केडगाव हत्याकांड : आमदार संग्राम जगताप यांना अटक

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील दोन शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली आहे. रविवारी पहाटे त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणात त्यांच्यासह आ.अरूण जगताप, आ.शिवाजी कर्डिले यांनाही अटकेची शक्यता बळावली आहे. त्यांच्यावर कट रचल्याच्या आरोप असून कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात आ.जगताप यांच्यासह बाळासाहेब एकनाथ कोतकर, संदीप गुंजाळ आणि भानुदास कोतकर अशा 4 जणांना अटक झाली आहे.

शनिवारी सायंकाळी केडगाव येथे सुवर्ण नगरात शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळी घालून तसेच कोयत्याने वार करून हत्या झाली. या प्रकरणी 30 जणांवर हत्या व कटाचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील आ.जगतापांसह 5 जणांवर 120 ब नुसार कटाचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात जगताप यांना रविवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास अटक केल्याचे वृत्त आहे. एका वृत्तवाहीनीशी बोलताना वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

गोळीबार करणारा पोलिसात हजर
निवडणुकीच्या वादातून केडगाव येथे शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व त्यांचा सहकारी वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना शनिवारी (दि. 7) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर नागरिक आणि शिवसैनिकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून दुकाने व गाड्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे केडगावसह शहारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली नगर-पुणे रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शनिवारी रात्री उशिरा या हत्याकांडातील संशयित आरोपी संदीप गुंजाळ पिस्तूलासह पारनेर पोलीस ठाण्यात हजर झाला.केडगाव येथे शनिवारी महापालिका पोटनिवडणुकीचा निकाल असल्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. शुक्रवारी मतदानाच्या दिवशी दुपारी देखील बाचाबाची झाली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला होता.

शनिवारी सायंकाळी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व त्यांचा सहकारी वसंत ठुबे ही दोघे सुवर्णनगर परिसरात बसले होते. यावेळी दोन तरुणांनी समोर येऊन त्यांच्यावर तलवारीने वार केले. तसेच पिस्तुलमधुन गोळ्या झाडल्या व ते फरार झाले. यात संजय कोतकर व वसंत ठुबे हे जागीच ठार झाले. या हल्ल्यानंतर सुवर्णनगर परिसारात मोठी दहशहत पसरली होती.

30 जणांवर गुन्हा
या प्रकरणात आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप व शिवाजी कर्डिले यांच्यासह भानुदास कोतकर आणि त्यांचे पुत्र संदीप कोतकर यांच्यावर अन्य 30 जणांविरुद्ध कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पारनेर पोलिसात हजर झालेला आरोपी संदीप गुंजाळ याला शनिवारी रात्री अटक करण्यात आली.जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी उशिरा रात्री माध्यमांना याप्रकरणी माहिती दिली. आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. कर्डिले यांच्यासह पाच जणांवर कटाचा गुन्हा असून अन्य जणांवर कट व हत्येचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांना शरण आलेला संदीप गुंजाळ, केडगाव पोटनिवडणुकीत विजयी उमदेवार विजय कोतकर आदींचा त्यात समावेश आहे. मृत कोतकर यांचा मुलगा संग्राम संजय कोतकर यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध भा.द.वि. 302, 120/ब, 143, 144, 145, 148, 149, आर्मअ‍ॅक्ट 3/4 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

शिवसेना आक्रमक, आज जिल्हा बंद
शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी शिवसेना आक्रमक झाली आहे. रविवारी जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर नगर येथे दाखल होणार असल्याची माहिती होती.

तर मुंबई येथून ना.रामदास कदम व दिवाकर रावते सकाळी 10 च्या सुमारास नगरमध्ये दाखल झाले आहेत. ते मृत शिवसैनिकांच्या नातेवाईकांची भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द
दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर जिल्ह्यात होते. शिर्डी येथे त्यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम होता. मात्र रविवारी सकाळी त्यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. केडगाव हत्याप्रकरणात कटाचा गुन्हा दाखल झालेेले आ.कर्डिले हे भाजपाचे आमदार आहेत. शिवसेना या प्रकरणात आक्रमक झाली आहे.

LEAVE A REPLY

*