बदलीच्या धास्तीने शिक्षक सलाईनवर

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– फेबु्रवारी 2017 च्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयानूसार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. राज्य सरकारच्या सरल या पोर्टलवर बुधवारअखरे जिल्ह्यातील 99. 52 टक्के शिक्षकांची नोंदणी झाली असून 100 टक्के नोंदणी झाल्यानंतर कोणत्याही क्षणी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे बदलीचे आदेश निघणार आहेत. बदलीच्या धास्तीने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक सलाईनवर असून 10 वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या शिक्षक बदलीस पात्र असल्याने या शिक्षकांचा जीव टांगणीला आहे. जिल्ह्यात असे 6 हजार 800 शिक्षक आहेत.

राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने यंदा प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी राज्यपातळीवर एकच पध्दत अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी फेबु्रवारी 2017 ला शासन निर्णय काढत अवघड आणि सोपे क्षेत्रातील प्राथमिक शाळांची घोषणा केलेली आहे. यानूसार यंदा प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. यात अवघड क्षेत्रात काम करणार्‍या शिक्षकांना बदलीचा अधिकार मिळणार आहे. तर सरल क्षेत्रात दहा वर्षापेक्षा अधिक सेवा झालेल्या शिक्षकांवर बदलीची टांगती तलवार राहणार आहे. ग्रामविकास विभागाने फेबु्रवारी महिन्यांत काढलेल्या बदल्यांच्या शासन निर्णया विरोधात नगरसह अन्य जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक उच्च न्यायालयात लढा दिला. मात्र, न्यायालयाने राज्य सरकार आणि शिक्षकांची बाजू ऐकून घेत सरकारच्या बाजूने निर्णय देत शिक्षकांच्या बदल्या अनिवार्य असल्याचा निकाल दिलेला आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर शिक्षकांच्या बदल्यांसाठी ऑनलाईन सरल या पोर्टलवर चार प्रकारात माहिती भरण्यात आली. यात विशेष संवर्ग (1) यात 9 प्रकारातील शिक्षक बदलीसाठी पात्र आहेत. विधवा, अपंग, मतीमंद मुलांचे पालक, जन्मजात एकच किडणी, जन्मजात हृदय पिडीत यांचा समावेश आहे. हे शिक्षक बदलीसाठी पात्र असून यांना सेवेची अट नाही. विशेष संवर्ग (2) मध्ये पती-पत्नी एकत्रीकरण होणार आहे. यात पती-पत्नीच्या शाळाचे अंतर 30 किलो मीटरच्या आत आले तरी या ठिकाणी त्यांच्या बदल्या होणार आहेत. विशेष संवर्ग (3) मध्ये अवघड क्षेत्रातील शाळांचा समावेश आहे. यात तीन वर्षे अवघड क्षेत्रातील शाळा, आदिवासी क्षेत्रातील शाळा आणि नक्षलवादी भागातील शाळेत 3 वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांना बदलीचा अधिकारी मिळणार आहे. सर्वसाधारण संवर्ग यात उर्वरित सर्व शिक्षक ज्यांची 10 वर्षापेक्षा अधिक सेवा झालेली आहेत. या शिक्षकांची बदली होणार आहे.

जिल्ह्यात बदलीचा अधिकार प्राप्त असणार्‍या शिक्षकांची संख्या 1 हजार 275 असून यांनी मागणी केलेल्या बदल्या ठिकाणी 10 वर्षेपेक्षा अधिक सेवा झालेला शिक्षक कार्यरत असल्यास त्या शिक्षकांची बदली होणार आहे. सर्व काम संगणकाच्या एका प्रोग्रामव्दारे होणार आहे. शिक्षकांनी स्वत: भरून दिलेल्या माहितीनूसार त्यांची सेवेची कुंडलीच सरल प्रणालीत तयार झाली असून जिल्ह्यातील शिक्षकांची नोंदणी पूर्ण झाल्यावर कोणत्याही क्षणी राज्याचे मुख्य सचिव आसीम गुप्ता यांनी संगणकाची एक कळ बदल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांना त्यांच्या बदलीचे ठिकाणी कळणार आहे.

राज्यात अमरावती, सोलापूर, सातारा, परभणी, लातूर, जालना, आणि धुळे या जिल्ह्याची शंभर टक्के नोंदणी झालेली असून त्यांचे आदेश निघू शकता, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. सरल प्रणालीत चुकीची माहिती भरणार्‍या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. 

गुरूवारी सुटी असतांनाही नगरजिल्ह्यातील 30 ते 35 शिक्षकांची ऑनलाईन माहिती सरल प्रणालीत भरणे बाकी असल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग सुरू ठेवण्याचे आदेश शासन पातळीवरून देण्यात आले होते. त्यानूसार दिवसभर शिक्षण विभाग शिल्लक शिक्षकांची माहिती ऑनलाईन भरून घेत होते. शंभर टक्के नोंदणी झाल्यानंतर कधीही शिक्षकांच्या बदल्या होवू शकतात, असे यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*