‘बंद’तून उघडले आघाडीचे दार

0
आ. संग्राम म्हणाले, त्यांचा ‘निकाल’ लावा
अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी करण्यास दोन्ही पक्षांतील नेते सकारात्मक आहेत. परंतु प्रस्ताव कोणी द्यायचा, असा सवाल सध्या उभयतांमध्ये आहे. मात्र, चर्चेची कोंडी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी फोडली आहे. काँग्रेसने पाळलेल्या बंदमध्ये सहभागी होत त्यांनी आघाडीसाठी आम्ही सज्ज असल्याचे संकेत दिले. मात्र, काँग्रेसच्या कुंपणावर बसलेल्यांता अगोदर निकाल लावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
महापालिका निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही? याचा निर्णय घेण्यासाठी पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी कमिटी नेमली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखालीच राष्ट्रवादी महापालिकेच्या आखाड्यात उतरण्याची घोषणाही केली. दोन्ही काँग्रेसची आघाडी होईल की कशी? या प्रश्नांचे उत्तर संग्राम जगताप यांनी आज जाहीरपणे दिले. आपल्याला आघाडी करायची, मात्र काँग्रेसच्या दलबदलूंचं काय करायच? ते अगोदर करा असं सांगत आघाडीचे संकेत दिले. महागाई विरोधात पुकारलेला भारत बंदच्या निमित्ताने दोन्ही काँग्रेसने आज कलेक्टर कार्यालयावर मोर्चा काढत तेथे निदर्शने केली. मनसे, रिपाईदेखील यात सहभागी झाले. कलेक्टर कार्यालयासमोर झालेल्या निषेध सभेत संग्राम जगताप यांनी मनोगत व्यक्त केलं.
जगताप म्हणाले, काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादीचा पाठींबा आहे. देशात महागाई दिवसांगणिक वाढत आहे. महागाई रोखण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. मराठा आरक्षण आंदोलनावेळी राज्यातील सत्ताधारी पोलीस संरक्षणात फिरत होते. खिशात घातलेले राजीनामे बाहेर कधी येणार? असे सांगत त्यांनी शिवसेनेलाही चिमटा घेतला. आजच्या आंदोलनात राष्ट्रवादीचे आजी-माजी-भावी नगरसेवक सहभागी झालेत. तुमचे काँग्रेसचे मात्र मोजकेच उपस्थित आहेत. तुमचे नगरसेवक सकाळी एकासोबत, दुपारी दुसर्‍यासोबत अन् रात्री तिसर्‍याच्याच गाडीत दिसतात. त्यांचं काय करायचं ते एकदाचं करून टाका. आपल्याला महापालिकेत आघाडी करायची आहे. त्याआधी ‘त्यांच काय करायचं ते करा’ असे सांगत आमदार जगताप यांनी त्यानंतर लगेचच निर्णय घेण्याचे जाहीरपणे सांगितले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, निखील वारे, उबेद शेख, कुलदिप चव्हाण, नगरसेवक मुद्दसर शेख, सविता मोरे, बाळासाहेब पवार, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, राहुल जगताप, शहरजिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, अविनाश घुले, महिलाअध्यक्ष रेश्मा आठरे, माजी महापौर अभिषेक कळमकर, अभिजीत खोसे, ऋषी ताठे, आंबादास गारूडकर, मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, अभिषेक मोरे, युनायटेड रिपाईचे अशोक गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
……………………….
शिवसेना अलिप्त
भारत बंदमध्ये शिवसेनेने सहभागी होऊ नये यासाठी भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी सकाळी संपर्क केला. त्यानंतर सेनेने बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं अहमदनगर शिवसेना या बंदमध्ये सहभागी झाली नव्हती.
…………
बंद फिफ्टी-50
काँग्रेसने भारत बंदचा नारा दिला असला तरी नगरमध्ये मात्र बंद पाळला गेला नाही. सगळे व्यवहार सुरळीत सुरू होते. एस.टीने मात्र आपल्या सगळ्या फेर्‍या बंद केल्या. बाहेरगावच्या बसेस तेवढ्या ये-जा करत होत्या. तालुक्यात बंद पाळला गेला. नगरमध्ये मात्र असा बंद झाला नाही. कलेक्टरांना निवेदन देत नगरात निदर्शने झाली. त्यामुळं जिल्ह्यात संमिश्र बंद तर शहरात निदर्शने असे चित्र दिसून आले.

LEAVE A REPLY

*