Type to search

फिचर्स मुख्य बातम्या सार्वमत

राज्य नाट्य स्पर्धा : सामाजिक कार्याआडून ‘अनफेयर डील’

Share

संदीप जाधव

राज्य नाट्य स्पर्धा

समाजातील वंचित, शोषित घटकांच्या पुनर्वसनासाठी, विकासासाठी काम करणार्‍या सामाजिक संस्थांचा मूळ हेतू अगदी शुद्ध व पवित्र असतो. मात्र, काहीजण या सामाजिक कार्याच्या आडून अवाजवी महत्त्वाकांक्षेपोटी संस्थेचा वापर राजकीय स्वार्थासाठी करतात. विरोध करणार्‍याला जीवनातून उद्ध्वस्त करण्यासाठी अशा व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकतात. विरोध येणार्‍या ही कृती संस्थेतील घटकांसाठी घातक तर ठरतेच, पण कधीकधी त्याचं बूमरँगही होतं. सामाजिक तत्त्वांची प्रतारणा करीत केलेली ‘डील’ कशी ‘अनफेयर’ ठरते याचे वास्तववादी चित्रण मंगळवारी श्रीरामपूरच्या कर्णेज अ‍ॅकेडमीने प्रस्तृत केलेल्या ‘अनफेयर डील’ या नाट्यात पाहायला मिळाले.
भगवान हिरे यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शक आहेत अजय घोगरे, तर अ‍ॅड. प्रसन्ना बिंगी निर्मितीप्रमुख आहेत. अरविंद दीप्तेश विसपुते, सुधाताई (प्रा. संगीता परदेशी), कविता डॉ. रूचिका कासार, शानो (कावेरी फटांगरे) या प्रमुख पात्रांबरोबरच अजय (धनंजय बडाख), मामा (नानासाहेब कर्डिले), कावळे (मयूर इनामके), डोमाळे (प्रा. अशोक कर्णे), डॉक्टर (मितेश ताके), नर्स (सायली साळुंके), साधू (हितेन धाकतोडे) आणि वॉर्डबॉय (अनुज नगरकर) यांच्याही भूमिका आहेत.
समाजकार्याआडून राजकारण करणार्‍या वास्तववादी सामाजिक समस्येला वाहिलेल्या या दोन अंकी नाटकात सुरुवातीलाच शोषित महिलांसाठी कार्य करणार्‍या संस्थेचे कार्यालय दाखविले आहेत. सुधाताई या संस्थेच्या प्रमुख आहेत. अरविंद, कविता व अजय हा त्यांचा सहकारी वर्ग. वंचित घटकांसाठी नवनवीन उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी अरविंद पोटतिडकीने प्रयत्न करत असतो. त्यात त्याला सुधाताईंचे मार्गदर्शन आणि कविताची साथ असते. एका राजकीय पक्षाच्या आमदाराच्या समर्थक असलेल्या सुधाताई आपल्या संस्थेचा, महिलांचा वापर राजकारणासाठी करण्याची कल्पना सर्वांसमोर मांडतात. मात्र, ती कोणालाच रूचत नाही. अरविंदचा तर त्याला कडाडून विरोध असतो. सुधाताईंचा पानउताराही करतो. त्या ‘एका दगडात दोन पक्षी’ मारण्याचा मनसुबा आखतात.
शोषित महिलांच्या वस्तीत जाऊन कार्य करत असल्याने अरविंदचे लग्नही मोडतेे. नंतर अरविंदच्या घरी एक शानो नावाची बाजारू महिला येते व त्याच्या प्रबोधनाने प्रभावित झाल्याचे सांगते. सामाजिक सेवेचं व्रत घेतलेल्या अरविंदच्या विचारांना डिवचते व लग्नाची मागणी करते. थेट वैचारिक तत्वांनाच तिने हात घातल्याने त्याला विचार करण्यास भाग पाडते. तोही निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी मागतो. कविताच्या विरोधानंतरही अरविंद शानोशी लग्न करतो. तिचे नाव मुक्ता ठेवतो. लग्नाला दोन महिने होतात. मात्र, दिवसेंदिवस तिची अस्वस्थता वाढत जाते. पतीपासून तिला शारीरिक तृप्ती मिळत नाही. त्यातून ती बेचैन होते. मद्यपानही करते. न राहवून ती सुधाताईंनीच मला तुमच्याकडे पाठविल्याचे सांगते. एव्हाना कविताला सगळा प्रकार समजलेला असतो. मुक्तावर ओरडणार्‍या अरविंदला कविता समजावते. शानोला हिस्टेरिया हा मानसिक आजार जडल्याचे सांगते. पण त्याच्या वागण्यात बदल होतो. मुक्ता ऊर्फ शानोला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. इकडे कविताही सुधाताईंचा काळा चेहरा समोर आणते. आणि सूड घेण्याचा इरादा बोलून दाखवते. तेवढ्या त्यांना डॉक्टरांचा फोन येतो. मुक्ताने हॉस्पिटलमध्ये सुधाताईंचा खून केलेला असतो. ती थेट घरी येते नि एका रोपेची कुंडी अरविंद-कविताच्या हाती देत दोघांना लग्न करण्यची गळ घालते व निघून जाते.

