माजी आमदार राजीव राजळे यांना मान्यवरांकडून श्रद्धांजली

0

अहमदनगर : अभ्यासू व विविध विषयांचा व्यासंग असलेले माजी आमदार राजीव राजळे यांच्या अकाली ‘एक्झीट’ने विविध क्षेत्रातील मान्यवर हळहळले. त्यांनी राजळेंच्या आठवणींना आपल्या शब्दातून उजाळा देत श्रद्धांजली वाहिली .

ग्रामीण राजकारणाची उत्तम जाण असणारे, उत्तम वक्तृत्व शैली व वैयक्तिक मैत्रीचा वसा कायम जपणारे उत्तम वाचक, उत्तम निरीक्षक, उत्कृष्ट वक्ता म्हणून राजळेंनी आपला ठसा कायम उमटविला. राज्याच्या राजकारणात राजळें सारखे अभ्यासू नेते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतात. राज्यासह पक्षाची त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

 

माजी आमदार राजीव राजळे यांच्या निधनामुळे एक अभ्यासू आणि प्रश्नांची जाण असणारे सजग, संवेदनशील तरुण नेतृत्व हरपले आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय वाटचालीची सुरूवात केली. राजकारणात त्यांनी स्वकर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. लोकांच्या प्रश्नांसाठी ते नेहमी आक्रमक असायचे. संगीत आणि साहित्यावर विशेष प्रेम करणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. विधानसभेत आणि जिल्ह्यातील अनेक संस्थांमध्ये आम्ही एकत्रितपणे काम केले होते. या काळात ते विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नेहमी माझ्याकडे येत होते. भविष्याचा वेध घेणारे तरुण नेतृत्व त्यांच्यामध्ये पाहायला मिळत होते. प्रवरा पब्लिक स्कूलचे ते माजी विद्यार्थी होते. काळाने या उमद्या व्यक्तीमत्वावर अचानक घाला घातल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
-राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्ष नेते

 

स्व. दादापाटील राजळे, स्व. भाऊसाहेब थोरात, माजी आमदार अप्पासाहेब राजळे यांचा समाजकारणाचा वारसा समृध्दपणे चालवितांना राजीवने जिल्ह्यात व राज्यात अभ्यासू युवा नेतृत्व म्हणून आपला लौकिक निर्माण केला होता. धाडसी, धडाडीचा व हरहुनरी व्यक्तीमत्व लाभलेल्या माजी आमदार राजीवने सहकार, समाजकारण, युवक संघटन, शिक्षण, शेती अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठे योगदान दिले असून लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत अभ्यासपूर्ण केलेली भाषणे सदैव स्मरणात राहणारी आहेत. राजीव यांच्या अकाली जाण्याने जिल्हा, पाथर्डी तालुका तसेच राजळे व आमच्या परिवारात कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.  – आ. बाळासाहेब थोरात, माजी मंत्री

 

राजळे यांच्या जाण्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. राजळे कुटुंबाला यातून सावरण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना.
डॉ. सुजय विखे, अध्यक्ष प्रवरा साखर कारखाना.

 

 

माजी आमदार राजीव राजळे तरुण वयात आपल्यातून गेले. अत्यंत कुशाग्र बुध्दी असणारे, हुशार आणि जिद्दी स्वभाव राजीव यांचा होता. त्यांचे अकस्मात जाणे म्हणजे आकाशातील एखादा तारा अचानक नाहीसा होेण्यासारखे आहे. राजीव हे आजच्या राजकीय व्यवस्थेचे बळी आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत.– यशवंतराव गडाख, ज्येष्ठ नेते.

 

राजीव राजळे यांचे अत्यंत कमी वयात निधन झाले. सहकार, बँकिंग क्षेत्राचा त्यांचा अभ्यास गाढा होता. राजकारणासोबत त्यांनी या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला. त्यांची काम करण्याची पध्दत वेगळी होती. त्यांच्या अकाली निधनाने दु:ख होत असून पाथर्डीच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते.– खा. दिलीप गांधी, अहमदनगर.

