डॉ. विखे-थोरात सक्रीय

0

काँग्रेस उमेदवारांना दिलासा

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका प्रचाराला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील अन् त्यांचे चिरंजीव युवा नेते डॉ. सुजय आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात सक्रीय झाल्यामुळे काँग्रेस उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. विखे यांनी काल सावेडीतील पद्मानगर येथे सभाही घेतली. डॉ. सुजय आणि थोरात यांनी शहरातून आज रॅली काढली तर सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

महापालिका निवडणुकीसाठी डॉ. विखे पाटील यांच्याकडे प्रदेश काँग्रेसने अधिकार सुपूर्द केले होते. त्यापूर्वी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्याकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून फारसा इंटरेस्ट न दाखविण्यात आल्यामुळे ही जबाबदारी बदलून डॉ. विखे पाटील यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानंतर त्यांनी जागावाटपाच्या चर्चेपासून उमेदवार निश्‍चितीपर्यंत सर्व निर्णय वेगाने घेतले. एवढेच नव्हे, तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी केडगाव येथील काँग्रेसचे सर्व उमेदवार अचानक भाजपमध्ये गेल्यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली. त्यातूनही त्यांनी वेगाने हालचाली करीत केडगावला आठपैकी सात जागांवर काँग्रेसचे उमेदवार उभे केले.

या प्रक्रियेनंतर आघाडीच्या प्रचार शुभारंभास डॉ. विखे यांनी हजेरी लावली. मात्र प्रत्यक्ष प्रचारात काँग्रेसचे नेते येत नसल्याने उमेदवार हवालदील होते. प्रचाराला अवघे तीन दिवस शिल्लक असताना काल डॉ. विखे पाटील यांची सावेडीत प्रभाग दोनमधील रुपाली वारे, संध्याताई पवार या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा झाली. एवढेच नव्हे, तर शहरातील इतर काँग्रेसच्या उमेदवारांबाबत माहिती घेऊन त्यांनी संबंधित ठिकाणी फिल्डिंग लावली.

त्यांच्या या सभेनंतर आज लगेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात नगरमध्ये हजेरी लावली. प्रभाग दहामध्ये थोरात यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच थोरात नगरमध्ये येत आहेत. गेले काही दिवस विधानसभेच्या अधिवेशनात ते व्यस्त असल्याने शहरात येऊ शकले नाहीत. मात्र आता प्रचाराला दोन दिवस शिल्लक असतानाच त्यांनी हजेरी लावणे, काँग्रेस उमेदवारांसाठी दिलासा देणारे ठरणारे आहे.

LEAVE A REPLY

*