दक्षिणेत घुले, ढाकणे अन् कळमकर राष्ट्रवादीकडून इच्छुक

0

अंकुश काकडे : पांडुरंग अंभग यांच्या मताला किंमत नाही, जागा अदला-बदलीचा निर्णय शरद पवार घेतात

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात एकदा बंडखोरीमुळे तर एकदा मोदी लाटेमुळे असा दोन वेळा राष्ट्रवादीचा पराभव झाला. याचा अर्थ येथे पक्षाची ताकद नाही असा होत नाही. नरेंद्र घुले, प्रताप ढाकणे, दादाभाऊ कळमकर यांच्यासह काहीजण या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडे दक्षिण लोकसभेसाठी सक्षम उमेदवार आहेत. प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग अभंग व आ. राहुल जगताप वगळता दक्षिणेची जागा राष्ट्रवादीने लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.तसेच ही जागा मोठ्या मताने जिंकूअसे कार्यकर्ते सांगत असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी शुक्रवारी नगरमध्ये दिले. 

महापालिका निवडणूक तसेच येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर पक्षनिरिक्षक काकडे पत्रकारांशी बोलत होते. दक्षिण लोकसभा मतदार संघ (नगर) काँग्रेस सोडावी आणि शिर्डी लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादीला द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे केली होती. याबाबत काकडे यांच्याकडे विचारणा करण्यात आली. काकडे म्हणाले, अभंग यांच्या वक्तव्याला अजिबात किंमत नाही, दक्षिणेची जागा राष्ट्रवादीने लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आघाडीत नगर लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, येथून लढण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव, डॉ. सुजय विखे इच्छुक आहेत. त्यांनी या मतदार संघातील तालुक्यात जनसंपर्क दौरे केले, विविध कार्यक्रम घेतले आहेत. त्यामुळे आता दक्षिणेची जागा काँग्रेसला सोडली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दक्षिण आमच्याकडे राहिल, आम्ही लढवणार असे यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे.

अभंग यांच्या वक्तव्यावर काकडे यांनी नाराजी व्यक्त करत जागा बदल, उमेदवारी देण्याचा निर्णय शरद पवार घेतात. त्यामुळे अभंग यांच्या वक्तव्याला अजिबात किंमत नाही. त्यांनी पक्षाच्या बैठकीत असा कोणताही मुद्दा मांडलेला नाही. काँग्रेसचा उमेदवार अभंग कशाला ठरवतात हा प्रश्‍न आहे. याआधी आमदार राहुल जगताप यांनीही असे वक्तव्य केले होते. पक्षाचा विषय असा जाहीर बोलू नये अशी समज दिली आहे. आपली मते चार भिंतीच्या आतच नोंदवा, असे त्यांना बजावण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

गडाख पवारांच्या संपर्कात –
नेवासा विधानसभा मतदारसंघ हा लोकसभेच्या उत्तर मतदारसंघात मोडतो. येथील नेते गडाख हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गडाख राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीसोबतच राहतील असा विश्‍वास यावेळी काकडे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*