Thursday, April 25, 2024
Homeनगरकाँग्रेस-राष्ट्रवादीला सोडून गेलेल्यांनी काही दिवस तिकडेच रहावे!

काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडून गेलेल्यांनी काही दिवस तिकडेच रहावे!

अहमदनगर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेले नेते आता त्याठिकाणी अस्वस्थ आहेत. यातील काही मित्र आम्ही चुकलो, आम्ही फसलो असे सांगत आहेत. मात्र, त्यांनी आता काही दिवस तिकडेच रहावे. त्यांच्या जागा आता नवीन लोकांनी भरून काढल्या असून त्यांना विचारल्याशिवाय गेलेल्यांना परत घेणे योग्य नाही असे महाविकास आघाडीचे नेते मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी नगरमध्ये सांगितले.

मंत्री झाल्यानंतर आ. थोरात पहिल्यांदा नगरला आले होते. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री थोरात म्हणाले, महाविकास आघाडीचे खातेवाट निश्‍चित झाले असून एक ते दोन दिवसात ते पूर्ण होवून मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेणार का? या प्रश्‍नावर थोरात म्हणाले, जे आम्हाला सोडून गेले तेच आज मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहेत. जे पक्ष सोडून गेले त्यांच्या जागेवर अनेक तरूणांनी पक्षाच्या विजयासाठी खूप काम केले. यामुळे त्यांना विचारल्याशिवाय सोडून गेलेल्यांना पक्षात कसा प्रवेश द्यावयाचा? सोडून गेलेल्याची जागा आता दुसर्‍यांनी पकडली असून त्यांनी ती जागा भरून काढली आहे. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून गेलेल्यांनी काही दिवस तिकडेच रहावे, असा सल्ला थोरात यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

जिल्हा परिषदेत होणार्‍या सत्ता स्थापनेला अजून वेळ आहे. मात्र, या ठिकाणी महाविकास आघाडीच्यावतीने योग्य निर्णय घेण्यात यईल आणि घेतलेला निर्णय यशस्वी करूरन दाखवू, असे सांगत जिल्हा परिषदेतून विखे यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा अप्रत्यक्ष इशाराच यावेळी मंत्री थोरात यांनी दिला.

आणखी कडक शासन व्हावे
हैद्राबाद अत्याचार प्रकरणावर बोलतांना मंत्री थोरात म्हणाले, हा विषय संपूर्ण देशाचा असून सरकारने कायद्यात बदल करून हा कायदा आणखी कडक करण्यासाठी प्रयत्न करावेत. अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कडक शिक्षा होण्यासोबतच अशा प्रकरणावर निर्णय देण्यासाठी अधिकाअधिक जलदगती न्यायालयाची गरज असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

अस्वस्थतेबाबत विखे यांना विचारा
भाजपमध्ये अस्वस्थ असणार्‍यांमध्ये आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचाही समावेश आहे का, असा प्रश्‍न केला असता, ‘याची मला माहिती नाही. याबाबत विखे पाटील यांच्याकडे विचारणा करावी’, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या