चोपडांची गणेशवंदना

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – सत्ता असो किंवा नसो शिवसेनेने कायमच अन्याय केल्याची भावना निर्माण झालेले सावेडीतील महाराज म्हणजेच दिगंबर ढवण यांनी ‘श्रीरामाचा जप’ सुरू केला आहे. दुसरे माजी नगरसेवक संजय चोपडा यांनाही शिवसेनेने वार्‍यावर सोडले आहे. त्यामुळे त्यांनी सेनेचा हात सोडत मनसेचे गणेश भोसले यांची साथ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भोसलेच राष्ट्रवादीच्या तर ढवण महाराज भाजपात जाणार असून प्रवेशाचा मुर्हूत अजून ठरलेला नाही.
संजय चोपडा हे गत तीस वर्षापासून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्याशी एकनिष्ठ राहिले. मर्चंट बँकेचे संचालक आणि जैन समाज संघटनेचे अध्यक्षपद लाभलेले चोपडा यांना मात्र शिवसेनेने काहीच दिले नाही, अशी त्यांची भावना झाली आहे. 2003 आणि 2008 च्या सार्वत्रिक निवडणुकीतही चोपडांचा पत्ता शिवसेनेने कट केला. 2003 साली चोपडा अपक्ष म्हणून विजयी झाले तर 2008 मध्ये त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला होता. आताही प्रभाग 12 मधून त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मागणी केली, पण त्यांना शिवसेनेने वार्‍यावर सोडले.

महापौर मिस्टर संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी चोपडा यांचा पत्ता कट करत समीर बोरा यांची शिष्टाई अनिल राठोड यांच्याकडे केली. त्यामुळे नाराज झालेले चोपडा यांनी मनसेचे गणेश भोसले यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. चोपडा स्वत: प्रभाग 12 मधून तर त्यांची मिसेस मीनाताई या प्रभाग 14 मधून उमेदवारी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संजय चोपडा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘भोसले घेतील तो निर्णय’ मान्य असल्याचे सांगत राष्ट्रवादी प्रवेशाचे संकेत दिले आहेत.

सावेडीतील दिगंबर ढवण यांनीही शिवसेनेत अन्याय होत असल्याची हाक देत सेनेला जयमहाराष्ट्र केला आहे. भाजपचे खासदारपूत्र सुवेंद्र गांधी यांनी त्यांना पेढाही भरविला. त्यानंतर गांधी-ढवण यांचे सुरात सुर मिसळले. बैलापोळ्याच्या मिरवणुकीला खासदार दिलीप गांधी यांनी ढवण वस्तीत ‘महाराजांच्या मिरवणुकीला’ हजेरी लावत त्यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. महाराज सेनेचे उमेदवार असतील की भाजपचे ही उत्सुकता आता संपल्यात जमा आहे. प्रभाग 1 मधून त्यांना भाजपचे तिकिटही फायनल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहराध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनीही त्याला ‘ग्रीन सिग्नल’ दिला असल्याचे समजते.

चोपडा, ढवणच्या तिकिटाला शिवसैनिकांचा विरोध
चोपडा हे अनिल राठोड यांच्यासोबत कायमच एकनिष्ठ राहिले, पण त्यांना काहीच मिळाले नाही. उमेदवारीसाठी ते स्वत: भैयांना भेटले, पण कदम, फुलसौंदर यांनी बोरासाठी प्रतिष्ठा पणाला लावली, त्यामुळे चोपडा हे भैयांना नमस्कार करून निघून आले. माझ्यामुळं त्यांची अडचण नको असं म्हणत त्यांनी सेनेपासून अलिप्त होण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजले. ढवण यांचेही परतीचे दोर कापले गेले आहेत. सेनेच्या पदाधिकार्‍यांचा ढवण यांच्या सेना उमेदवारीला विरोध असल्याचे समजते. त्यामुळंच महाराज भाजपात जातील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

LEAVE A REPLY

*