‘फेज 2’मध्ये सेनेचे हात ओले

0
खासदार गांधींचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पैशाची कमी नाही. पण तो पैसा मिळविण्यासाठी हवे असलेले कर्तृत्व महापालिकेतील सत्ताधार्‍यांमध्ये नाही. खासदारांना श्रेय मिळेल या खुज्या विचारापोटी नगर विकास मागे राहिला. फेज-2 पाणी योजना दहा वर्षानंतरही पूर्ण झाली नाही. या योजनेत अनेकांची घर भरल्याचा आरोप करीत खासदार दिलीप गांधी यांनी शिवसेना तसेच राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
सावेडीतील माजी नगरसेविका भाजप प्रवेश सोहळ्याप्रसंगी खासदार गांधी बोलत होते. भिस्तबाग चौकात झालेल्या जाहीर सभेतून गांधी यांनी शिवसेनेवर टिका करत आगामी निवडणुकीची झलक दाखविली. खासदार गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकासाच्या नवनवीन कल्पना राबवून विकास योजना थेट जनतेपर्यंत पोहचवत आहेत. केंद्र व राज्य शासनाने विकासासाठी भरीव निधी दिला, मात्र महानगरपालिकेच्या माध्यमातून या मंजूर विकास कामांंची 100 टक्के अंमलबजावणी होत नाही. ज्यांच्या हातात सत्ता आहे. ते सत्ताधारी या विकास कामांमध्ये खोडा घालत आहेत. विकास कामांचे श्रेय भारतीय जनता पार्टीला मिळेल हे त्यांना खुपते आहे. म्हणूनच 10 कोटींच्या कामातही त्यांनी अडथळा आणून निधी थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यास यश आले नाही. लवकरच या 10 कोटींची विकास कामे शहरात सुरु होणार आहेत.
प्रोफेसर कॉलनी चौकातील शॉपिंग कॉम्प्लेक्स पाडून कोट्यावधी रुपयांची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव शिवसेनेचा होता मात्र तो आम्ही हाणून पाडला आहे. 2009 मध्ये फेज2 पाणी योजना सुरू झाली. तीन वर्षात ती पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अजूनही ती पूर्ण झाली नाही. मी ‘दिशा’च्या बैठकीत त्याला गती दिली. योजना रखडविण्यामागे ‘घर भरणं’ हाच उद्देश होता. शहराच्या विकासाच्या गप्पा मारणार्‍या आमदारांच्या सारसनगर भागातील नागरिक गेले 15 वर्षे पाण्याच्या टँकरवर तहान भागवत होते. पाईपलाईन, पाण्याची टाकीचे काम पूर्ण झाले असूनही केवळ कार्यकर्त्यांचे हात ओले करण्यासाठी पाणी पुरवठा सुरु केला नाही. मात्र ज्यावेळी मनपाच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेताच टप्प्याटप्प्याने हा पाणी पुरवठा सुरु झाला आहे. सत्ताधारी शिवसेनेला व आमदारांना नगरच्या विकासाचे काहीही देणे घेणे नाही, केवळ ‘मला काय’ आणि श्रेयाकरीताच त्यांचा खटाटोप चालू आहे, असा घणाघाती आरोप खासदार दिलीप गांधी यांनी आ. जगताप यांच्यावर केला.
भाजपाचे शहर उपाध्यक्ष किशोर डागवाले, मनपा गटनेते सुवेंद्र गांधी, सभापती बाबासाहेब वाकळे, सरचिटणीस किशोर बोरा, नरेंद्र कुलकर्णी, गौतम दीक्षित, श्रीकांत साठे, महिला आघाडीच्या अध्यक्षा गीतांजली काळे, संगीता खरमाळे, मनिषा काळे, मनोज दुलम, भैया गंधे, महेश तवले, अन्वर खान, चेतन जग्गी, नितीन शेलार, किशोर वाकळे, गजानन कराळे, महेश कराळे, श्रीनिवास कराळे, करण कराळे, तायगा शिंदे आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सुवेंद्र गांधींनी काढली लाज
वर्षानुवर्षे उपनगराने शिवसेनेला मतदान केले. आमदार, नगरसेवक निवडून दिले. मात्र, सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने सावेडी उपनगराकरीता काय केले? असा सवाल सुवेंद्र गांधी यांनी केला. युवकांसाठी व्यायामशाळा नाही, वेळीअवेळी सुटणारे पिण्याचे पाणी, अस्वच्छता, सुविधांचा अभाव असे चित्र उपनगरात आहे. परिवहन खाते शिवसेनेकडे असूनही नगर शहरातील बससेवा सत्ताधारी शिवसेनेने बंद पाडून नागरिकांना वेठेस धरले आहे. लाज वाटली पाहिजे या सत्ताधार्‍यांना अशा शब्दात सुवेंद्र गांधी यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.

 

 

LEAVE A REPLY

*