जामखेडमध्ये दरोडेखोरांच्या हल्ल्यात २ जण गंभीर जखमी

0
जामखेड : जामखेड तालुक्यात चोरटे, दरोडेखोरांनी धुमाकुळ घातला असून नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. जामखेडच्या धोत्री गावात दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरोडे खोरांकडून वस्तीवरील नागरिकांची लुटी बरोबरच मारहाणीच्या प्रकाराने तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

धोत्री गावातील अजिनाथ निवृत्ती जाधव हे त्यांच्या कुटुंबासह शेतात वस्तीवर असतात. मध्यरात्री अंदाजे ८ ते १० दरोडेखोरांनी जाधव यांच्या घरावर हल्ला केला. धारदार हत्याराने आजीनाथ निवृत्ती जाधव (वय ६०) आणि नर्मदा आजीनाथ जाधव (वय ५५) यांच्यावर वार केले. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोन मुले सुना नातवंडे यांनादेखील जबर मारहाण करून ७५ हजारांची दागिने रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.

दरम्यान; घटनेची माहिती समजताच तत्काळ ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या हल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं. दरोडेखोरांच्या हल्यात अजिनाथ जाधव हे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. जामखेड मध्ये गेल्या काही दिवसापासून खुनी हल्ले, चोरीच्या घटना, रस्ता लुटीचे प्रकार यामध्ये वाढ झालेली आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने जातीने लक्ष घालवे व वाढती गुन्हेगारी रोखावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*