ओले सारसनगर प्रशासनाकडून कोरडे

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणूक रंगात आली असतानाच सारसनगरच्या 14 नंबर वार्डात निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी रेड टाकली. या रेडमध्ये बुधवारी रात्री सुरू असलेली पार्टी, तर गुरूवारी सकाळी पैसे पकडले. निवडणुकीत पार्टी अन् पैशाने ओलेचिंब झालेले सारसनगर जिल्हा प्रशासनाने मात्र ‘कोरडे’ केले. 

सारसनगरच्या 14 नंबर वार्डात आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप, गणेश भोसले हे राष्ट्रवादीकडून आणि शिवसेनेकडून माजी महापौर भगवान फुलसौंदर असे बलाढ्य उमेदवार असल्याने अख्ख्या नगरकरांचे लक्ष त्याकडे लागून आहे. निवडणूक म्हटलं की मतदाराला ‘राजा’ संबोधून त्याची सोयपाणी ओघाने येतेच. सारसनगरच्या वार्डात रात्री पार्टी सुरू असल्याची टिप जिल्हा प्रशासनाला मिळाली. प्रशिक्षणार्थी आयपीएस प्राजित नयार यांना मिळाली. त्यांनी पथकासह तिकडे धाव घेत रेड टाकली. या रेडमध्ये त्यांना पत्रावळी अन् बिर्याणी मिळून आली. त्याचा पंचनामा करत संबंधित केटर्स, ठिकाणाचा मालक, आचारी अन् तेथे उपस्थित असलेल्या उमेदवारांना नोटीसा पाठवून म्हणणं मागविलं आहे. नोटीस समाधानकारक न आल्यास त्याचा खर्च राष्ट्रवादीच्या चार उमेदवारांवर विभागून टाकला जाणार असल्याचे नायर यांनी सांगितले.

बुधवारी रात्री हा छापा पडल्याला 12 तास उलटत नाही तोच एका कार्यकर्त्याला नायर यांच्याच पथकाने पैशासह पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडं 38 हजार रुपये मिळून आला. त्याला पकडून कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. हा कार्यकर्ता राष्ट्रवादी उमेदवाराचा समर्थक असल्याची माहिती सूत्रांकडून समजली. पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळं नेमकं नाव समजू शकलं नाही.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अन् सुरूंग
सारसनगरचा वार्ड नगरात हॉट झाला आहे. तेथे मतदारांना प्रलोभनं दाखविली जात आहेत. भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादी असा तिरंगी सामना या वार्डात होतोय. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून या वार्डाकडे पाहिले जाते. त्यालाच प्रशासनाने सुरूंग लावल्याने वेगवेगळे तर्कविर्तक काढले जात आहे.

 

LEAVE A REPLY

*