माजी आमदार राजीव राजळे अनंतात विलीन : सोशल मीडियाही गहिवरला! 

0

अहमदनगर (प्रतिनिधी) : माजी आमदार राजीव राजळे यांच्या निधनाचे वृत्त रविवारी पाहटेपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले. राजळे यांची ओळख एक उच्च शिक्षित, अभ्यासू तरुण नेता अशी होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. राजकारणातील एक उमदा अभ्यासू व्यक्तीमत्वाला जिल्हा हरपला असल्याची श्रध्दांजली फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून उमटल्या. आमदार असताना राजळे यांचे विधानसभेतील अर्थसंकल्पावर केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणासह राजळे यांच्या अनेक आठवणींना या निमित्ताने अनेकांनी उजाळा दिला.

माजी आमदार राजळे यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांसह जिल्ह्याच्या दक्षिण भागावर शोककळा पसरली आहे. राजळे हे 2004 ते 2009 या कालावधीत पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून काँगे्रसचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी विधानसभेत त्यांनी अभ्यासपूर्ण मांडलेली मते आजही जिल्ह्यातील आमदारांना आठवत आहेत. विधानसभेतील सडेतोड कामगिरीमुळे त्यांना उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

2009 मध्ये अहमदनगर (दक्षिण) मतदारसंघातून राजळे यांनी लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये पुन्हा याच मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढविली होती. दक्षिण जिल्हा आणि नगर शहरात राजळे यांना मानणार्‍या तरुण वर्गाची संख्या मोठी होती. हजर जबाबी, उच्च शिक्षित राजकारणी म्हणून तरुणवर्गाला नेहमीच राजळे यांचे आकर्षण होते.

राजळे यांचे बहुभाषेवर प्रभुत्व होते. स्वत:ची वेगळी विचारसरणी सोबत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडमोडी, विविध देशांतील राजकीय घडमोडी, तेथील इतिहास यांचे सखोल ज्ञान राजळे यांना होते. त्यांच्याकडे असणार्‍या कौशल्यामुळे तरुण कार्यकर्ते राजळे यांच्याशी जोडले गले होते.

शहरात कोणतीही राजकीय सत्ता नसताना सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे राजळे आयोजन करीत असत. यातून राजळे यांचे राजकारणसोबत अन्य क्षेत्रांत असणारे योगदान दिसून येते. वास्तुशिल्पकार विषयात पदवीधर असणारे राजळे यांचा सहकार, बँकिंग क्षेत्रात दांडगा अभ्यास होता. अत्यंत हूशार आणि हट्टी असणारे राजळे यांच्या निधनाबद्दल नगरच्या तरुणांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली.

जीवन परिचय – 
नाव : राजीव अप्पासाहेब राजळे
जन्म : 5 डिसेंबर 1969
शिक्षण : बॅचलर ऑफ ऑर्किटेक्ट
भूषविलेली पदे : संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक.
चेअरमन : पाथर्डी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ
संस्थापक अध्यक्ष : श्री वृध्देश्‍वर तालुका अ‍ॅग्रो प्रोड्युस अ‍ॅण्ड मार्केटिंग सोसायटी.
संस्थापक अध्यक्ष : आदि फाउंडेशन, आदिनाथनगर, पाथर्डी.
संचालक : श्री वृध्देश्‍वर सहकारी तालुका दूध उत्पादक व प्रक्रिया संघ पाथर्डी.
संचालक : कृषिउत्पन्न बाजार समिती, पाथर्डी.
भूषविलेली पदे : विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य.
(ऑक्टोबर 2004 ते 2009 पर्यंत)
सदस्य : कार्यकारी परिषद सदस्य, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
मिळालेले पुरस्कार – संसदपटू प्रा. मधू दंडवते आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार.
स्वामी विवेकानंद पुरस्कार.

नगर शहरातील अनेक व्हॉट्सअ‍ॅप गु्रपच्या आयकॉनवर राजीव राजळे यांचा फोटो होता. राजाभाऊ अमर रहे, एका अभ्यासू सूर्याचा अस्त झाला, उमदा राजकारणी गेला, आम्ही पोरके झालो, विद्वान नेता हरपला, ‘क्वालिफाईड’ खासदाराला नगर दक्षिणने नाकारले, अशी हुरहूर अनेकांनी व्यक्त केली. 

LEAVE A REPLY

*