Type to search

आवर्जून वाचाच सार्वमत

‘खमाव खमाव’च्या गजरात क्षमायाचना

Share
आनंदधामच्या प्रांगणात हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक क्षमापना कार्यक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- जैन धर्मियांच्या पवित्र पर्युषण महापर्वामधील सामुदायिक क्षमापना कार्यक्रम शुक्रवारी सकाळी आनंदधामच्या प्रांगणात झाला. ‘क्षमा वीरस्य भूषणम्’ या उक्तीला अनुसरुन उपस्थित प्रत्येकाने कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल हात जोडून एकमेकांची क्षमा मागितली. ‘खमाव खमाव’च्या गजरात आनंदधामचे पवित्र प्रांगण दुमदुमले होते. जैन साध्वीजींच्या सान्निध्यात हजारो भाविकांनी क्षमापना कार्यक्रमात सहभाग घेत त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
चातुर्मासानिमित्त आचार्यश्रींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आनंदधाममध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. शुक्रवारी सकाळी महासतीजी पू.किरणप्रभाजी म.सा., वाणीभूषण पू. प्रीतिसुधाजी म.सा. आदिठाणा यांच्या सान्निध्यात संवत्सरी महापर्वातील सामूहिक क्षमापना कार्यक्रम झाला. यावेळी वाणीभूषण पू.प्रितिसुधाजी म.सा.म्हणाल्या की, मनात व्देष व क्लेष असला की जीवन अस्थिर बनते. आनंदी जीवनासाठी व्देष व क्लेषमुक्त झाले पाहिजे. क्षमापना हे जैन धर्मातील आत्मशुध्दीचे पर्व आहे. दैनंदिन जीवन जगताना प्रत्येकाकडून अनवधानाने अथवा जाणीवपूर्वक चुका होतात. एखाद्याला अपमानास्पद बोलले जाते. यातून मनात कटुता निर्माण होते. राग लोभाचे परिमार्जन करणे व त्यासाठी क्षमा मागणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. एखाद्याला क्षमा करणे तसेच मनापासून क्षमा मागणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. प्रत्येकाने या तत्वाचा अंगिकार केल्यास संपूर्ण विश्‍वात एक प्रकारचे आनंदी वातावरण तयार होवून बंधुत्त्व वृध्दींगत होण्यास मदत होईल. हाच संदेश देत जैन धर्मात पवित्र असे पर्युषण पर्व साजरे केले जाते. क्षमायाचनेतून मिळालेली उर्जा वर्षभर प्रत्येकाला आनंदी ठेवेल.

या वेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत, सेक्रेटरी संतोष बोथरा, खासदार दिलीप गांधी, आ.संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम आदींनीही क्षमापना केली. श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत म्हणाले की, श्रावक संघातर्फे आनंदधामच्या प्रांगणात चातुर्मासाचे चोख नियोजन केले आहे. एक मोठे कार्य तडीस नेताना काही त्रुटी असल्यास, चुका झाल्या असल्यास सर्वांनी मनापासून क्षमा करावी. आचार्यश्रींच्या पावन भूमीत होत असलेला चातुर्मास व पर्युषण पर्व प्रत्येकालाच आत्मउन्नतीचा मार्ग दाखवत आहे.सेके्रटरी संतोष बोथरा म्हणाले की, चातुर्मास काळातील संवत्सरी महापर्वानंतर आता दररोज सकाळी 9 ते 10 या कालावधीतील नियमित प्रवचने सुरू होतील. आचार्यश्रींचे पुण्यस्मरण 28 मार्च रोजी साजरे केले जाते. यानिमित्त दर महिन्याच्या 28 तारखेला आनंदधाम येथे दुपारी 3 ते 4 यावेळेत नवकार महामंत्र जाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यात भाविकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी सी.ए.रमेश फिरोदिया, जैन ओसवाल पंचायतचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, जैन श्रावक संघाचे सेके्रटरी संतोष गांधी, उपाध्यक्ष आनंदराम मुनोत, सतिश लोढा, नितीन कटारिया, चांदमल ताथेड, कांतीलाल गुगळे, आनंद चोपडा, अनिल दुगड, प्रितम गांधी, अभय लुणिया आदी उपस्थित होते. सर्वच उपस्थितांनी साध्वीजींच्या प्रवचनाचे भक्तीभावाने श्रवण केले. आचार्यश्रींच्या ध्वनीमुद्रीत प्रवचन संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली. यानंतर सर्वांनी विनम्रतेने हात जोडून खमाव खमाव म्हणत एकमेकांची क्षमा मागितली. यावेळी पारण्याची व्यवस्था सौ.सविता रमेश फिरोदिया यांच्यावतीने करण्यात आली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!