राजकारणातील पतंगबाजी!

0

लेख – नगरी पॉलिटिक्स  

काहींनी हंडी फोडली तर काहींनी भांडे! काहींनी ठेका धरला तर काही थरथरले! काहींचे राजकीय ‘उडते चुंबन’ तर काहींची राजकीय पतंगबाजी…आठवड्याचा राजकीय माहोल हा असा रंगीन! गणेशोत्सव तोंडावर आहे. त्याआधीच राजकीय रंगमंचावर ‘देखाव्यां’ची अचानक गर्दी झाली. त्यामुळे इकडे पाहावे की तिकडे? असा प्रश्न निर्माण झाला. या राजकीय देखाव्यांचा बाज आणि साज परिचित असला तरी वेळ आणि काळ पाहता त्याचे अर्थ आणि परिणाम वेगळे! यापैकी काहींत भविष्यातील संकेत दडलेले तर काही निव्वळ उठवळ! पण एक नक्की, आगामी राजकारणाचे जे काही इमले उभारले जातील, त्यासाठीची पायाभरणी किंवा विटा ठेवण्याचे उद्योग म्हणून याची नोंद घेता येईल!
राष्ट्रवादी नामक राजकीय टोळीतील अत्यंत सभ्य गृहस्थ पांडुरंग अभंग यांनी वात पेटवून एक फटाका नगरी राजकारणाच्या पायाखाली सोडून दिला. त्याचा आवाज झाला, धूर निघाला. तो काहींच्या नाकातोंडात गेला, काहींना त्रास झाला, काहींना ठसका लागला. मामुली ठिणग्या उडाल्याने अन्य लवंगी फटाकेही फुटले. थोडक्यात अभंगांनी फोडलेल्या या फटाक्याने शांतता भंगली! काय होता हा फटाका? ते म्हणतात, ‘दक्षिण लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसला सोडावा.’ यावरच ते थांबले नाहीत तर ‘राष्ट्रवादी दक्षिण मतदारसंघात कितीदा फटके खाणार आहे? पक्षाकडे सक्षम उमेदवारही नाही. त्यामुळे दक्षिण मतदारसंघ काँग्रेसला सोडून त्याऐवजी उत्तर मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा!’… हा सल्ला त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांना दिला आहे. बरे हे अभंग कोणी गल्लीबोळ कार्यकर्तेही नाहीत. ते आहेत पक्षाचे उपाध्यक्ष. ज्येष्ठ नेत्यांपैकी एक. राष्ट्रवादीचे जनक शरद पवारांना जवळ असलेल्यांपैकी आणि वयाचा सुवर्णमहोत्सव साजरा करून आता फारसे राजकीय ‘मतलब’ शिल्लक नसलेले बहुजन नेतृत्व! त्यामुळे त्यांनी ही मागणी केल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी शहारली. पक्षातील काहींची गत तर सहन होईना आणि सांगताही येईना, अशी झाली. निवडणुका समोर असल्याने समोर चोंबडेपणा करत पाठीमागे लपवून ठेवलेले काहींचे भांडे हातातून अचानक निसटले. पडद्याआड काय सुरू आहे, याची इत्यंभूत खबर असलेल्या ‘मोजक्या’ काहींसाठी ‘भांडे फोडण्याची’ ही वेळ योग्य होती का? एवढाच काय तो अनुत्तरीत प्रश्न!
पवार आणि विखे यांचे राजकारणातील विळ्या-भोपळ्याचे नाते. त्यामुळे राष्ट्रवादीतील काहींना विखेंविरोधी खटाटोप करणे, हा आपला ‘पवारधर्म’ वाटतो. तेव्हा पवारांच्या जवळचे मानले जाणारे आणि आजवरच्या राजकारणात पवारनिष्ठा किंवा पक्षनिष्ठा न भंगलेल्या अभंगांनी ‘पवारधर्मा’च्या अत्यंत विपरीत ‘दक्षिणेच्या बदल्यात उत्तर’ भूमिका जाहीरपणे घेणे आणि ते करताना त्यांचा एक डोळा विखेंच्या दिशेने हलकाच लवणे, हे वेगळे ठरते. काहींच्या दृष्टीने हा शिस्त वगैरेंचा भंग! तसे असेल तर मग अभंगांवर कारवाई का होत नाही? हाच प्रश्न राष्ट्रवादीतील सुप्त हालचालींचे संकेतही देतो. जिल्ह्यात राजकारणाचे दोन प्रवाह आहेत. एक विखे विरोधी तर दुसरा विखे समर्थक! पण राष्ट्रवादीत अलीकडे विखेंसंबंधी वेगळाच प्रवाह वाढू लागला आहे. तो विखे समर्थकही नाही आणि विरोधातही नाही. काहीसा राजकीय मतलब साधणारा म्हणून त्याचे वर्णन करता येईल. ‘सोय’ हा या प्रवाहाचा राजकीय मंत्र! नगर शहर, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, कोपरगाव आदी भागांत तो बर्‍यापैकी आढळतो. मग राष्ट्रवादीत शिल्लक राहतेच काय? त्यामुळे राष्ट्रवादी दक्षिण मतदारसंघाच्या निवडणुकीत फटके खात असल्याने हा मतदारसंघ काँग्रेसला पर्यायाने विखेंना बहाल करा, हे मत एकट्या अभंगांचे आहे की आणखी कोणाचे? बरे मतदारसंघ काँग्रेसला बहाल करणे एकवेळ ठीक. पण थेट विखेंना देण्याची घाई का? लोण्याचा गोळा पाहून त्यांची मती गुंग झाली म्हणून ते असे बोलले की त्यामागे एखादा ‘क(बा)रामती’ मेंदू आहे? या मेंदूला दगड टाकून नगरी राजकारणाचा तळ किती ढवळून निघतो, याचा अंदाज तर घ्यायचा नाही? झालेच शक्य तर आजवरच्या राजकारणात आंबट ठरलेली एखादी राजकीय शक्यता गळी उतरविण्यासाठीची ही पहिला पायरी तर नाही?

