Thursday, April 25, 2024
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ने मारली बाजी

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ने मारली बाजी

अहमदनगगर (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रातून नगरच्या वात्सल्य प्रतिष्ठानच्या ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ हे नाटक प्रथम आले. सतीश लोटके यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली. रंगकर्मी प्रतिष्ठानच्या ‘महापात्रा’ या नाटकास द्वितीय, तर पहिल्यांदाच स्पर्धेत उतरलेल्या कोपरगावच्या संकल्पना फाउंडेशनच्या ‘षडयंत्र’ने तृतीय क्रमांक पटकावला.

- Advertisement -

स्पर्धेत प्रथम आलेल्या ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ने अंतिम फेरीत धडक मारली. अभिराम भडकमकर यांनी लेखन केलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन सतीश लोटके यांनी केले. देवावरील श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर भाष्य करणारे नाटक प्रेक्षकांना चांगलेच रूचले होते. या नाटकात अनेक नवखे कलाकार होते. स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळालेल्या महापात्रा या नाटकाचे लेखक अरविंद लिमये, तर दिग्दर्शक शैलेश देशमुख आहेत. एका स्त्रीचा संघर्ष या नाटकात अधोरेखित केला गेला. स्पर्धेत प्रथमच उतरलेल्या कोपरगावच्या संकल्पना फाउंडेशनने तृतीय क्रमांक पटकावला. सुरेश जयराम यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. किरण लद्दे यांनी केले होते. याही नाटकातील बहुतांश कलाकार पहिल्यांदाच रंगमंचावर आले होते.

स्पर्धेतील अन्य पारितोषिके पुढीलप्रमाणे

दिग्दर्शन : प्रथम – सतीश लोटके (ज्याचा त्याचा प्रश्न), द्वितीय – शैलेश देशमुख (महापात्रा).

प्रकाश योजना : प्रथम – गणेश लिमकर (महापात्रा), द्वितीय – मुन्ना सय्यद (ज्याचा त्याचा प्रश्न).

नेपथ्य : प्रथम – दीपक ओहोळ (नागपद्म), द्वितीय – नाना मोरे (महापात्रा).

रंगभूषा : प्रथम – युक्ता ठुबे (तुक्याची आवली), द्वितीय – प्रांजल सपकाळ (षडयंत्र).

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक – दीपक शर्मा (ज्याचा त्याचा प्रश्न), अश्विनी अंचवले (तुक्याची आवली).

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : श्रृती देशमुख (महापात्रा), रेवती शिंदे (ज्याचा त्याचा प्रश्न), श्रध्दा तिरमखे (षडयंत्र), आरती अकोलकर (नागपद्म), मयूर तिरमखे (षडयंत्र), तेजस अतितकर (ज्याचा त्याचा प्रश्न), देवीप्रसाद सोहनी (महापात्रा), अथर्व धर्माधिकारी (कोणी तरी येणार गं…)

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने नगर केंद्रावर 21 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत माऊली सभागृहात या स्पर्धा घेतल्या होत्या. या वेळी स्पर्धेत 11 नाटकं सादर झाली. त्यात नगर शहरातील 6, श्रीरामपूर, कोपरगाव येथील प्रत्येक 2 व घोडेगाव येथील 1 नाटक होते. स्पर्धेस हौशी नाट्यकर्मींचा चांगला प्रतिसाद मिळाला. परीक्षक म्हणून सर्वश्री सुरेश बारसे, अरुण शेलार आणि अनिल पालकर यांनी काम पाहिले. समन्वय सागर मेहेत्रे व सहसमन्वयक जालिंदर शिंदे यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

अनेक नवीन कलाकारांना सोबत घेऊन नाटकाच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी प्रयत्न केले. कलाकारांनी जिद्द व चिकाटीने आपापल्या पात्रांना न्याय देण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला. नवीन कलाकारांनी या क्षेत्रात आत्मविश्वासाने येऊन रंगभूमीची सेवा करावी.

– सतीश लोटके, दिग्दर्शक, ज्याचा त्याचा प्रश्न

- Advertisment -

ताज्या बातम्या