Type to search

Featured maharashtra Special आवर्जून वाचाच राजकीय विशेष लेख सार्वमत

नगर दक्षिणेचा संघर्ष काठावर!

Share

नगर दक्षिणेचे काय होणार?...गेल्या काही महिन्यापासून या प्रश्‍नाने राजकीय वर्तुळाचा पिच्छा पुरवला. आता मतदान झाले आहे. या प्रश्‍नाची जागा नव्या प्रश्‍नाने घेतली आहे, ‘कोण येणार?’ उत्तरासाठी 23 मेपर्यंत संयम ठेवावा लागेल. पण राजकीय नेते आणि राजकारणात रस असलेली जनता तोवर या विषयाचे चर्वण तर करणारच!

एकवेळ एकतर्फी वाटणारी ही लढत अखेरच्या टप्प्यात अटीतटीची झाली. भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांनी तीन वर्षात मतदारसंघ पिंजून काढला होता. पण मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी अवघा एक महिना हाती असताना राष्ट्रवादीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी मारलेली मुसंडी आणि निर्माण केलेली चुरस, निकाल काहीही लागला तरी नोंद घेणारी ठरावी! विजयी उमेदवार ‘काठावर पास’ होणार, असा प्राथमिक अंदाज आहे. ही लढत राज्यासाठी लक्षवेधी का होती, याचे उत्तर या अंदाजात डोकावणार्‍या संघर्षात आहे.

नगरच्या राजकारणाने सर्वोच्च राजकीय ‘छक्के-पंजे’ या निवडणूकीत अनुभवले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ.सुजय विखे यांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या या मतदारसंघावर दावा ठोकून काम सुरू करणे, राष्ट्रवादीने उमेदवारीवरून त्यांना कात्रजचा घाट दाखविणे, मग विखेंनी भाजपाची वाट चोखाळणे, अनेक नावांवर काथ्याकूट केल्यावर राष्ट्रवादीने आ.संग्राम जगताप हा तरूण चेहरा मैदानात उतरवणे, काँग्रेसचे स्टार प्रचारक ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वपक्षाला बासणात गुंडाळून थेट भाजप नेत्यांसोबत प्रचारात सक्रीय होणे, संपूर्ण देशाची जबाबदारी (?) खांद्यावर असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नगरमध्येच घुटमळणे, विखेंचे प्रतिद्वंदी आ.बाळासाहेब थोरातांनी दक्षिणेतील मोर्चेबांधणीत सक्रीय होत शाब्दीक दारूगोळे उडविणे, सामान्य जनतेत हालत खस्ता आहे याची जाणीव असलेल्या सत्ताधारी पक्षाने चाणाक्षपणे सहकाराच्या मातब्बरांना एकमेकांविरूद्ध झुंजवत सरकारविरोधी लाट पडद्याआड दडवणे, एकमेकांची रसद आणि ताकदीला सुरूंग लावणे…असा विविधढंगी खेळ या निवडणुकीने अनुभवला.

लोकशाहीला अपेक्षीत अनेक बाबी बिनधोक खुंटीला टांगून रंगलेला हा ‘सत्ता आणि मत्ते’चा सामना दिर्घकाळ आठवणीत राहील. प्रचारात एकमेकांचे सदरे उतरविण्यात कोणीही हात आखडता घेतला नाही की कोणी लज्जाही बाळगली नाही. सर्व कसे बिनधास्त होते. जनता आणि मतदाराला गृहीत धरून, त्याला हेच हवे आहे या अविर्भावात हे घडत राहीले. या ‘भंपक’ प्रचारी खेळात जनतेचा विकास, त्यांचे प्रश्‍न, आशा, आकांक्षेला फारसे स्थान नव्हतेच. ‘मी’पणाच्या कैफात बुडालेली झुंड गावकुसात धुराळा उडवत फिरली.