मुळात अभंगांनी ही मागणी पहिल्यांदाच केलेली नाही. त्यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीआधीही पक्षाला हेच सुचविले होते. तेव्हा तर विखे दक्षिणेच्या चित्रातही नव्हते. यावेळी या प्रकरणात विखे हे नाव आल्याने मागणीचा अर्थ बदलला. पण म्हणून यंदाच्या मोसमात असे राजकीय चित्र रंगविणारे अभंग एकमेव आहेत का? तसेही नाही. गेल्या आठ महिन्यांत एक मातब्बर आणि एक तरुणतुर्क, अशांनी हा प्रयत्न करून पाहिला आहे. पहिला नंबर ‘तरुणतुर्का’ने लावला. थेट प्रस्तावच मोठ्या पवारांपुढे मांडला. ‘विखेंना दक्षिण लोकसभा दिली तर मला विधानसभेत त्याचा फायदा होईल’, असा सरळ हिशेबच त्यांनी सादर केला. यावर मोठ्या पवारांच्या कपाळावरील रेषा वाढल्या. पण त्यांनी ऐकून घेण्याचे काम केले. नंतर एका मातब्बरानेही या शक्यतेवर विचार करावा, म्हणून पवारांना सुचवून पाहिले.

विखेंची वकिली अशी स्वपक्षातूनच सुरू झाल्याने काळजी वाढणे सहाजिक आहे. मात्र हे वकील विखेंनी पेरले की कसे, ते अद्याप स्पष्ट नाही. तरुणतुर्क नवे आहेत. त्यांची राजकीय समज कमी आहे, म्हणून दुर्लक्ष केलेले असताना ‘मातब्बरा’कडूनही तसाच प्रयत्न झाल्याने पवारांच्या भुवया आधी उंचावल्या आणि नंतर राजकीय रक्ताभिसरण कमालीचे वाढले, अशी माहिती आहे.त्यांनी याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. नाराजी व्यक्त केली. ही नाराजी नेमकी पोहोचेल, याची तजवीज केली. ‘हेलिकॉप्टर उडवून कोणी खासदार होत नसतो’ हे अलीकडच्या महिन्यांतील गाजलेले राजकीय वाक्य ज्यांना आठवत असेल कदाचित त्यांना याचा संदर्भ लागू शकतो. ‘युवा विखे उरावर बसले तर तुमचे भविष्य आणि पुढील पिढीचे राजकारण संपण्याचा धोका संभवतो.’ असा राजकीय वैधानिक इशारा अनेकांच्या कानात पोहोचविण्यात आला, तो याच काळात! नेमका यानंतर विखेंचा दक्षिणेतील वेग मंदावला. मध्यंतरी बराच काळ लोटला. त्यामुळे विखे आणि निवडणूक ही शक्यता लोप पावली, असा विखे विरोधकांचा समज झालेला असताना अभंगांनी या विषयाला पुन्हा उकळी दिली आहे. त्याचवेळी छोट्या विखेंनी ‘गुप्त’ दक्षिण मोहिमेचा प्रारंभ करणे, हा निव्वळ योगायोग मानायचा का? मुळात सत्तेच्या समुद्रातून बाहेर फेकले गेल्याने वाढलेली राजकीय तडफड सहकारातील ही मंडळी लपवू शकलेली नाही.