पहिल्या अंकातील काही प्रसंगामुळे आलेली मरगळ शानोच्या एन्ट्रीने नंतर रंगत येते. बाजारू महिला रंगविताना कावेरा फटांगरेंनी केलेला अभिनय उत्कृष्ट ठरला. मादक हालचाली नि हावभाव शिट्ट्या नि टाळ्या घेऊन गेल्या. सामाजिक तत्त्वांशी बांधिल असलेल्या अरविंदला दिप्तेश विसपुते यांनी रंगमंचावर संयमीपणे उतरविले. कपटी, स्वार्थी निशाताईंची नकारात्मक भूमिका प्रा. संगिता परदेशी यांनी मेहनतीने आणखी डार्क केली. कविताला डॉ. रूचिका कासार यांनी उभे करत छान अभिनय केला. काही प्रसंगात त्या अडखळल्या. अजयची छोटी भूमिका धनंजय बडाख यांनी केली. मुलीच्या मामांना नानासाहेब कर्डिलेंनी साकारले. सोसायटीचे पदाधिकारी कावळे व डोमाळे याची भूमिका मयूर इनामके व प्रा. अशोक कर्णे यांनी निभावली. त्यांनी अरविंदकडून मार खाण्याचा छान अभिनय केला! साधू, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय ही पात्रे शॅडो सीनमध्ये दिसली.

संस्थेचे ऑफीस, अरविंदचे घर व हॉस्पिटलमधील शॅडो सीन नेपथ्यकार प्रा. अशोक कर्णे, कैलास सोनवणे व अलोक गायकवाड यांनी चान सजवले. पहिल्या काही प्रसंगात सुंदर संगीत देणार्‍या मयूर वाकचौरे व किरण उबाळेंना पुढे सातत्य राखता आले नाही. नेटकी प्रकाशयोजना करण्यात प्रकाश ढोणे व रवी जावरे यांनी मेहनत घेतली. मात्र अनेक प्रसंगात स्पॉट लाईट येण्यास विलंब झाला. रंगभूषा स्नेहा कुलकर्णी व अतुल गोपाळे यांनी केली. वेषभूषेत डॉ. वृषाली वाघुडे राहुल वाघुडे कमी पडले नाहीत.पहिल्या अंकातील अनेक लांबलचक प्रसंग, संगिताचा मर्यादीत वापर आणि काही अडखळते संवाद यामुळे काही वेळा नाटक रेंगाळले. नतर मात्र नाटकाने गती घेतली. दुसर्‍या प्रसंगात जाताना शानोने खाली टाकलेला गजरा सर्वांना दिसला. भगवान हिरेंचे उत्कृष्ट लेखन असलेल्या या नाटकात दिग्दर्शकाने केलेल्या काही चुका वगळता नाट्य सामाजिक नाटक छान वाटले. फेल होण्याच्या मार्गावर असलेली ‘अनफेयर डील’ नंतर सक्सेसफूल झाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!