सत्यजित तांबेंच्या कार्यालयात काँग्रेसजनांचा क्रांतिदिनी भडका

0
गटबाजीतून चव्हाणांचा मागितला राजीनामा
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहर काँग्रेसमधील सुंदोपसुंदीचा काल (गुरूवारी) क्रांतीदिनीच भडका उडाला. क्रांतिकारकांना अभिवादनासाठी प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या लालटाकी येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रभारी शहराध्यक्ष ’दीप चव्हाण, चले जाव’चा नारा देत पदाधिकार्‍यांनी त्यांचा राजीनामा मागितला. यावेळी उपस्थितांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.
नगरसेवक दीप चव्हाण हे नगर शहरजिल्हा काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यपध्दतीवर पक्षांतर्गत नाराजीची भावना आहे. दीप चव्हाण यांच्यावर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात गटाचा शिक्का लागलेला आहे. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेस अंतर्गत उपक्रमही थांबल्याचा आरोप आहे. दीप चव्हाण यांच्या कार्यकाळात पक्षाची वाताहत झाल्याची भावना अन्य पदाधिकार्‍यांमध्ये असून त्याचा भडका कालच्या बैठकीत उडाला. क्रांतीदिनानिमित्त काँग्रेसच्या लालटाकी येथील पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपाध्यक्ष बाळासाहेब भंडारी, ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, उबेद शेख, गौरव ढोणे, दिलीप सकट यांच्यासह केवळ 8 जण उपस्थित होते. काँग्रेसच्या कार्यक्रमाला सुरूवात होण्यापूर्वीच उपस्थितीवरून चर्चा सुरू झाली. काँग्रेस पक्षाच्या या परिस्थितीला विद्यमान प्रभारी अध्यक्ष दीप चव्हाण हेच जबाबदार आहेत. त्यांच्या कार्यपध्दतीमुळे कार्यकर्ते, पदाधिकारी बैठकीला येत नाहीत, असा थेट आरोप उपस्थितांनी चव्हाण यांच्यावर केला.

‘पक्षाच्या या परिस्थितीला तुम्हीच जबाबदार आहात, तुम्ही राजीनामा द्या, अशी थेट मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर दीप चव्हाण यांनी ‘तुम्ही काय बोलता’ असे म्हणत सारवासारव केली. हा वाद इतका विकोपाला गेला की अखेर सगळेच हमरीतुमरीवर आले. नंतर दोन्ही बाजुने सामंज्यस्याची भूमिका घेतल्याने हा वाद मिटला. चव्हाण विरोधी गटाने कार्यालयातून ‘वॉक आऊट’ केले. पण त्याची चर्चा शहरात सर्वत्र सुरू आहे. या बैठकीला एकही महिला पदाधिकारी उपस्थित नव्हती. ज्या उद्देशाने ही बैठक बोलविली, तो उद्देश सार्थ झालाच नाही. हुतात्मा स्मारक येथे क्रांतीविरांना अभिवादन केले जाणार होते, मात्र वादावादीमुळे अभिवादनही करण्यात आले नाही. कार्यालयातच प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रम उकरण्यात आला.

चव्हाणांवर थोरातांचा शिक्का
नगर शहरजिल्हा काँग्रेसचे कार्यालय बंद झालेले आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांचे खासगी कार्यालय लालटाकी येथे आहे. तांबे यांच्या याच कार्यालयात शहर काँग्रेसचे कार्यक्रम होतात. आजही या कार्यालयाकडे तांबे यांचे कार्यालय म्हणून पाहिले जाते. प्रभारी शहराध्यक्ष दीप चव्हाण हे तांबे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. विखे गटाचा त्यांना विरोध आहे. तांबे यांच्या याच कार्यालयात पदाधिकारी व दीप चव्हाण यांच्यातील वाद रंगला.

म्हणूनच नाशिकच्या बैठकीकडे पाठ
गत महिन्यात मुंबईत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थित बैठक झाली. या बैठकीला दीप चव्हाण सोडून सगळेच पदाधिकारी उपस्थित होते. तेथेही दीप चव्हाण यांच्या उचलबांगडीची मागणी झाली. त्यावर खासदार अशोक चव्हाण यांनी ‘मी स्वत: नगरला येऊन, चर्चा करतो, प्रश्न सोडवितो, असे आश्वासन पदाधिकार्‍यांना दिले. त्यानंतर गत आठवड्यात नाशिक येथे पक्षनिरीक्षकांची बैठक झाली. खासदार तथा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांचा निर्णय होत नाही, तोपर्यंत नाशिकच्या बैठकीला जाण्यात अर्थ नाही, असे सांगत पदाधिकार्‍यांनी या बैठकीकडे पाठ फिरविली.

LEAVE A REPLY

*