भीषण दुष्काळ आणि बोलायचाच कढी-भात ठरलेल्या जलयोजनांमुळे चारा छावण्यात दिवस काढायची वेळ आलेल्या बळीराजाला आपला श्रीमंत प्रचारकी भपका दाखविण्याची हौस काहींनी भागवली. जेथे ‘जनाची तर किमान मनाची बाळगावी’ तेथेही राजकारण शिंपडण्याचा हा प्रयत्न वेदनादायी होता. सातत्याने चारा छावण्यात पोहचणार्‍या शेतकर्‍यांना ‘आता मीच विकास करणार’ अशी राजकीय थाप मारण्याचे कौशल्य ही मंडळी कोठे शिकत असावी?
मुद्दा हा की प्रचारात जनतेच्या हाती काहीही लागले नाही. तसे ते लागणारही नव्हते! मग लढत होती कसली. तर ‘त्याच्यापेक्षा मी कसा सरस’ हे बिंबविण्याची. साम, दाम, दंड, भेद अशा सर्वच अस्त्रांचा त्यासाठी वापर झाला.

‘आपण’वरून ‘मी’वर घसरले की जे मातेरं होत, तेच दक्षिणेतील राजकीय लढाईच्या पृष्ठभागावर वारंवार नजरेस पडले. सभांना गर्दी होती पण उत्स्फूर्तता नव्हती. नेते येत होते पण गर्दी त्यांना ऐकण्याऐवजी केवळ ‘बघत’ होती. उमेदवारांसोबत काहीजण फिरत होते, पण त्यांचा जीव भलतीकडेच अडकला होता. कोणी म्हणतं ही लढत पवार-विखेंची होती, कोणी म्हणतं अस्तीत्वाची होती, कोणी म्हणतं दोन तरूण नेत्यांची होती. पण त्यापेक्षा अधिक ती राजकीय अहंकाराची होती. या अहंकारात जनतेची नाहकच फरफट झाली.

डॉ.सुजय आणि आ.संग्राम अत्यंत निकराने मैदानात वावरले. डॉ.सुजय यांनी तीन वर्षापासून मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यांची तयारी तशी ‘कॅल्युलेटेड’ होती. ते एवढे पुढे निघून गेले होते की कोणी त्यांना आव्हान देईल की नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. ट्विस्ट आला तो डॉ.विखेंच्या भाजपा प्रवेशानंतर! विखेंनी प्रतिस्पर्ध्याला मैदानात जागा करून दिली ती येथेच. राष्ट्रवादीकडून कोण, या प्रश्‍नाला आ.संग्राम असे उत्तर मिळताच सामना पुन्हा नव्या दमाने सुरू झाला होता. समोर आ.संग्राम आहे म्हटल्यावर जिंकणारच, हा काही भक्तांचा आत्मविश्‍वास किती फाजील होता, हे ठरविण्याचे काम आ.संग्राम यांनी प्रत्यक्ष मैदानात महिनाभरात करून दाखविले, म्हणून त्यांच्या आव्हानाचे अप्रुप अधिक ठरते.

मैदानात अन्य उमेदवारही होते. पण ठोकशाहीच्या या खेळात लोकशाहीच चेपली गेल्याने त्यांचा आवाज दबला. काय होणार याचा अंदाज असल्यावरही लोकशाहीच्या समरात त्यांनी उडी मारली, यासाठी त्यांचे कौतुकच केले पाहिजे. डॉ.सुजय आणि आ.संग्राम यांनी मेहनत घेतली. त्यांच्यासाठी मातब्बर नेत्यांनी कुरघोड्यांचा पट रचला. एकतर्फी वाटणारा हा सामना अटीतटीवर आणला. मतदारराजाने आपला फैसला दिला आहे.

तो काय आहे, हे निकालाचा दिवस सांगेलच! विजयाचे अंतर किती, यावरूनही पुढील राजकारणाची ‘बेरीज-वजाबाकी’ होईल. प्राथमिक अंदाज तर ‘काठावर’चा आहे. उमेदवार आणि त्यांचे पाठीराखे तातडीने आकडेमोड करण्यात गुंतले असले तरी त्यांच्या हाती फार काही लागेल, असे वाटत नाही. मतदाराच्या मनाचा ठाव घेणे तसेही सोपे नाही. त्यापेक्षा पुढील काही दिवस उमेदवारांसाठी चिंतनाचे आहेत. यातून त्यांना निकाल स्वीकारण्याचे धारिष्ट्य नक्कीच गवसेल!
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!