जिल्हा परिषदेच्या 627 जागा रिक्त : ऑनलाईन पध्दतीने होणार भरती

0

राज्य सरकारने मागवली माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतर्गत नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी यापुढे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. एवढेच नव्हेतर उमेदवारांची निवड न्युनतम पात्रता गुण प्रमाणे केली जाणार आहे.दरम्यान नगर जिल्हा परिषदेत 24 संवर्गातील 627 जागा रिक्त असून यासाठी लवकरच ऑनलाईन भरती प्रक्रीय होणार आहे. राज्य सरकारने रिक्त जागांचा तपशील जिल्हा परिषदेकडून मागवला आहे.
यापूर्वी जिल्हा परिषदेतील क वर्ग संवर्गातील भरती प्रक्रिया ही जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीमार्फत राबवली जात होती. वर्ग 3 च्या पदांची भरती करीत असतांना परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका तयार करणे, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य जिल्हास्तरीय अधिकार्‍यांचा बराच वेळ व श्रम यांचा अपव्यय होत असे. त्याचा विपरीत परिणाम इतर विकास कामांवर होतो. त्यामुळे ग्राम विकास विभागाने यापुढे ही भरती ऑनलाईन परीक्षेद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे.
या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गासाठी 500 रूपये व मागासवर्गीयांसाठी 250 रूपये असे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. हा शुल्क नेट बँकींग, क्रेडिट/डेबीट कार्ड, ई-वॅलेट, स्टेट बँकेच्या चलनाद्वारेच स्वीकारले जाणार आहे. एका उमेदवाराला एक किंवा अनेक संवर्गातील पदांसाठी अर्ज करण्याची मुभा राहिल. पण प्रत्येक पदासाठी त्याला स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारले जाईल. उमेदवारांना अर्ज करताना त्यांना कोणत्या जिल्हा परिषदेत नियुक्ती हवी आहे. त्याबाबत त्यांना 1 ते 34 असे जिल्हा परिषदांसाठी पसंतीक्रम द्यावा लागेल.
प्रत्येक संवर्गाची गुणवत्ता यादी व त्या संवर्गातील कट ऑफ मार्क्स (न्युनतम पात्रता गुण) प्रसिध्द करण्यात येतील. कट ऑफ मार्क्स प्रमाणे निवड केलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे सेवाप्रवेश नियमानुसार तपासण्याची कार्यवाही त्यांच्या मूळ जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांमार्फत करण्यात येईल. व तपासणीचा निकाल ऑनलाईन स्वाफ्टवेअरवर अपलोड करण्यात येणार आहे. तपासणीअंती ज्या उमेदवारांची कागदपत्रे सेवा प्रवेश नियमानुसार योग्य असतील अशा उमेदवारांना नियुक्तीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.
राज्य सरकारने ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नुकत्याच राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाचे उपअभियंता यांना मुंबईला बोलवून त्यांची कार्यशाळाही घेतली होती. त्यानंतर ऑनलाईन भरतीचे आदेश गेल्या आठवड्यात काढण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील 34 सवंर्गातील 627 जागा सध्या रिक्त आहेत. यात पेसा (आदिवासी भाग)मधील 31, आदिवासी भागा बाहेरील 596 जागांचा यात समावेश आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या रिक्त जागांचा तपशील समक्षक मुंबईला जावून ग्रामविकास विभागाला सादर केला आहे.

विभागनिहाय रिक्त जागा –
औषध निर्माण अधिकारी (आरोग्य) 8, वरिष्ठ साहय्यक (अर्थ) 2, आरोग्य सेवक पुरूष हंगामी फवारणी कर्मचारी (आरोग्य) 147, आरोग्य सेवक पुरूष (आरोग्य) 82, आरोग्य सेविका महिला (आरोग्य) 329, अंगणवाडी पर्यवेक्षीका अनुसूचित क्षेत्र (महिला बालकल्याण) 1, पर्यवेक्षीका निवडीने (महिला बालकल्याण) 4, वरिष्ठ साहय्यक (सामान्य प्रशासन) 4, पशूधन पर्यवेक्षक (पशूसंवर्धन) 2, कनिष्ठ साहय्यक (अर्थ) 2, प्रयोग शाळा तंत्रज्ञ (आरोग्य) 4, कनिष्ठ लेखाधिकारी (अर्थ) 1, कंत्राटी ग्रामसेवक (ग्रामपंचायत) 37, स्थापत्य अभियांत्रिकी साहय्यक 4 यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*