Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

विखेच फौजदार

Share
काँग्रेसचा नगरमध्ये मोर्चा थोरातांनी फिरविली पाठ
अहमदनगर (प्रतिनिधी) – मोदी सरकारच्या काळातील महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसने आज (मंगळवारी) अहमदनगर शहरात भव्य मोर्चा काढत सरकारला जाब विचारला. मोर्चासाठी माजी मंत्री तथा काँग्रेस केंद्रीय समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी जाहीर केले खरे, पण ऐनवेळी थोरातांनी मोर्चाकडे पाठ फिरवत नगर शहर काँग्रेसची फौज विखे यांच्या हवाली केल्याचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली. पंधरवड्यापूर्वीच युवक काँग्रेस शहराध्यक्षपदही थोरातांनी विखेंना लखलाभ केल्याचा संदर्भ पुष्ट्यर्थ दिला जात होता.
इंधनामुळे महागाई दिवसागणिक वाढत आहे. पेट्रोलने नव्वदी तर डिझेलने ऐंशी गाठली आहे. राफेल विमान खरेदीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नगर जिल्हा काँग्रेसने सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढला.
आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, बाळासाहेब हराळ, पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे, अंबादास पिसाळ, वसंतराव कापरे, शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखील वारे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, माजी नगरसेवक धनंजय जाधव, प्रताप शेळके, उबेद शेख, विनायक देशमुख, कांचन मांढरे, सविता मोरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले.

बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोर्चा कलेक्टर कार्यालयाकडे निघाला. मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पोहचल्यानंतर विखे पाटील मोर्चात सहभागी झाले. ते थेट पुण्याहून मोर्चात पोहचल्याचे सूत्रांनी सांगितले. कलेक्टर कार्यालयात मोर्चेकर्‍यांनी कलेक्टरांनी निवेदन दिले. त्यानंतर विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

वायुदलासाठी विमान खरेदीचा निर्णय झाला. त्यावेळी 126 विमान खरेदीची चर्चा सुरू झाली पण मोदी सरकारने केवळ 36 विमानांचीच खरेदी केली. युपीए सरकारच्या काळात एका विमानाची किंमत 526 कोटी रुपये निश्चित केली असताना मोदी सरकारने 1 हजार 670 कोटी रुपये एका विमानाच्या खरेदीसाठी मोजले. हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या खरेदीत झाला. काँग्रेसच्या चौकशीच्या मागणीचा केंद्राने विचारच केला नाही. सर्वपक्षीय संयुक्त संसदीय समितीमार्फत या खरेदीची चौकशी करावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. राजकीय फायद्यासाठी हा मोर्चा नाही. देशाचे पंतप्रधान मोदी हे केवळ अंबांनीच घर भरण्यासाठीच कार्यरत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. राज्यसरकारने लावलेला दुष्काळ कर कमी केला तरी पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील, त्यातून जनतेला दिलासा मिळेल, पण राज्य सरकार तेही करायला तयार नाही. या महागाईचा निषेध मोर्चात करण्यात आला.

विखे-थोरातांच्या मनोमिलनाचा नुसताच दिखावा
जिल्हा काँग्रेसअंतर्गत आमदार बाळासाहेब थोरात आणि विखे पाटील यांचे दोन गट जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याला ठाऊक आहेत. तुरळक कार्यक्रमात दोघे एकत्र येतात. इतर वेळी त्यांचा सवता सुभा ठरलेला असतो. प्रदेश समितीने कान टोचल्यानंतर दोघांनी ‘हम साथ-साथ है’ (मनोमिलन)चा नारा दिला, खरा पण तो केवळ दिखाव होता, हेच आज स्पष्ट झालं. विखे पाटील मोर्चात आले पण थोरातांनी मात्र पाठ फिरविली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!