल्हे येत्या आठवडाभरात हागणदारी मुक्त होऊन राज्य हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा केली जाईल, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

मुंबई येथे हागणदारी मुक्त अहमदनगरसह सात जिल्ह्यांचा सत्कार सोहळा लोणीकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे-पाटील, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके, गट विकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे, डॉ.वसंत गारूडकर, डॉ.जगदीश पालवे, समर्थ शेवाळे, स्वच्छता कक्षाचे सुभाष कराळे, सचिन वाघ, सचिन थोरात, दीपाली जाधव, मनोज सकट, राहुल झिने, किशोर म्हस्के, प्रशांत जगताप, भागवत गोल्हार, ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, कुंडलिक भगत आदी उपस्थित होते.

अध्यक्षा विखे पाटील म्हणाल्या, जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला तेव्हा आधी स्वत:चे लोणी गाव हागणदारीमुक्त केले. या कामाची सुरूवात स्वत:च्या गावापासून केली. आठ दिवसांत चाळीस हजार लोकसंख्येचे लोणी गाव हागणदारीमुक्त केले. त्यानंतर अन्य गावात जाऊन प्रबोधन सुरू केले. जिल्हा परिषद शाळेतील मुलांशी संवाद साधला. त्यांना त्यांच्या घरी शौचालयांचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रोत्साहन दिले.

बचत गटांच्या मेळाव्यात प्रबोधन केले. अनेक ठिकाणी अडचणी आल्या, परंतु, सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले. जिल्ह्यात पाण्याची परिस्थिती चांगली असली तरी सध्या पाणी योजना अडचणीत आहेत. या पाणी योजना चालू करण्यासाठी सहकार्य केल्यास खर्‍या अर्थाने हागणदारीमुक्ती यशस्वी होण्यास मदत होईल.

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके म्हणाल्या, नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, पाथर्डीसह अकोले तालुक्यातील दुर्गम भागात हागणदारीमुक्तीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. शौचालयांची उभारणी करतानाच सांडपाणी व्यवस्थापन, मासिक पाळी व्यवस्थापन याबाबत विशेष काम चालू आहे. ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे म्हणाले,

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हागणदारीमुक्तीचे काम करण्यात आले आहे. मंत्री लोणीकर यांनी दिलेल्या प्रेरणेतून राज्यातील 22 हजार ग्रामसेवकांनी रात्रंदिवस काम केले. या कामात जिल्हा परिषद पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे योगदान असून स्वच्छतेच्या कामाची प्रक्रिया निरंतर चालू राहील. शौचालय बांधल्यानंतर आता त्याचा पूर्ण वापर होईल, ग्रामसेवक दक्ष राहून प्रबोधन करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

*