चाचांची ओपनउडी

0

नगर टाइम्स, 

आरक्षणामुळे दीप चव्हाणांची कोंडी

अहमदनगर (प्रतिनिधी)- आरक्षणामुळं काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण (चाचा) यांची कोंडी झाली आहे . कुटुंबातील महिलेला निवडणूक आखाड्यात उतरविण्यास ते फारसे उत्सुक नाहीत. वार्डातील एससीची जागा राखीव झाली असली तरी ते ओपनच्या जागेवर निवडणूक आखाड्यात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दीप चव्हाण यांनीही त्याला दुजोरा दिला.दीप चव्हाण हे ज्येष्ठ आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून नगरकरांना परिचित आहेत. सभागृहात ते बोलायला लागले की अधिकार्‍यांचीही कोंडी होते.

महापालिकेचे अर्ध्याच्यावर अधिनियम त्यांच्या तोंडपाठ असल्याने अधिकार्‍यांची भंबेरी उडाल्याचे अनेकांनी पाहिले. जनतेच्या भल्याकरीता एखादा प्रश्‍न अभ्यासूपणे मांडणारा नगरसेवक महापालिकेत हवा या उद्देशातून दीप चव्हाण यांनी स्वत:च निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. जागा राखीव झाली असली तरी ‘ओपन’चा मार्ग खुला असल्याचे त्यांनी ‘नगर टाइम्स’शी बोलताना सांगितले. दीप चव्हाण यांचा सध्याचा वार्ड विस्तारला गेला. तोफखाना, महावीरनगर, सर्जेपुराचा भाग त्यांच्या वार्डाला जोडला गेला. प्रभाग 9 मधून ते महापालिका निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. या वार्डात अनुसूचित जाती(महिला) व इतर मागासवर्ग महिलेच्या जागेसह दोन जागा ओपनसाठी आहेत. दीप चव्हाण यांच्या जागेवर महिलेचे आरक्षण पडल्याने त्यांनी ‘ओपन’मध्ये उडी मारली आहे.

वार्डबदलाचा विचार सोडला वार्डात आरक्षण पडल्याने चव्हाण दुसर्‍या वार्डात जातील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, चव्हाण यांनी वार्ड बदलाचा विचार सोडून देत ओपनउडी मारण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवक असताना विकास कामे केल्याने वार्ड बदलाचा विषयच नाही, असे चव्हाण यांचे म्हणणे आहे.

मैं चला धनूके साथ
या वार्डातून काँग्रेसचे धनंजय जाधव यांचे नाव चर्चेत आहे. त्यांनी तयारीही सुरू केली आहे. त्यांच्याजोडीने दीप चव्हाण निवडणूक लढणार आहेत. धनंजय जाधव यांची भेट घेत दीप चव्हाण यांनी तशी चर्चाही केली आहे. चव्हाण यांच्या या निर्णयामुळं आघाडीला राखीव जागेवर नव्या महिलेचा शोध घ्यावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

*