मंत्र्यांचा वापर खिसे भरण्यापुरताच

0

आ. जगताप । 11 महिन्यांत मंत्रिपद गेलेल्यांनी अक्कल शिकवू नये

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना मंत्र्यांचा नगरला शून्याचाही फायदा नाही. मंत्र्यांच्या माध्यमातून शिवसेनेचे उपनेते नगर शहर विकासाला हातभार लावू शकले नाहीत. शिवसेना मंत्र्यांचा फायदा फक्त खिसे भरण्यापुरताच ‘त्यांनी’ करून घेतला. 11 महिन्यांत मंत्रीपद हिसकावल्या गेलेल्यांनी पक्षनिष्ठेच्या बाता करू नये. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यासाठी तुमचे मंत्री राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोलले याचा विसर पडला का? ‘एका हाताने घ्यायचे अन् दुसर्‍या हाताने द्यायचे, अशी निती असलेल्यांनी पक्षनिष्ठा शिकवू नये, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यावर पलटवार केला.
दुसर्‍याच्या पक्षात काय चालले हे डोकावण्याचे उद्योग सोडून द्या. ‘त्यांना’ उठता, बसता अन् झोपता नुसताच ‘संग्राम’ दिसतो. लोकसभेच्या निवडणुकीत युती असतानाही त्यांनी ती कधी पाळली नाही, त्यामुळं 11 महिन्यात तुमचं मंत्री पद काढून घेतलं. पक्षनिष्ठा तुम्ही आम्हाला शिकवू नका, आम्हाला ती कळते. 2014 ला नगरकरांना तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली. आता घोडा-मैदान जवळच आहे, यंदाही नगरकर तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील असा आशावाद जगताप यांनी व्यक्त केला.
अनिल राठोड यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार जगताप बोलत होते. शहरजिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक गणेश भोसले, विनीत पाउलबुधे, कुमारसिंह वाकळे, संपत बारस्कर, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा यावेळी उपस्थित होते.
केडगाव हत्याकांडातून सुटका आणि पैसे घेऊन भाजपला पाठिंबा दिला या शिवसेनेच्या आरोपावर जगताप यांनी ‘त्यांचे आरोप त्यांनाच कळत नाही’ असे उत्तर दिले. राष्ट्रवादी पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांचा अधिकारच नाही. त्यांच्या नेतेमंडळींनी आमच्या नेत्यांकडे महापौर पदासाठी पाठिंबा मागितला होता. पण तो आम्ही दिला नाही. तुमच्या पक्षात काय चालले याचे अगोदर आत्मचिंतन करा. आमच्या नगरसेवकांचे मत त्यांनी खुलासाद्वारे पक्षाकडे पाठविले. तो त्यांचा अधिकार आहे. यांच्याकडे आयएसओ प्रमाणपत्र नाही, त्यामुळं त्यांना विचारून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे असे अजिबात नाही.
केडगाव प्रकरणाच्या सगळ्या चौकशीला मी सामोरे गेलो. सीआयडी चौकशी झाली. त्यात काहीच सिध्द झालं नाही. मात्र आम्हाला गुंतविण्यासाठी ‘त्यांनी’ मंत्र्यांचा दबाव आणला, हे सगळे नगरकर जाणताहेत. उलटपक्षी रुग्णवाहिका वेळेत पोहचली असती तर त्या दोघांचे प्राण वाचले असते. मात्र यांनी रुग्णवाहिका जावू दिली नाही. त्यामागे त्यांचा राजकीय स्वार्थ होता. पोलिसांच्या रिपोर्टमध्येही ते आलं आहे. सत्ता त्यांचीच, मंत्री त्यांचेच असल्याने पोलिस खोटे रिपोर्ट देणार नाहीत.
त्यांनी आजपर्यंत कोणत्याच शिवसैनिकाला मोठे होऊ दिले नाही. रिक्षा आणि पानटपरीच्या पुढे शिवसैनिक कधी गेले नाही. तुम्ही 25 वर्षे सत्ता उपभोगली, शहरासाठी काय केलं? असा सवाल आमदार जगताप यांनी विचारला.
आजपर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती राहिलेली आहे. मात्र शहराचे प्रतिनिधी असलेल्या राठोड यांनी युतीचा धर्म कधीच पाळला नाही. उमेदवाराविरोधी काम केले. या काहाण्या मुंबईपर्यंत पोहचल्या. त्यातून 11 महिन्यात त्यांचे मंत्रीपद गेले. त्यामुळं पक्षनिष्ठा तुमच्याकडून काय शिकायची, ती आम्हाला कळते अशा शब्दात जगताप यांनी राठोड यांच्यावर निशाणा साधला.
एका हाताने घ्यायचे अन् दुसर्‍या हाताने द्यायचे अशी त्यांची निती आहे. राजकारणात कोण कोणाचे मित्र आहे. अन् कोण साटंलोट करतं हे नगरकरांना तुमच्याच तोडून कळलं. तुम्ही आजपर्यंत काय सेटलमेंट केली, हे आम्हाला सांगयाला लावू नका असे स्पष्ट करत जगताप यांनी राठोड यांच्या आरोपाचे खंडण केले.
………………………..

राष्ट्रवादीवाल्यांच्या मारहाणीसाठी दबाव
नगरसेवक स्व. कैलास गिरवले यांचा मृत्यूला शिवसेना आणि त्यांचे मंत्री कारणीभूत आहेत. राष्ट्रवादीवाल्यांना मारहाण करा, त्यांना जामीन होऊ देऊ नका, असे फोन करून मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनावर दबाव आणला जात होता. तुमच्या त्या फोनने मारहाण झाली अन् मामांचा मृत्यू झाला. त्यामुळं ते पाप तुमचंच, असा पलटवार जगताप यांनी केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटकेनंतर आठवडाभर, पंधरवडाभर जामीन मिळाला. शिवसैनिकांना मात्र लगेचच जामीन होत होता, हे नगरकरांनी पाहिले. यापेक्षा दुसरे वेगळा काय पुरावा पाहिजे, असे सांगत जगताप यांनी शिवसेनेच्या दुष्कृत्याचे उदाहरण दिले.

.. तर भाजपचा पाठिंबा काढू
विकासाच्या मुद्द्यावर भाजपला महापालिकेत पाठिंबा दिला आहे. त्याकडे भाजपचे दुर्लक्ष झाले अन् महापालिकेत चुकीचे काम होत असेल तर सभागृहात त्याला राष्ट्रवादीचे नगरसेवक विरोध करतील. आंदोलन करतील, वेळप्रसंगी त्यांना पाठिंबाही काढून घेतला जाईल.

 

LEAVE A REPLY

*