पुन्हा एकदा सत्ता ताब्यात घेण्यासाठी एकमेकांच्या कुबड्या वापरण्याशिवाय पर्याय नाही, हा शहाणपणा त्यांनी गेल्या चार वर्षांत कमावला आहे. आता मतदारसंघनिहाय पूर्वनियोजनाची वेळ काँग्रेस-राष्ट्रवादीवर आली आहे, याची आवर्जून नोंद घेतली पाहिजे. ती घेतली तर जे सुरू आहे, त्याचा अंदाज घेणे सोपे ठरेल. पण म्हणून विखेंना राष्ट्रवादी टाळी देणार का? किंवा मोठे पवार गाजलेला ‘निवडणूक खटला’ विसरणार का? असे काही घडले तर मग नगरी राजकारणाच्या जुन्या पोथ्या बुडवाव्या लागतील, हे निश्चित! या प्रस्तावातील दुसरी बाजू तेवढीच रंजक. अभंग म्हणतात, ‘लोकसभा-विधानसभेच्या राजकारणात माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला पाहिजे.’… विखेंच्या पायात पाय घालायचे असतील तर थोरातांएवढा योग्य ‘अडथळा’ दुसरा नाही, हे ओळखून त्याची आखणी म्हणून तर हा प्रयत्न नाही? एकाचवेळी विखे ते थोरात या कसरतीमागे कोणती मेख दडली असावी? किंवा पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात तर याचे उत्तर नाही? मोनिका राजळे या मोदी लाटेत आमदार झाल्या असल्या तरी आता त्या जबाबदार राजकीय नेत्या म्हणून पुढे येत आहेत.

पक्ष वेगळे असले तरी आ. थोरात यांच्या त्या कुटुंबसदस्या. घराचा कुटुंबपुरुष गमावल्याने त्यांच्यावर मध्यंतरी दुखाचा डोंगर कोसळला. यावरून त्यांच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह लागले होते. पण ज्या तडफेने त्यांनी पुन्हा एकदा मतदारसंघ ढवळून काढला, त्यामुळे ‘भेंड्याचे भाऊ’ चिंतीत तर नाहीत? विरोधक म्हणजेच आ. राजळेंना संगमनेरमार्गे मिळणारा मानसिक ‘दारूगोळा’ थोपविण्यासाठी तह घडविण्याची काही योजना तर यामागेे नसावी? घुले बंधू आणि अभंग हे समीकरण एकजिनसी असल्याने असा प्रश्न नैसर्गिकच ठरतो.  काहीही असो! आगामी काळात अभंग म्हणतात ती शक्यता फळास जाईल किंवा जाणारही नाही. पण म्हणून त्यानिमित्ताने जे घडले किंवा घडणार आहे, त्या घडामोडींची पाने वाया जात नाहीत. जेव्हा केव्हा राजकारणातील डोळे लवण्याचा खेळ किंवा पतंगबाजी चर्चेत येईल, तेव्हा ही पाने वाचनीय नक्कीच असतील!

कर्डिलेंचे राजकीय ‘उडते चुंबन’!

