Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

नगरमध्ये दुसर्‍या दिवशीही चोर्‍यांचे सत्र सुरूच

Share

गुन्हेगारांचे धाडस वाढले ः सावेडीत‘हिंदुजा’मधून तीन लाखांचा ऐवज पळविला

अहमदनगर (प्रतिनिधी) – मंगळवारी (दि.19) रात्री तीन शोरूम फोडल्यानंतर चोरट्यांनी बुधवारी (दि. 20) रात्री सावेडीत पुन्हा ‘डाव’ साधला. सावेडीतील हिंदुजा फायनान्स कंपनीच्या कार्यालयात चोरट्यांनी 2 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही फेल गेला. सावेडी उपनगरात चोर्‍यांचे सत्र सलग दुसर्‍या दिवशी सुरूच आहे. तारकपूर येथील शहर बँकेच्या शाखेलगत हिंदुजा फायनान्सचे कार्यालय आहे. बुधवारी (दि. 20) रात्री या कार्यालयाला चोरट्यांनी लक्ष्य केले. कार्यालयाचे शटर उचकटून चोरटे कार्यालयात घुसले. दोन लाख 80 हजार रुपयांची रोकड खिशात टाकून चोरटे पसार झाले.
गुरूवारी (दि. 21) सकाळी नेहमीप्रमाणे कर्मचारी कार्यालयात आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तातडीने तोफखाना पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

पोलिसांचे श्वानपथक घटनास्थळी आले. श्‍वानाने चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, पण श्वान जाग्यावरच घुटमळले. याप्रकरणी गोकुळ रावसाहेब वालझोडे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीबरोबरच सावेडी येथे आणखी एक घरफोडी झाल्याचे समोर आले आहे. याठिकाणाहून काही महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली. याप्रकरणी कोणतीच नोंद पोलीस दप्तरी केली गेलेली नाही. दरम्यान, दोन दिवसांपासून सावेडी उपनगरात चोर्‍यांचे सत्र सुरू आहे. त्यापूर्वीही भुरट्या चोर्‍या, मोटारसायकली चोरीच्या घटना सुरूच आहेत. तोफखाना पोलिसांसमोर चोर पकडण्याचे आव्हान आहे.

शहर बँक वाचली
चोरी झालेल्या हिंदुजा फायनान्स कंपनीच्या कार्यालयाच्या वरील बाजूला शहर सहकारी बँकही आहे. चोरट्यांनी फायनान्स कंपनीकडे मोर्चा वळविल्याने बँकेकडे कानाडोळा केला. बँक सुरक्षा व्यवस्थेच्या भितीने चोरटे बँकेत घुसले नसावेत. त्यामुळेच बँक वाचल्याची चर्चा परिसरात ऐकावयास मिळाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!