 

नियतीपुढे आपले काही चालत नाही. अप्पासाहेब व मोनिकाताई यांचे दुःख मोठे आहे. मात्र ना. पंकजाताई व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या सारखे खंबीर नेतृत्व राजळे कुटुंबाच्या पाठीमागे असल्याने या दुःखातून त्यांना सावरण्याचे बळ मिळेल. राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.– आ. शिवाजी कर्डिले राहुरी.

 

 

संपूर्ण राज्यातील तरुणांचा सहकारी गेला आहे. विधानसभेमध्ये संधी मिळाल्यानंतर त्यांनी संधीचे सोने केले. अभ्यासू नेतृत्व असलेले व पुस्तकाबद्दल खूप प्रेम असलेला तालुक्यातील गोरगरिबांचा कैवारी हरपला.– आ. वैभव पिचड, अकोले.

राजीव राजळे यांचे विधानसभेतील कामकाज हे सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखे आहे. राजळे यांना राजकीय वारसा असला तरी अत्यंत कमी वयात आणि कमी कालावधीत त्यांनी आपली राजकीय प्रगल्भता सिध्द केली. नगरसह राज्याच्या राजकारणात त्यांची वेगळी ओळख होती. गल्लीपासून आंतरराष्ट्रीय घडामोडीबाबत त्यांचा अभ्यास होता. ते हरहुन्नरी नेतृत्व होते.– आ. राहुल जगताप, श्रीगोंदा.

राजीव राजळे व माझे जिव्हाळ्याचे संबध होते. मित्र, आमदार म्हणून त्यांनी मनापासून मदत केली. त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांचे मला अनमोल सहकार्य लाभले आहे. राजळे कुटुंबाच्या दुःखात नेवासा मतदारसंघ सहभागी आहे.– आ. बाळसाहेब मुरकुटे, नेवासा

या वयात राजळेंचे निधन होईल हे स्वप्नातही वाटले नव्हते. माझा राजळे कुटुंबाबरोबर व्यक्तिगत स्नेह पूर्वीपासून असून त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो.– आ. भीमराव धोंडे, आष्टी.

राजळे यांच्या निधनाच्या बातमीवर विश्‍वास बसत नव्हता. तरुण वयात त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. – प्रा. शशिकांत गाडे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना

तरुण नेतृत्व हरपले. राजळे यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ते कर्तबगार सहकारी होते.
-सीताराम गायकर, जिल्हा सहकारी बँक.

अत्यंत जिवलग जवळाचा मित्र, स्नेही आणि राजकारणातील उत्कृष्ट व्यक्तीमत्व राजीव राजळे होते. आमदार असताना विधानसभेत त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण असायची. त्यांच्या अचानक जाण्यावर विश्‍वास बसत नाही. दीड महिन्यापासून ते आजारी होते. यातून ही घटना घडली. राजळे यांच्या निधनाची बातमी ऐकून मोठे दु:ख वाटले. राजकारणातून अशी हुशार, उच्च विद्याविभूषित गेल्याचे वाईट वाटते. राजळे यांच्या राजकारणाची आज गरज होती. – अनिल राठोड, उपनेते, शिवसेना.

अतिशय कर्तबगार, राज्याच्या अर्थसंकल्पासारख्या क्लिष्ट विषयांसोबत सहकार आणि शेतीचा अभ्यास असणारा नेता आज हरपला आहे. राजीव राजळे हे सामान्यांसोबत नेहमी राहिले आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्याच सोबत युवकांच्या प्रश्‍नात लक्ष घातल्याने ते युवकांचे नेते होते. – जयंत ससाणे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस.

