जिल्हा परिषद : शिक्षण समितीची सभा बारगळली

0

ऐनवेळी सदस्यांना धाडले निरोप, सदस्यांमध्ये नाराजी, अधिकारी-पदाधिकारी यांच्यात विसंवाद असल्याचे पुन्हा उघड

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेत कोणत्याही विषय समितीच्या बैठक घेण्यापूर्वी किमान आठ दिवस संबंधित विषय समितीच्या सदस्यांना कळवण्याची परंपरा आहे. मात्र, या परंपरेला विद्यमान सदस्य मंडळात छेद देण्यात येत असल्याचे चित्र आहे. स्थायी समितीनंतर सर्वात पावरफुल असणार्‍या प्राथमिक शिक्षण समितीच्या मासिक सभेचे निमंत्रण सदस्यांना ऐनवेळी दिल्याने त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. यामुळे सोमवारी शिक्षण समितीची सभा तहकूब करण्याची वेळ आली.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.20) शिक्षण समितीची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या समितीच्या सभेची विषयपत्रिका आणि अजेंडा सभेच्या दोन ते तीन दिवस आधी समितीच्या सदस्यांना पाठवण्यात आला. काहींना सभेचा अजेंडा रविवारी मिळाला तर काहींना सोमवारी सकाळी मिळाला. यापूर्वी असे कधीही झालेले नाही. मात्र, आता जिल्हा परिषदेत वेगळ्या प्रथा आणि परंपरा सुरू होऊ पाहत असल्याने काही सदस्यांनी सभेकडे चक्क पाठ फिरवली.
शिक्षण समिती दहा सदस्य आहेत. यापैकी उपाध्यक्षा घुले, कोपरगावच्या सदस्या विमलताई आगवण, राहुरीचे सदस्य शिवाजी गाडे आणि श्रीगोंद्यातील सदस्या सुवर्णाताई जगताप उपस्थित राहिल्या. सभेचा कोरम पूर्ण होण्यासाठी सात सदस्यांची आवश्यकता असून कालच्या सभेला केवळ चार सदस्य उपस्थित राहिल्याने उपाध्यक्ष घुले यांना सभा तहकूब करण्याची वेळ आली. त्यानंतर सदस्य गाडे आणि जगताप सभेच्या प्रोसिडींगवर सह्या करून निघून गेले.
या सभेला सदस्य तथा भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे, काँग्रेसचे सदस्य राजेश परजणे, पारनेरचे सभापती राहुल झावरे आणि पारनेरच्या सदस्य उज्वला ठुबे यांनी गैरहजर राहणे पसंत केले. शिक्षण समितीत अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या संवाद राहिलेला नाही. ऐनवेळी सभा बोलवण्या मागील गौडबंगाल काय? असा असा सवाल काही सदस्यांनी उपस्थित केला आहे. तसेच यापुढे सभेचा अजेंडा किमान आठ दिवस अगोदर सदस्यांना उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करून सभा बोलवण्यात यावी, अशी मागणी काही सदस्यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेची शिक्षण समितीची सभा सोमवारी बारगळली. यातून शिक्षण विभाग आणि पदाधिकारी यांच्या समन्वय नाही. ऐनवेळी सदस्यांना अजेंडा पाठवून सदस्यांना सभेला उपस्थित राहून न देण्याचा या मागे डाव असण्याची शक्यता आहे.
– जालिंदर वाकचौरे, सदस्य शिक्षण समिती.

LEAVE A REPLY

*