Type to search

मुख्य बातम्या सार्वमत

भंडारा गोंधळींचा!

Share

पक्षातून हकालपट्टी करत ‘ना घर का, ना घाट का’ अशी अवस्था असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरमधील 18 नगरसेवकांच्या माथी मंगळवारी गोंधळाचा भंडारा लागला. गोंधळींचा हा भंडारा म्हणजे त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी एक धब्बा आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच राडा करून या नगरसेवकांनी परतीचे दोर स्वतःहून काटले. पक्षाकडून अन्याय झाल्याची भावना नगरसेवकांमध्ये आहे.

ती त्यांच्या लेखी खरी असली तरी लोकशाही मार्गाने पक्षश्रेष्ठींसमोर ती मांडण्याचे सोडून भलतीच धरपकड करत मनातील खदखदीला त्यांनी वाट मोकळी करून दिली. हे सगळं अनपेक्षितपणे घडलं असलं तरी त्यावर झाकण टाकून सभ्यपणाचे दर्शन घडविता आले असते, पण तसे न होता प्रदेशाध्यक्षांसमोरच हे लाजिरवाणे दर्शन घडविले अन् परतीचा दरवाजा बंद करून घेतला.

महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला सपोर्टिव्ह भूमिका घेतल्याने 18 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले. नगरची राजकीय परिस्थिती अन् विरोधी शिवसेनेची नाचक्की करण्याकरीता स्थानिक नेते आ. संग्राम जगताप व त्यांचे समर्थक असलेल्या सर्व नगरसेवकांनी हा निर्णय घेतला. शिवाय ऐनवेळी निर्णय झाल्याने पक्षातील नेत्यांच्या कानावर ‘नव्या सोयरीकिची’ बोलणी घालणे शक्य नव्हते, अशी पुस्तीही जोडण्यात आली. त्यानंतर खुलासा पाठविला तरीही बडतर्फीचा निर्णय झाल्याने पक्षाकडून अन्याय झाल्याची भावना नगरसेवकांत आहे. तो दूर करण्याकरीता थेट प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन म्हणणे मांडण्यासाठी हे नगरसेवक राष्ट्रवादीत भवनात गेले होते.

तेथे आलेले जयंत पाटील यांच्या भेटीवेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांच्याशी या नगरसेवकांची हमरीतुमरी, झटापट झाली. मुळात नगरसेवकांवर आमदार जगताप पिता-पुत्रांचे समर्थक म्हणून शिक्का लागलेला आहे, नव्हे हे नगरसेवकही त्यांचे समर्थक म्हणूनच मिरवतात. काळे हे जगताप यांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणून नगरात परिचित आहेत. पाटलांसमोर गार्‍हाणं मांडताना झालेल्या या राड्याचे समर्थन कोणीच करू शकत नाही. काळे यांच्यासमोर गार्‍हाणं कसं मांडायचं असा प्रश्‍न नगरसेवकांना कदाचित पडला असेल, त्यामुळंच काळे यांना पाटील उपस्थित असलेल्या चेंबरमध्ये प्रवेशापासून रोखलं गेलं. पुढं जे घडलं ते नगरकरांनी सोशल मीडियावर पाहिलं. यातून कोणाची इज्जत गेली, याचे आत्मपरिक्षण ज्याने त्याने करावे.

वास्तविक नगरसेवकांचे गार्‍हाणे मांडताना काळे यांनी ऐकले असते तरी ते काही करू शकत नव्हते. कारण ते डिसीजन मेकर नाहीत. काळे यांच्यासोबत झालेला ‘राडा’ शांत करण्याकरिता थेट आमदार अरुणकाका जगताप यांनाच हस्तक्षेप करावा लागला. आमदार संग्राम जगताप हे तेथे उपस्थितच नव्हते. विकासाची आस असणारा, परिपक्क झालेला, शांत, संयमी, राजकारणात असूनही दिला शब्द पाळणारा नेता म्हणून संग्राम जगताप यांच्याकडे पाहिले जाते. पण त्यांच्याच समर्थक नगरसेवकांनी घातलेला गोंधळ म्हणजे संग्रामभैय्यांची मान शरमेने खाली घालणारा प्रकार असल्याची कुजबुज सुरू झालीय.

गोंधळ कुठून कसा अन् कोणामुळं सुरू झाला, यापेक्षा नगरसेवकांनीच हे घडविलं याचीच चर्चा जोमाने सुरू आहे. अर्थात हा सगळा प्रकार अनपेक्षितपणे, अनावधानाने घडला असला तरी चार भिंतीत घडलेला प्रकार तेथेच झाकून सभ्यपणाचे दर्शन प्रदेशाध्यक्षांना घडविता आले असते. निदान तसा प्रयत्न करायला हवा होता. मात्र तसे झाले नाही. तसे झाले असते तर कदाचित प्रदेशाध्यक्षंचे ‘मनपरिवर्तन’ झाले असते. पण हताशपणे ते सगळं पाहत राहिले. त्यानंतर ‘नगरसेवकांना दया दाखविण्याचे कारण नाही, एकदा कागदावर केलेली कारवाई मागे घेणार नाही’ अशी भूमिका त्यांना मांडावी लागली. हा गोंधळाचाच परिणाम, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर 18 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यानंतर त्या सगळ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. ते पक्षाचे नगरसेवक असले तरी पक्षातून त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. तरीही या नगरसेवकांनी पक्षाध्यक्ष शरद पवारसाहेबांबद्दल अस्था, प्रेम दाखवित त्यांच्या विचारांचे पाईक असल्याचे जाहीर केले. असे असले तरी ते आता पक्षात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. नगरकरांच्या लेखी ते राष्ट्रवादीचे बंडखोर आहेत. त्यांच्या पारड्यात मतदारांनी शिवसेना आणि भाजप यांच्या विरोधात मतदान केले होते. एक प्रकारे त्यांनी भाजपला जवळ करून मतदारांचाही विश्‍वासघात केला. त्यात परत गोंधळ घालून नगरसेवकांनी परतीचे दोर स्वत:हून कापून टाकले असं चित्र निर्माण झालाय हे सत्य मान्य करावेच लागेल!

अन् कळमकरांचा काढता पाय
माणिक विधातेसरांची पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्यानंतर काळे यांच्या नियुक्तीची घोषणा होते की काय अशी शंका नगरसेवकांना होती. घटना घडत असताना तेथे माजी महापौर अभिषेक कळमकरही उपस्थित होते. पण काळे यांच्याबद्दलचा नगरसेवकांचा रागरंग पाहून कळमकरांनी तेथून काढता पाय घेतला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!