राजीव राजळे यांची अकाली निधन ही अतिशय वाईट घटना आहे. राजकारणापलीकडे विकासाच्या मुद्द्यावर काम करणारा मित्र गमावला. त्यांच्या कुटुंबीयाच्या दु:खात सहभागी आहोत. -चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी.

राजळे यांना दुःखद अंत:करणाने निरोप दिला. त्यांनी तालुक्याच्या विकासाचे उत्तम काम केले आहे. विधानसभेत त्यांनी उत्कृष्ट भाषण करून संसदपटूचा बहुमान मिळविला होता. या थोर सुपुत्राच्या जाण्याने आपण पोरके झालो आहोत. त्यांच्या जाण्याने तालुक्यातच नाहीतर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. – माजी खा. दादा पाटील शेळके, नगर.

युवक काँग्रेसमधून राजकीय वाटचाल करणार्‍या माजी आमदार राजीव राजळे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून राज्याचे लक्ष वेधले. धडाडी, नाविन्याचा अभ्यास, मोठा जनसंपर्क यामुळे युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या माजी आमदार राजीव राजळे यांच्या अकाली जाण्याने जिल्ह्याची मोठी हानी झाली असून जिल्ह्यातील अभ्यासू युवक नेता हरपला आहे. -आ. डॉ. सुधीर तांबे, पदवीधर मतदार संघ.

राजीवभाऊ हे जिल्ह्यातील व राज्यातील युवकांसाठी कायम मार्गदर्शक राहिले. युवा संघटन, विविध भाषांवर प्रभुत्व असलेल्या भाऊंनी कायम माझ्यासह अनेक युवकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या निधनाने जिल्हा, राज्यातील युवक वर्ग हळहळला आहे. आमच्या परिवारातील ज्येष्ठ बंधूला आम्ही मुकलो असून राज्यातील युवकांचा ‘आयडॉल’ हरपला आहे.
– सत्यजित तांबे, प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष

राजळे यांच्या निधनाची बातमी कळाली आणि धक्का बसला. काळे परिवार राजळे कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.
– आशुतोष काळे, अध्यक्ष कोसाका साखर कारखाना.

तरुण नेता आपल्यातून निघून गेला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचा जवळून परिचय झाला. एक लोकसंग्रह असलेला नेता आपल्यातून गेला आहे.– बबनराव पाचपुते, माजी मंत्री.

जिल्ह्याच्या विकासाची दृष्टी असलेला नेता सोडून गेला आहे. जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे.
– प्रा. भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष भाजपा.

राजकारणा पलीडे जाऊन राजीव राजळे आणि माझी वैयक्तिक मैत्री कधीच तुटू शकली नाही. आता मैत्रीची गुपिते लोप पावली. एक चांगला मित्र गमावला आहे. एकमेकांचे सुखदुःख सातत्याने वाटुन घेतले. तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे. लोकनेतृत्व लोप पावले आहे. तालुक्याची फार मोठी हानी झाली आहे. माझे ढव्यक्तीगत नुकसान झाले.
– प्रताप ढाकणे, सरचिटणीस, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस.

राजळे यांच्यावर प्रेम करणारे राहुरी तालुक्यात खूप लोक आहेत. त्यांच्या जाण्याने मोठे संकट कोसळले आहे.
– शिवाजी गाडे, जि. प. सदस्य. 

राजळे यांच्या जाण्याने शेवगाव-पाथर्डी मतदारसंघ पोरका झाला आहे. सर्वसमावेशक नेतृत्व हिरावले आहे.
– बापूसाहेब पाटेकर (भाजप – शेवगाव)

प्रचारात विद्यार्थी भेटल्यानंतर त्यांच्याशी गप्पा मारणारे आणि नोबेल विजेते मोहम्मद युनूस व दलाई लामा यांना भेटून अर्थकारण व जागतिक शांततेविषयी चर्चा करणारे हे व्यक्तिमत्त्व पुन्हा भेटणे नाही!

 

 

 

 

LEAVE A REPLY

*