Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर: सावेडीत चोर बाजार

Share
पैशाच्या वाटणीच्या वादातून विद्युतपंप चोरट्यांचा भांडाफोड, Latest News Money Distribute Thife Pathrdi

11 महिन्यांत 47 चोर्‍यांचा लागला तपास

अहमदनगर (प्रतिनिधी) – सावेडी उपनगरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तोफखाना पोलिस ठाण्याची निर्मिती झाली. पण हे पोलीस ठाणेदेखील सावेडीकरांची सुरक्षा करू शकत नसल्याची धक्कादायक आकडेवारी ‘नगर टाइम्स’च्या हाती लागली आहे. गत 11 महिन्यात तब्बल अडीचशे घरात हात साफ करत चोरट्यांनी सावेडीत बाजार मांडला आहे. त्यातील केवळ 47 चोर्‍यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळाले.

शहराचे उपनगर असलेली सावेडी हा भाग क्रिम लोकांची वस्ती म्हणून नगरात परिचित आहे. मात्र याच भागावर चोरट्यांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. दुचाकी, चारचाकी, मोबाईल, पाकिटमारी करण्याच्या घटनांचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. सावेडी, बोल्हेगाव उपनगरात गत अकरा महिन्यात तब्बल 247 चोरीचे गुन्हे तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यातील 47 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.

शहराच्या तेलीखुंटापासून ते चितळे रोड बॉर्डर असलेल्या तोफखाना पोलिसांकडे दिल्लीगेट, पत्रकार वसाहत, सावेडी गाव, पाईपलाईन रोड, गुलमोहर रोड भागातील सावेडीतील उपनगरं आणि तपोवन भागापासून ते थेट बोल्हेगावातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. या भागात चोर्‍यांचे प्रमाण झपाट्याने वाढल्याचे दिसते आहे. घरफोड्या अन् चोर्‍यांचे प्रमाण वाढल्याने सावेडीकरांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे.

2018 वर्षात सावेडीत केवळ 194 घरफोड्या, चोर्‍या झाल्याची आकडेवारी सांगते, मात्र 2019 मध्ये चोर्‍यांचे प्रमाण किती वेगाना वाढले हे मिळालेल्या आकड्यातून समोर येते. 11 महिन्यातच 247 ठिकाणी चोर्‍या, घरफोड्या झाल्या असून केवळ 47 गुन्ह्यांचा पोलिसांना तपास लावता आला. बाकी गुन्हे अजूनही कायम तपासावर आहेत.

लग्न समारंभ अन् घरगुती आनंद सोहळ्यातही चोर्‍या होत असल्याचे समोर आले. त्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करणारी टोळी नगरात कार्यरत असल्याचे समोर आले आहे. पण पोलिसांना या टोळीचा मागमूस लावता आलेला नाही. पाईपलाईन रोड भागातील यशोदनगर परिसरात भरणारा भाजी बाजार आता चोरांसाठी पर्वणी ठरू पाहत आहे. भाजीज घेण्यासाठी गेलेल्या सावेडीकरांच्या मोटारसायकली लंपास करण्याचे घटना अलिकडच्या काळात वाढल्याचे दिसते आहे.

इतकंच काय तर घरासमोर पार्क केलेली मोटारसायकलही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. यशोदनगरमधील भैय्या सूर्यवंशी यांची मोटारसायकल त्यांच्या घरासमोरून चोरट्यांनी लंपास केली. बाजारातील गर्दीचा फायदा घेत खिशातील मोबाईल सराईतपणे लंपास होत असल्याने नागरिक सुरक्षित नसल्याचे दिसते आहे. मध्यंतरी परराज्यातील एक टोळी पोलिसांनी जेरबंद केली होती.पण त्यानंतरही घरफोड्या, चोर्‍यांचे गुन्हे थांबलेले नाहीत.

रात्रीच्या गस्तीवरील पोलीस कधीतरीच नजरेस पडतात. रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या हॉटेल्स, पानटपरीवर पोलिसांचे लक्ष असते, ते बंद झाले की गस्तीवरील पोलीस कोठेच नजरेस पडत नाहीत. पोलिसांची गुन्हेगारांवरील दहशत कमी झाल्याचे दिसते आहे. त्यामुळेच चोरटे निर्ढावले असून त्यांचे धौर्य वाढले आहे. रात्र गस्त वाढवून पोलिसांनी आपली जरब निर्माण करणे गरजेचे आहे.
– शंतनू पांडव, नागरिक, सावेडी.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!