विखे वारी कोतकरदारी!

0

कोतकरमळ्यात मामांच्या घरी जेवणावळ सावेडीत संध्याकाळी स्नेहमेळावा

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत एका रात्रीतून भाजपवासी झालेल्या ‘कोतकर काँग्रेस’ने डॉ. सुजयदादा विखेंना हँग केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही काँग्रेस पुन्हा डॉक्टरांच्या ‘ओपीडी’त दाखल झाली आहे. त्यामुळं डॉक्टरांनीही थेट केडगावात कोतकरांच्या दारी सवारी केली. डॉ. विखे यांनी कोतकरांकडे जेवण करत आज दिवसभर केडगाव, सावेडी पिंजून काढले.
महापालिका निवडणुकीत काँग्रेसची सगळी धुरा डॉ. सुजय विखे यांच्या खांद्यावर होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या रात्री केडगावची कोतकर काँग्रेस भाजपात डेरेदाखल झाली. त्यामुळं काँग्रेसला उमेदवारी देताना दमछाक झाली. अर्थात ‘सोधा’ पक्षाच्या ‘साहेबांचा’ हा चमत्कार होता. मात्र तो फार टिकला नसल्याचे आज स्पष्ट झाले. भाजपचे उमेदवार असलेले सुनीलमामा कोतकर यांनी ‘घरवापसी’चा निर्णय जवळपास घेतला आहे. त्यामुळंच डॉ. विखे यांनी केडगाव दौर्‍यात त्यांच्याकडे भोजनाचा (आ)स्वाद घेतला. त्यापूर्वी त्यांनी भानुदास कोतकरांच्या भावकितील युवराज कोतकर यांच्या मळ्यात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आरोग्य शिबिर अन् स्थानिकांच्या भेटीगाठीतून डॉक्टरांनी केडगावात काँग्रेसचा खुंटा मजबूत करत शहराकडे धाव घेतली.

माजी उपनगराध्यक्ष लियाकत शेख यांच्या निधनामुळं त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन करत विखे डॉक्टरांनीं विडी कामगार महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेविका मिस्टर निखील वारे, बाळासाहेब पवार यांच्या माध्यमातून सावेडीत भेटीगाठी करून डॉक्टरांनी शहरात जोरदार एन्ट्री मारली.

माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या पुढाकारातून सायंकाळी सावेडीत स्नेहमेळावा आयोजित करत विखे यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. महापालिका निवडणुकीत नगरी राजकारणाच्या डावपेचाचा अंदाज घेत डॉक्टरांनी ‘सोधा’चा आदमास घेतला. आता ते ‘तेल चोपडून’ नगरी आखाड्यात उतरले आहेत. ‘मी कोणाला घाबरत नाही, कोणाच्या दबावामुळं घरात बसणार नाही’ असा स्पष्ट करणार्‍या डॉक्टरांनी आपली वाट‘चाल’ सुरू ठेवली आहे. लोकसभा निवडणूक लढविणारच असा पण केलेल्या डॉक्टरांनी केडगाव काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा एकदा भक्कम केला आहे. केडगाव पिंजून काढत विखे यांनी आज त्यावर शिक्कामोर्तब केले.

केडगावात घर अन् संदीपला जेवण
केडगावातील शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना डॉ. सुजय विखे म्हणाले की, केडगावची प्रतिमा मलीन झाली आहे. केडगावचा विकास कसा होईल, येथे लोक कसे येतील याचे व्हिजन तयार आहे. मी खासदार झालो तर केडगावात घर बांधणार आहे. ज्यांना भेटायाला यावं वाटेल त्यांनी केडगावात यावे. त्यासाठी जागा मात्र तुम्हालाच द्यावी लागेल. कारण निवडणूक झाल्यावर माझी परिस्थिती नसेल. केडगावातील घरामुळे जेवणाची पण चांगली सोय होईल. नॉन व्हेज खायचा तर संदीप आणि व्हेज खायच तर न्यू सचिन… असं म्हणताच एकच हशा पिकला. खासदार विखे जर केडगावमध्ये राहत असतील तर शंभर टक्के केडगाव चांगले असेल असं चित्र निर्माण होईल.

महापालिका निवडणुकीच्यावेळी फक्त उमेदवारी मिळालेल्यांनीच भाजपात प्रवेश केला होता. बाकी सगळे काँग्रेसमध्येच होते. ते सक्रिय झाले. माझ्या घरी विखेंचे जेवण हा पक्षीय कार्यक्रम नाही. शिबिराच्या निमित्ताने आलेले डॉक्टर सुजयदादांना स्नेहामुळं आमत्रंण दिले. यापेक्षा वेगळे काही नाही.
– सुनीलमामा कोतकर, माजी नगरसेवक
………………

LEAVE A REPLY

*