निंबळक ग्रामस्थांचे रास्ताखोदो आंदोलन

0
बायपासची दुरुस्ती न झाल्याने उचलले टोकाचे पाऊल
अहमदनगर  बाह्यवळण रस्त्याची झालेली दुरावस्था, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी आश्‍वासन मिळून देखील सुरु न झालेले रस्त्याचे काम, धुळीने शेतीच्या पिकांचे झालेले नुकसान तर न्यायालयाचे आदेश असताना रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमीनीचा थकित वाढीव मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ निंबळक गटातील ग्रामस्थांनी बाह्यवळण रस्ता खोदून, रास्तारोको आंदोलन केले. दीड तास चाललेल्या आंदोलनाने बाह्यवळण रस्त्याची वाहतुक पुर्णत: खोळंबली होती.
आंदोलन स्थळी सा.बां.वि. चे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, शाखा अभियंता रमेश ढोबळे व दत्तात्रय बांगर यांनी आंदोलन कर्त्यांची समजूत काढून, रस्त्याचे काम सुरु होण्यासाठी प्रशासन पातळीवर कार्यवाही करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. पालवे यांनी रस्त्याची फेरनिविदा दि.26 ऑक्टोबरला उघडून, प्रशासनात्मक कार्यवाही पुर्ण होवून दि.15 नोव्हेंबर पर्यंन्त रस्त्याचे काम सुरु होणार आहे. तसेच शेतकर्‍यांच्या संपादित जमीनीचा वाढीव मोबदल्यासाठी आठ कोटी रुपये जमा झाले असून, उर्वरीत रक्कम मिळण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. आंदोलनात माजी सरपंच विलास लामखडे, ग्रा.पं. सदस्य बाळासाहेब गायकवाड, अशोक शिंदे, लक्ष्मण होळकर, संजय गायकवाड, अजय लामखडे, दत्ता भूमकर, मारुती गारुडकर, भाऊसाहेब गायकवाड, राजू गायकवाड, सुरज गायकवाड, भाऊसाहेब लामखडे, एकनाथ शिंदे, समीर पटेल, नवनाथ घोलप आदिंसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
बाह्यवळण रस्ता (महामार्ग क्र.222) मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असताना, शासनाने जीएसटी 18 टक्के लावल्याने राज्यातील ठेकेदारांनी सदर रस्त्याच्या कामासाठी पाठ फिरवली. तीसर्‍यांदा ई निवदा काढण्यात आली असून, शासन व प्रशासनाच्या गोंधळात सर्वसामान्य ग्रामस्थ भरडले जात असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. संपुर्ण रस्ता धुळीने माखून रस्त्यालगत असलेल्या शेतीच्या पीकांचे नुकसान झाले असताना, उपस्थित शेतकर्‍यांनी नुकसान भरपाईसाठी पंचनामे करण्याची मागणी केली. निंबळक गटातील ग्रामस्थांनी वारंवार आंदोलने करुन, बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्तीचे लेखी आश्‍वासन देण्यात आले होते.

LEAVE A REPLY

*