आ. शिवाजी कर्डिले यांनी या आठवड्यात धमाल केली. ते भाजपाचे, राज्यात सत्ता भाजपाची! मात्र यामुळे त्यांना काही वलय लाभले, असे घडले नाही. ते काम त्यांच्या विखेंशी सलगीने साधले. त्यामुळे आता त्यांना कोणी राजकीयदृष्ट्या टाळू शकत नाही. 2009 मध्ये ते राष्ट्रवादीकडून दक्षिण लोकसभा लढले. त्यावेळी स्व. बाळासाहेब विखे यांच्या ‘आशीर्वादा’ने त्यांना चांगलाच झटका दिला. पुढे स्व. बाळासाहेब विखेंच्या कट्टर समर्थकांचे अंतस्थ वर्तुळ ‘झाडुका’मधील वांबोरीच्या सुभाष पाटलांनी जाहीरपणे पाठिंबा देत 2014मध्ये कर्डिलेंसाठी राहुरीची आमदारकी सोपी केली. विखेंचा आशीर्वाद थेट आणि सकारात्मकपणे पोहोचल्याने कर्डिलेंनी ‘2009’चा धक्का मागे सोडला. मग पुढे जिल्हा बँक, राहुरी सहकारी साखर कारखाना, अगदी जिल्हा परिषद अशी विखे-कर्डिले दोस्ती चर्चेत राहिली. आतातर या दोस्तीला वेगळाच खुमार चढला आहे. येता जाता कर्डिले विखेंना टाळी देतात. कधीकधी त्यांना पाहून नयनचक्षूंची उघडझाप करतात. या आठवड्यात तर कहरच झाला. त्यांनी विखेंकडे थेट ‘उडते चुंबन’ सोडले. विषय होता लोकसभा उमेदवारीचा! डॉ.सुजय विखे भाजपच्या तिकिटावर लढले तरच खासदार होतील, असा त्यांचा दावा. नेमके यावेळी मंचावर डॉ. सुजय होते. या बळजबरीच्या राजकीय प्रेमामुळे त्यांची स्थिती अवघडल्यासारखी झाली. स्मितहास्य वापरून त्यांनी वेळ मारून नेली. भाजपात या तिकीट देतो…भाजपात या खासदार करतो, अशा ऑफर देण्याएवढे आ. कर्डिले मोठे कधी झाले? पक्षाने त्यांच्या शर्टाच्या एका खिशात विधानसभेची आणि दुसर्‍या खिशात लोकसभेची तिकिटे वाटपासाठी कोंबली आहेत की काय? समजा पक्षाचा त्यांच्यावर एवढाच विश्वास वगैरे असेल तर मग त्यांना मध्यंतरी नगर पोलिसांनी का ‘वारी’ घडविली? तेथे का भाजप किंवा सत्ता कामास आली नाही? की या प्रेमामागे भविष्यातील राजकीय सुरक्षेची काही धडपड दडली आहे? कर्डिलें जे काही करतात, ते त्यांना शोभून दिसते. प्रश्न आहे विखेंचा! त्यांना काय झाले आहे? झाली असेल आ.कर्डिलेंची मदत. त्यासाठी एवढे आगतिक व्हावे? राजकीय कुस्तीसाठी कर‘ढिले’ डाव अभ्यासण्याची वेळ विखेंवर का यावी? यात ते आधीच तरबेज आहेत, असा समज आहे. तो चुकीचा आहे का? विखे-कर्डिलेंच्या या दोस्तीत कोणाची उंची वाढली आणि कुणाची कमी झाली, हेच कळेना! ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्डिलेंची ऑफर म्हणजे मनोरंजन आहे, असे स्पष्ट केले म्हणून हा विषय संपत नाही. कर्डिले मनोरंजन करतात, असा त्यांचा दावा असला तरी हाच ‘कॉमेडी शो विथ कर्डिले’ त्यांना भलताच आवडतो, हे कसे नाकारणार? आ. कर्डिलेंनी या आठवड्यात आणखी एक विधान केले. ‘राजकीय परिस्थितीनुसार अनेकदा पक्ष बदलाची वेळ माझ्यावर आली. आता मात्र राजकारणाचा समारोप भाजपामध्येच करणार आहे.’ असे ते म्हणतात. आता हा दावा गंभीर आहे की मनोरंजक, याचा फैसला जनतेवर सोपविलेला बरा!

जाता जाता…

विखेंना दक्षिण मतदारसंघ देण्यासाठी सरसावलेले पांडुरंग अभंग यांच्या शब्दाला किंमत नाही, असा सूर पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी नगरमध्ये लावला तर अभंगांच्या या प्रस्तावाचे ना. विखेंनी स्वागत केले, अशी खबर लिखाण संपवत असताना आली. अजित पवार शनिवारी नगरच्या नियोजित दौर्‍यावर होते. त्यांनी काही भाष्य केले तर या विषयावर पुन्हा नव्या संदर्भासह मांडणी करता येईल. तोवर वाजणारे राजकीय नगारे कान देऊन ऐकूया!

श्रीरामपूरचे वाटोळे!

राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश आदिक यांनी ‘वाटोळ्याच्या पोतडी’चे तोंड उघडले आहे. श्रीरामपूर तालुक्याच्या विकासात्मक नुकसानीच्या मुद्द्यावरून त्यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटेंवर निशाणा साधला आहे. आरक्षणामुळे श्रीरामपूर तालुक्याचे नुकसान झाले, या मताशी आपण सहमत नाही. तर 1980 मध्ये निर्णय चुकला, त्यावेळी खर्‍या अर्थाने तालुक्याचे नुकसान झाले, असे आदिक म्हणतात. त्यांचा रोख स्पष्ट आहे. हे तेच वर्ष जेव्हा स्व.गोविंदराव आदिकांचा पराभव झाला आणि मुरकुटेंना नावापुढे आमदार लावण्याची सोय झाली. जे काही बिघडले, त्यास श्रीरामपूरकरांचा चुकलेला ‘तो’ निर्णय कारणीभूत आहे याची आठवण आदिक करून देतात. काही दिवसांपूर्वी मुरकुटेंनी आदिक भावडांवर निशाणा साधला होता, त्याचे हे उत्तर असावे. मुरकुटेंना बर्‍याच गोष्टींची परतफेड करण्याचा आदिकांचा मनसुबा दिसतो. स्व. जयंतराव ससाणे उपरांत श्रीरामपूर सध्या गोंधळलेले आहे. वाटोळे कसे झाले, हा प्रश्न आहेच. पण त्यापेक्षा पुढे काही चांगले होणार की नाही, हा प्रश्न श्रीरामपूरकरांसाठी अधिक अगत्याचा ठरतो. त्याचे उत्तर कोण देणार?

‘केलं पब्लिकचं गं वाटोळे बया’?

श्रीरामपूर शहरातील यंदाची दहीहंडीही चर्चित ठरली. लाखांवर बक्षिसांची उधळण, सोबतीला अभिनेत्री दर्शन आणि त्यावर कडी म्हणजे युवा नेत्यांचा ठेका! दहीहंडीच्या निमित्ताने एकमेकांचे राजकीय दही गोठविण्याचा प्रयत्न आदिक आणि ससाणे गटाने केला. पण यातून नक्की काय साधणार? हंडीतून सांडलेल्या दह्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन विकासाचे रुतलेले चाक बाहेर येऊन धावणार आहे का? नेते तरुण आहेत, उत्साही आहेत. त्यांनी आपले बळ योग्य ठिकाणी ‘खर्ची’ पाडणे अपेक्षित आहे. पण तसे घडताना दिसत नाही. कळसाध्याय ठरला तो दंहीहंडीतील ठेका! लोणीच्या विखेंनी आजवर जिल्ह्यातील अनेकांना नाचविले. दुसर्‍या शब्दांत विखे नाचवतात, एवढेच समाजमनावर बिंबलेले. त्यामुळे डॉ. सुजय विखेंनी ठेका धरला की त्याची बातमी होते. श्रीरामपुरात त्यांनी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या साथीने धरलेला ठेका तालबद्ध होता, असे म्हणतात. गाण्याचे बोल तर धमाल होते….‘केलं पब्लिकचं गं वाटोळे बया’…! आता हे वाटोळे कोणी कोणाचे कुठे अन् कसे केले, हे जाणून घेण्यासाठी श्रीरामपूरची जनता उत्सुक आहे. कोण ही उत्सुकता शमविणार? करण की डॉ. सुजय…? जनतेला प्रतीक्षा आहे.

ढाकणेंची आदळआपट

आरक्षण प्रश्नावरून स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी वंजारी समाजाला फसविले, असा आरोप करून पाथर्डीचे प्रताप ढाकणे चर्चेत आले. व्हायचे ते परिणाम झाले. विरोधी गटाकडून ढाकणेंचा निषेध, पुतळा दहन असे सर्व सोपस्कार पार पडले. परिणामी ढाकणे ‘लाईमलाईट’मध्ये! त्यांचा एवढाच हेतू असेल तर त्यांनी यश साधले, असे म्हणता येईल. आपण वंजारी समाजाचे नेते आहोत, असा त्यांचा समज आहे. समज यासाठी की बबनराव ढाकणेंनंतर प्रतापरावांना राजकीयदृष्ट्या ते अद्याप सिद्ध करता आलेले नाही. त्यांचा पक्ष कोणता, असा प्रश्नही अधूनमधून उपस्थित होतो. भाजपा त्यांना स्वीकारेल असे दिसत नाही आणि राष्ट्रवादी त्यांच्याकडे बघायला तयार नाही. दुसर्‍या शब्दांत बाद प्रकरण असेही म्हणता येईल. समाज आरक्षणावर त्यांचा अभ्यास माध्यमांसमोर प्रकटला. त्याचा काही उपयोग होईल, असे वाटत नाही. या आदळआपटीमुळे त्यांचे स्वत:चे समाधान झाले असेल. तेही नसे थोडके!

संपादक – अनंत पाटील 

LEAVE A REPLY

*